अभंगकार प्रा.अरुण बुंदेले समाजसेवी व्यक्तिमत्त्व

30

” आदर्श विद्यार्थी प्रबोधन माले “तून विद्यार्थ्यांना गुणवृद्धीसाठी अभ्यास विषयक शैक्षाणिक प्रबोधन करणारे , “घडवू या व्यसनमुक्त समाज ” या कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न साकार करणारे , “आदर्श पालक प्रबोध प्रबोधन मालेतून ” पालकांना आपल्या पाल्याविषयी जागृत करणारे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झालेले,उपेक्षित समाज महासंघाचे कार्यकारिणी सदस्य, ” वऱ्हाड विकास ” या मासिकाचे सहसंपादक,गुरु रविदास सामाजिक व साहित्यिक संशोधन केंद्र ,अकोला चे सदस्य,श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे सदस्य,शिक्षक साहित्य संघ, शाखा -नांदगाव खंडेश्वरचे अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी प्रयत्न करणारे प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले हे नाव कवी, लेखक, वक्ता, समाजप्रबोधक यासोबतच अभंगकार म्हणून नावारूपास येत आहेत.त्यांचा आज दि.२ ऑगस्ट २०२३ ला असलेल्या बासष्ठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

दि.३१ ऑगस्ट २०१९ ला सेवानिवृत्तीनंतरच्या कोरोना काळामध्ये त्यांनी शिक्षक साहित्य संघ,अमरावती, लयभारी साहित्य समूह मुंबई, विचारयश मासिक साहित्यसमूह भंडारा, शक्य सिंह सोसायटी औरंगाबाद ,परिवर्तन विचार मंच नागपूर इत्यादी मराठी साहित्यिक संस्थेद्वारे कोरोना काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये कधी अध्यक्ष म्हणून तर कधी प्रमुख अतिथी म्हणून सरांनी सहभागी होऊन विविध विषयावरील कविता व अभंगांचे गायन केलेले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खामगाव येथील श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालयामध्ये फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या मराठी भाषेचे संगोपन व संवर्धन या विषयावर विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले होते. दि .२९ मे २०२२ ला आर्वी , जि.वर्धा येथे आणि दि.१७ फेब्रुवारी २०२३ ला गो.सी.टोम्पे महाविद्यालय, चांदूर बाजार येथे संपन्न झालेल्या महात्मा फुले राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तनवादी -विद्रोही कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवून परिवर्तनवादी कवितेतून समाजामध्ये समाज परिवर्तन झाले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. चांदूरबाजार येथील महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनात त्यांचा संमेलनाध्यक्ष मा.श्री यदु जोशी मुंबई, माआमदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू, विधानसभा सदस्य, मुंबई व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रा.अरुण बुंदेले यांचे अकरावे पुस्तक व दुसरा काव्यसंग्रह ” अभंग तरंग ” हा प्रकाशित झाला.

कोरोना संपल्यानंतर अनेक शाळा महाविद्यालयात त्यांचे विद्यार्थी प्रबोधनाचे शैक्षणिक कार्यक्रम सुरूच असतात. समाजामध्ये वधु वर परिचय मेळावे आयोजित करण्याचे कार्य ही त्यांनी केलेले आहे. सेवा कार्यात केलेले कार्य आज सेवानिवृत्तीनंतरही त्याच उत्साहाने ते आजही करीत आहेत अशाप्रकारे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात विविध कार्य करीत असलेल्या एम.ए. (मराठी ), बी.एड.,एम. फिल. (मराठी ) पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा जन्म जन्म दि. २ ऑगस्ट १९६१ रोजी अचलपूर, जि.अमरावती या ऐतिहासिक नागरीमध्ये झाला.त्यांचे वडील आदर्श नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले व मातोश्री समाजसेविका कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक प्रबोधनमालेतून १९९४ पासून आज सेवानिवृत्तीनंतरही करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जरुड. ता.वरुड, जि. अमरावती येथून दि.१३ ऑगस्ट १९८८ पासून झाली आणि त्यांनी ३१ वर्ष १९ दिवस सेवेत राहून हजारो विद्यार्थ्यांना घडविले व दि.३१ऑगस्ट २०१९ ला ते सेवानिवृत्त झाले.आई- वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करून त्याद्वारे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक उपक्रम ते राबवितात.

आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक व कै.बाबारावजी वायलाजी बुंदेले स्मृती पारितोषिक रोख रक्कम, सन्मानपत्र, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करतात. त्यांनी आई-वडिलांच्या सृतिप्रित्यर्थ श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय बुलढाणा,नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, महात्मा फुले विद्यालय अमरावती, सर्वोदय विद्यालय, अकोला अशा अनेक शाळांना पाच ते दहा हजारांची देणगी दिलेली आहे.या देगणीच्या रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याची योजना त्या शाळा दरवर्षी राबवितात. कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे त्यांनी दि.२३ जुलै २०२३ ला गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट,राधानगर, अमरावती येथील सभागृहात त्यांच्या मातोश्रीच्या नावाने कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले समाजसेवा गौरव पुरस्कार – 2023 हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सौ. उज्ज्वलाताई सुरेशराव मेहरे (माळोदे) यांना मान्यवराच्या हस्ते देण्यात आला.

डॉ.उज्वलाताईंच्या कार्याचा उचित गौरव या पुरस्कारामुळे केल्या गेला, असे मान्यवरांनी उदगार काढले. तसेच या प्रतिष्ठानच्या वतीने आजपर्यंत महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, संत सावता महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अशा थोरांच्या जयंती-स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळे आयोजित केलेले आहेत.

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची प्रेरणा घेऊन यांनी शालेय उपक्रमशीलते मध्ये सहभागी होऊन महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आचारसंहिता विद्यार्थी कसे आचरणात आणतील याकडे लक्ष दिलेले होते. शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी ते विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शनच करीत नव्हते तर स्वतः झाडू हातात घेऊन विद्यार्थ्यांसोबत शाळा स्वच्छ अभियान राबवित असत. ३३ वर्षाच्या कार्यकाळात भाऊसाहेबांच्या जयंती उत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे काव्यमय संचालन त्यांनी अनेक वेळा केले आहे. त्यांनी अनेक प्रतिज्ञा लिहून त्या त्या दिनाला विद्यार्थ्यांकडून त्या प्रतिज्ञा वदवून घेतल्या होत्या. उदा .कॉपीमुक्त अभियानाची प्रतिज्ञा, मराठीची प्रतिज्ञा, स्वच्छतेची प्रतिज्ञा, व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा इत्यादी. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व विद्यार्थ्यांचे समुपदेशन ते करीत. डिप्रेशनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी समुपदेशन करून त्यांच्यातील आदर्श विद्यार्थी जागृत केलेला होता आणि आजही त्यांच्याकडे आलेल्या अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करीत असतात.

इयत्ता अकरावी, बारावीला मराठी विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांची मराठी विषयात अभ्यासाची गोडी वृद्धिंगत करण्यासाठी चित्र, गायन,व्याख्यान, मुद्देसूद, कथन, मार्गदर्शनपर, कृतीयुक्त, चर्चा अशा विविध अध्यापन पद्धतींचा उपयोग करून प्रभावी अध्यापनातून त्यांनी हजारो आदर्श विद्यार्थी घडविले. इयत्ता अकरावी मधील मराठी वर्णमालेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे दुःखी न होता दोन रेषेच्या वहीत मराठी शुद्धलेखन प्रकल्प व वळणदार हस्ताक्षर प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा खचलेला मूळ पाया पक्का करूनच ते मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा दरवर्षी ओनामा करीत असत. या प्रकल्पांचा फायदा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे झालेला होता व पुढील शिक्षणासाठी त्याचा फायदा झालेला होता असे त्यांचे माजी विद्यार्थी कथन करतात. त्यांनी ग्रंथालयात “वाचाल तर वाचाल ” हा प्रकल्प सुरू केला केला होता.

या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली होत.विद्यार्थ्यांमध्ये आदर्श भाषण प्रकल्प राबवून भाषणासाठी विद्यार्थ्यांना ते प्रवृत्त करीत.वर्षभरातील थोरांच्या जयंती स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात वक्तृत्व व काव्य स्पर्धेचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तके देऊन त्यांचा गौरव करीत असत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेची आवड निर्माण होऊन विविध संस्था व शासनांद्वारे घेण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले होते. सरांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून आदर्श लेखन प्रकल्प सुरू केला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कलेची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या विविध विषयावरील लेख व कविता शालेय ” प्रेरणा ” हस्तलिखितांमध्ये दरवर्षी असत. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांच्या कविता त्यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित करून विद्यार्थ्यांमध्ये काव्यलेखनाची प्रेरणा निर्माण केली त्यातून स्नेहसंमेलनामध्ये ” विद्यार्थ्यांचे वऱ्हाडी विनोदी कवी संमेलनाचे ” ते दरवर्षी यशस्वीरित्या आयोजित करीत होते. विद्यार्थ्यांसाठी आदर्श निबंध लेखन प्रकल्प राबवून निबंध लेखनाची कला शिकवून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी आदर्श निबंध लिहिण्याची प्रेरणा निर्माण केली.

त्यासाठी त्यांनी “आदर्श निबंध लेखन पुस्तिका” प्रकाशित केली.
प्रा.बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून “आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला” या शैक्षणिक कार्यक्रमाची निर्मिती केली.या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण १९९४ पासून विदर्भातील शेकडो शाळा – महाविद्यालयात मराठी भाषेत, वऱ्हाडी ,विनोदी,प्रमाण व बोली भाषेत केले. त्यांनी या शैक्षणिक प्रबोधन मालेतील ज्ञानकण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सन २०११ ला ” आदर्श अभ्यासाचे तंत्र “या अभ्यासविषयक पुस्तकाचे लेखन करून ते प्रकाशित केले. ” मराठी विषयाची आदर्श अध्यायन माला ” या कार्यक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाची गोडी निर्माण केली. “परीक्षेला जाता जाता ” या प्रबोधन मालेचे परीक्षेच्या दोन महिन्या अगोदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना ज्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयास त्यांनी स्वतः सोबतच इतरही शाळेमध्ये केलेला होता व आजही करीत आहेत. त्यांनी स्वतः मराठी विषयाचे अध्यापन आठ अध्यापन पद्धतीद्वारे विविध प्रकल्प व उपक्रम राबवून केलेले आहे .त्यांनी हा आदर्श अध्यापनाचा छंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आदर्श अध्यापक प्रबोधन मला या प्रबोधन मालेची निर्मिती करून तो अध्यापकांपर्यंत पोहोचविला . त्यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण शैक्षणिक गटसंमेलन, डी.एड. कॉलेज,बी.एड.कॉलेज व विविध शाळेतील शिक्षकांसमोर सादर करून आदर्श अध्यापनाचे तंत्र शिक्षकांपर्यंत पोहोचले.

प्रा.अरुण बुंदेले यांनी” आदर्श पालक प्रबोधन मालेची “निर्मिती करून शाळेमध्ये पालक शिक्षक संघाच्या सभेमध्ये आदर्श पालक प्रबोधन मालेचे सादरीकरण करून त्यांनी पालकांमध्ये पाल्याविषयीची जागृती निर्माण केली.थोर पुरुषांवरील व संतांवरील लेख, कविता व अभंग रचना विविध वृत्तपत्र, मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या असून शाळेत थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी नेहमी स्वतः अभंग रचनांचे गायन केलेले आहे तसेच त्यांच्या हुंडा पद्धती निरक्षरता निर्मूलन, दारूबंदी, हागणदारी मुक्तगाव, स्वच्छता, स्वच्छ शाळा स्वच्छ भारत इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या काव्यरचना नागपूर आकाशवाणी, अकोला आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी आणि साहित्य संमेलनातील कवी संमेलन व स्वनिर्मितआदर्श काव्य प्रबोधन माला या कार्यक्रमांमध्ये अभिनयातून कवितेचे काव्य गायन करून समाजप्रबोधन केलेले आहे. विषेश म्हणजे 2019 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या ” लेक शिकवा अभियान ” या काव्यची निवड होऊन त्यांनी यवतमाळ येथे उत्कृष्टरित्या गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. या सर्व कविता व अभंग दि.14 एप्रिल 2019 ला प्रकाशित झालेल्या त्यांच्या ” निखारा ” या काव्यसंग्रहामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये हुंडा पद्धती, ग्राम सुधारणा, हागणदारीमुक्त ग्राम, व्यसनमुक्त ग्राम अशा अनेक ग्राम समस्यांवर ” आदर्श मराठी काव्य प्रबोधन माला ” या कार्यक्रमाचे सादरीकरण करून ग्रामस्थांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज पर्यंत त्यांची शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक विषयावर अकरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये आदर्श अभ्यास पुस्तिका, आदर्श अभ्यासाचे तंत्र, आदर्श मार्गदर्शिका,आदर्श निबंध लेखन पुस्तिका ही शैक्षणिक पुस्तके तर भदयाचं लगीन, शकुने !आता आपलं कसं?, दारूनं मेला ओ माय, नळावरची झोंबाझोम्बी, हुंडा पापाचा हंडा या एकांकिका प्रकाशित झालेल्या आहेत.त्यांच्या या एकांकिकांचे प्रयोग शाळा महाविद्यालय तसेच समाज कल्याणद्वारे घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये प्रथम, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस त्यांच्या एकांकिकांना मिळालेले आहे .

बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्रा. बुंदेले यांचे सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आजपर्यंत त्यांना सहा शैक्षणिक पुरस्कार, अकरा साहित्यिक पुरस्कार व पाच सामाजिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.समाजसेवी प्रा.अरुण बुंदेले सर यांची आज बासष्ठी आहे. त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आज अमरावती येथे कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, अमरावती तर्फे श्री गोविंदभाऊ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील पंधरा मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केलेले आहे.बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या सर्वक्षेत्रातील कार्याला मी सलाम करतो आणि त्यांना निरामय व उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यासाठी सुयश चिंतितो .

आदर्श शिक्षक पुरस्कार
प्राप्त

✒️प्रा.जयंत रायबोर्डे(माजी प्राचार्य,बुलडाणा)