मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करतांना….

99

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव 17 सप्टेंबर 2023 निमित्ताने सर्व बंधू बहिणी यांना शुभेच्छा. यासाठी बलिदान, त्याग, शोर्य गाजवले अशांना विनम्र अभिवादन. 15ऑगस्ट 1947 ला देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत होता. सर्व भारतीय हे स्वातंत्र्याचा आनंद घेत होते.मराठवाडा मात्र यावेळी दुहेरी गुलामगिरीतच राहिला होता. इंग्रजांची आणि निजामाची गुलामगिरी!त्याला ह्या स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी एक वर्ष एक महिना वाट पहावी लागली. त्यासाठी संघर्ष करावा लागला.मराठवाडा हा खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाला. त्यामुळे त्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होते आहे. स्वातंत्र्यपूर्वी असणारे हैद्राबाद,जुनागड व काश्मीर ही संस्थाने भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही देशात सहभागी न होता, स्वत: स्वतंत्र म्हणवून राहीली. तशा पद्धतीने कारभार ही करत होती. स्वातंत्र्यपूर्वी देशात 565 संस्थाने होती. त्यापैकी 562 भारत वा पाकिस्तान यात सहभागी झालेली होती. मात्र ही तीन संस्थाने सहभागी झाली नव्हती.

दिल्लीच्या मुघल बादशहाने निजाम उल मुल्क हा किताब दक्षिणेचा सुभेदार मीर कमरूदीन खान याला दिला होता. त्याच्या नंतरही वारसाने पुढे याच किताबने ओळखल्या जावू लागले! 1911 ते 1948 सातवा निजाम म्हणून मीर उस्मान अली कारभार पाहत होता. तो खूप महत्वकांक्षी होता. हैद्राबाद संस्थान हे त्याकाळातील भारतातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. त्याचे राज्य म्हणजेच निजामाचे राज्य होय. त्याच्या राज्यात कारभारी म्हणून कासीम रिझवी होता. कासीम रिझवी हा मूळचा लातूर येथील वकील होता.तो उत्तम वक्ता होता. त्याच्या अमोघ वाणीने श्रोते मोहीत होऊन जात. तो श्रोत्यांना पेटवायचा व श्रोतेही पेटून उठत. कासिम रिझवी रझाकार संघटना चालवायचा.

‘इतेहादुल मुस्लिम’ संस्थानात ही एक आणखी प्रभावी संघटना होती. 1946 ते 1948 या तीन वर्षात या दोन संघटनानी हैद्राबाद संस्थानात धुमाकूळ घातला होता. यात रझाकार जास्त त्रास देत. ‘रझाकार म्हणजे स्वखुशीने कार्य करणारे सैनिका समान होय.ते काहीही करायला तयार असत. 1948 पर्यंत सशस्त्र रझाकार यांची संख्या दोन लक्ष झाली होती. इंग्रजाच्या अधिपत्याखाली असणारे निजामाचे संस्थान असून ही याबाबत त्यांचा कानाडोळा होता.निजाम संस्थानात रेडिओ चॅनल्स,10 दैनिके,7 साप्ताहिक आपल्या विचारासाठी वापरत असे.
संस्थानात एकूण 16 जिल्हे होते.

यात महाराष्ट्र 5 जिल्हे,कर्नाटक 3 तर आंध्रप्रदेश 8 जिल्हे होते. महाराष्ट्रातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, औरंगाबाद (जालना होते.) कर्नाटकचे बिदर, गुलबर्गा व रायचूर तर आंध्राचे अदिलाबाद, निजामाबाद करीमनगर, वरंगल, अतराफ, ईबल्दा, हैद्राबाद, नलगोंडा व महेबूबनगर हे जिल्हे होते. संस्थानात मराठी, कानडी व तेलगू भाषिक संख्या जास्त होती. त्यांना नागरी अधिकार मर्यादित होते. फारशी ही राजभाषा होती.

संस्थानातील जनतेची ईच्छा भारतात विलीन होण्याची होती. पण निजामाचा यास विरोध होता!1946 ला कासीम रिझवीचा रझाकार दलाच्या माध्यमातून होणारा अन्याय, अत्याचार वाढला होता. या अन्याय, अत्याचारा विरुद्ध खेडी,शहरे पेटवून उठली होती. वेगवेगळ्या भागात नेतृत्व करणारी माणसे पुढे आली. ज्यात रामानंद तीर्थ,गोविंद भाई श्रॉफ, देवीसींग चौहान, बदनापूरच्या दगडाबाई शेळके लातूरचे हरिश्चंद्र जाधव, उस्मनाबादचे जनार्दन होर्टीकर, परभणीचे सूर्यभान पवार, नांदेडचे देवरावजी कावळे इत्यादीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या काना-कोपन्यात मुक्तीसंग्राम लढला जात होता.या लढ्यात गोविंदराव पानसरे,श्रीधर वर्तक, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदीचे बलीदान झाले.

*ऑपरेशन पोलो*
तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशाने हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी 13 सप्टेंबर 1948 ला पोलीस कारवाईस सुरुवात झाली. ज्यात चारही बाजूने कारवाई केली. कारवाई पहाटे चार वाजता सुरु केली होती.

1) सोलापूर कडून हैद्राबाद संस्थानात कारवाई करत दोन तासात नळदुर्गपर्यंत तर संध्याकाळ पर्यंत परभणी माणिकगड, विजयवाडा, बोनाकळ ताब्यात घेतले.
दुसऱ्या बाजूने 2) चाळीसगावकडून आलेल्या फौजांनी कन्नड-दौलताबाद पर्यंत ताबा मिळवला.
तिसरीकडून 3) बुलढाण्याकडून आलेल्या फौजांनी जालना ताब्यात घेतले.चौथ्या बाजूने 4)वरंगळ, बिदर ताब्यात घेतले. तेथील विमानतळ ही ताब्यात घेतले.
15 सप्टेंबर 1948 ला औरंगाबादही ताब्यात घेतले. निजामाचा पराभव समोर दिसताच सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस याने 17 सप्टेंबर 1948 ला शरणागती पत्कारली. मेजर जनरल चौधरी यांनी त्याचे शरणागतीचे पत्रक स्वीकारले.हैदराबाद संस्थान ही भारतात विलीन झाले. ज्यात मराठवाडा हा महाराष्ट्रात जोडला गेला.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य करताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या प्रांतात आवश्यक त्या सुधारणा केल्या. ज्यात रेल्वे,पोस्टल,वाहतूक व्यवस्था, पोलीस भरती, सैनिकभरती, इतर नोकर भरती, विद्यापीठे ,आरोग्य सुविधा, बाजारपेठा, कारखाने यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी इंग्रजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सिंचनाच्या सोयी केल्या.मात्र हैदराबाद संस्थानमध्ये निजामाचा शिक्षण आरोग्य दळणवळण अशा मूलभूत सुविधा,रोजगार निर्मिती उद्योग यास पाहिजे तेवढा पुढाकार नव्हता असे दिसून येते! महाराष्ट्राच्या इतर प्रांताच्या तुलनेत मराठवाडा हा मागास राहिला!

हा मगासलेपणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनाचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्यकर्ते यांनी जाणीवपूर्वक आरोग्यसुविधा मेडिकल कॉलेजेस,तांत्रिक शिक्षण संस्था,आय आय टी,आय आय एम ,एम्स सारखी कॉलेजेस,रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठी उद्योगधंदे,स्थानिक उत्पादने विकली जावेत यासाठी मोठी बाजारपेठ यांची उभारणी जलद गतीने करावी.संपूर्ण मराठवाडा रेल्वे सुविधेने देशाशी जोडला जावा.मोठे कारखाने निर्माण केली जावीत.शेती समृध्द करण्यासाठी प्रतेक जिल्ह्यात कृषी विद्यापीठे उभारावीत.नदीजोड प्रकल्प करून शेतीला सिंचन सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात तलाव,धरणे,कालवे यावर भर द्यावा.यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न व्हावेत.तरच मराठवाडा हा महाराष्ट्राच्या बरोबरीने येईल.देशात तो किमान बरोबरीने येईल,असे वाटते.!

✒️रामेश्वर तिरमुखे(जालना)मो:-9420705653