पितृ पंधरवडा

66

ज्यांनी हाताला धरून आपल्याला चालायला शिकवलं. स्वतः बोबडे बोल बोलून बोलायला शिकवलं. स्वतः आपल्या गरजा कमी करून आपल्याला साधनं पुरवत आपल्या पायावर उभं केलं अशा आपल्या पुर्वजांची आठवण काढण्यात काही गैर नाही. जगभर विविध समुहांमधे विशिष्ट दिवशी पुर्वजांची आठवण काढून त्यांना नमन करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला दिसतात.

चळवळीत ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांना स्मृतीदिनी अभिवादन करण्याचे कार्यक्रम आपण करतोच. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजासाठी त्यांचे आजही असलेले महत्व आपण समोर आणतो. आपल्या घरापुरते आपल्या आईवडिलांचे, आज्जीआजोबाचे, काकाकाकी, मामामामी, आत्याकाकाचे तेच महत्व असते.

सामुहिकरित्या विशिष्ट पंधरवड्यात पुर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे चांगलच आहे. अशी कृतज्ञता व्यक्त करताना गावजेवण घालण्या ऐवजी ज्यांची मुलं-नातवंडं त्यांच्यासोबत नाहीत अशा वृध्दाश्रमातील वृध्दांसोबत जेवण करून आपल्या पितरांची आठवण काढणं केंव्हाही जास्त चांगलं. नाही का?
पण पितृपक्षाला जोडून जे कर्मकांड पुरोहितांनी आपल्या हितसंबंधांसाठी चिकटवलय त्याला मात्र स्पष्ट नकार दिला पाहिजे. स्वर्ग-नरक असं काही नसतं. स्वर्ग-नरकाशी संबंधित पाप-पुण्याची संकल्पना फसवी आहे. पूरोहितशाहीनं आपला स्वार्थ जपण्यासाठी या संकल्पना रुजवल्यात. स्वर्ग नसल्याने पितरांचा घास स्वर्गात जाण्याचा विषयच येत नाही. प्राणीप्रेम म्हणून गाईला घास घालायला हरकत नाही. पण त्यातून पुण्याची अपेक्षा ठेवू नये. पूरोहिताला तर पितृपंधरवड्यातच काय वर्षाचे 365 दिवस घराची पायरी चढू देऊ नये.

पूरोहितासाठी दक्षिणा आणि पूजासामग्रीचा खर्च होतो ही एक छोटी अडचण आहे. खरी समस्या आहे पूरोहिताच्या येण्यासोबत घरात प्रवेश करणारी आपली मानसिक गुलामगिरी. तिला बळी पडू नये.आपले आईवडील, आजीआजोबा जीवंत असताना त्यांची सेवा करावी, योग्य औषधोपचार करावेत, ते असताना त्यांचेशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढावा हे तर ओघाने आलेच. हे न करता ते गेल्यावर गावजेवण घालून ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करणं हे तर ढोंगच आहे….
तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काही वेगळं सुचवायचय का?

✒️सुभाष वारे,पुणे(मो.9822020773)