कोरोनावरील इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी पालकमंत्र्यांची पत्राद्वारे मागणी

26

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.28जुलै):-जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तिंवर तातडीने उपचार करण्यासाठी रेमडीसीव्हर, फलॅवीपीरॅवीर आणि टोसीली झुमॅब या इंजेक्शनचा मुबलक साठा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.

माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच इतर नागरीकांनी काही दिवसापूर्वी कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा जिल्ह्यात आवश्यक असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर 21 जुलै रोजी पालकमंत्री पाडवी यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तिंची संख्या वाढते आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भाग दुर्गम व अतिदुर्गम आहे. अशा परिस्थितीत बाधित व्यक्तीला संकटाच्यावेळी उपचार करण्यासाठी इंजेक्शन आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पालकमंत्री स्वत: सातत्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत असून कोरोना संसर्ग रोखण्याविषयी अधिकाऱ्यांशी संवाददेखील साधत आहेत. शासन स्तरावरील सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वॅब तपासणी लॅब जिल्ह्यात सुरू होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे व ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या बेड्सची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, हात साबणाने स्वच्छ धुणे आणि शारिरीक अंतर या बाबी अत्यंत महत्वाच्या असून नागरिकांनी सवयीचा भाग म्हणून याकडे लक्ष द्यावे. कोरोना आजाराच्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील ॲड.पाडवी यांनी केले आहे.