स्कन्दमाता आणि महादेवाचीही शास्त्रोक्त पुजा!

42

(ललिता पंचमी विशेष)

आश्विन शुद्ध पंचमी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती, विद्या प्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते. या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी, आरती करतात. स्वतःच्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे. या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा संकलित लेख अवश्य वाचा… 

आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते. यासाठी ती प्रसंगी वाईटपणादेखील घेते. रामायणात वनवासाला निघालेले श्रीराम, आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल कैकयी मातेला वंदन करून निघतात. याउलट भरत कैकयीला “माता न तू वैरिणी” म्हणून संबोधतो. मात्र, कैकयी मातेने वाईटपणा घेतला नसता, तर श्रीराम प्रभू अयोध्येचे राजा होऊन केवळ राज्य करण्यात मग्न झाले असते. त्यांचा अवतार दुष्टांचा नायनाट करण्यासाठी झाला होता. या अवतार कार्याची अप्रत्यक्षपणे जाणीव कैकयी मातेने करून दिली. म्हणून दंडकारण्यात चौदा वर्षे खडतर वनवास भोगून प्रभू श्रीरामांनी रावणासकट सर्व दैत्यांचा नायनाट केला आणि रामराज्य स्थापन केले.

ललिता पंचमी पूजा: ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हटले जाते. नवरात्रोत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. याला उपांग ललिता व्रतही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात. या पूजाविधीमुळे विद्या, धन, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते. श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. या दिवशी भक्त व्रत व पूजा पाठ करतात. व्रताचे स्वरूप- या दिवशी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या उपांग ललिता या रूपाची पूजा केली जाते. करंडा या भांडे प्रकारावरील केवळ झाकणाची प्रतीकरूप पूजा या दिवशी केली जाते. ललिता देवीला दूर्वांचा हार अर्पण केला जातो.

देवीच्या नैवेद्याला खीर, लाडू, घारगे तयार करतात. भोपळ्याच्या घारग्याचे वन देण्याची पद्धतीही दिसून येते. रात्री जागरण आणि देवीच्या कथेचे श्रवण केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताचे उद्यापन केले जाते. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करतात. पौराणिक मान्यता- पौराणिक मान्यतानुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती. हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता. या दिवशी भक्त षडशोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात. ललिता देवीसह स्कन्दमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं. मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी आणि शांती नांदते. महत्त्व- आदिशक्ती आई ललिता दस महाविद्यांपैकी एक आहे.

पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे. यादिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशिर्वाद प्राप्त होतो. जीनवात सुख आणि समृद्धी येते. पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ति, त्रिपुर सुंदरी, जगत जननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते. ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारी आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते.

देवी ललिता- शक्तिची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते. ज्यानुसार पिता दक्ष द्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्ष पुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. ही महाविपत्ति बघून भगवान विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात. नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते. ललिता देवीचं प्रादुर्भाव तेव्हा होतं जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो. ही स्थिती बघून ‍ऋषी-मुनी घाबरु लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळू-हळू जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करु लागतात. त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते. सृष्टीला पुन: नवजीवन प्राप्त होते. पूजा पद्धत- एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललितादेवीचे ध्यानमंत्र असे आहेत-

“नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।
भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।”
(अर्थ: कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.)

या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन-वाण देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.मातृरूपाने देवी आपले लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. देवीच्या मातृरूपाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे ललिता पंचमी, तो साजरा कसा करायचा ते जाणून घेऊ!नुकतीच शारदीय नवरात्र सुरू झाली असून १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. हा दिवस ललिता पंचमी नावे साजरा केला जातो. पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल रूपाची पूजा केली जाते. माता लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चिंतू शकत नाही. असे म्हणतात,

“कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति !!”

अर्थात संतती वाईट असू शकते, परंतु आई कधीच वाईट नसते. म्हणूनच तिला प्रेमरूपिणी, प्रेमांकित जननी म्हटले आहे.
यावरून बालपणी ऐकलेली एक गोष्ट आठवून पहा- एक मुलगा अतिशय खोडकर असतो. कोणाची मस्करी कर, कोणाच्या खोड्या काढ, कोणाच्या वस्तू पळव अशा सगळ्या त्याच्या वाईट सवयी. रोज शाळेतून त्याची तक्रार आईच्या कानावर पडत असे. आई त्याची समजूत काढते, चांगले संस्कार घालते परंतु एक चूक करते. लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून पाठीशी घालते. त्याच्या चुका पदरात घेते. मात्र, आईच्या चांगुलपणाचा मुलगा फायदा घेत एवढा बिघडतो, की मोठेपणी तो गावगुंड म्हणून ओळखला जातो. आई त्याची मनधरणी करते. त्याला सन्मार्गाला लावू पाहते. परंतु, हाताबाहेर गेलेला मुलगा आईचे ऐकूनही घेत नाही. एकदिवस गावात मारामारी होते, त्यात मुलाच्या हातून रागाच्या भरात खून होतो. पोलिस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगात टाकतात. आई रडत-ओरडत तुरुंगात पोहोचते. पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते. त्याच्यासमोर खूप रडते. मात्र, पाषाणहृदयी मुलावर काहीच परिणाम होत नाही. भेटण्याची वळ संपते. त्याआधी मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराच्या सळ्यांमधून आत आलेला आईचा कान कचकचून चावतो. आई विव्हळते. ओरडते. तिच्या कानाला रक्ताची धार लागते. ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते, त्यावर मुलगा तिला म्हणतो, “माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते, तर आज मी तुरुंगात नसतो.” तात्पर्य- मुले कृतघ्न होऊ शकतात, आई नाही! म्हणूनच ललितामातेला आदर्श मानतात. ती समस्त जगावर वात्सल्याचे छत्र धरते, परंतु चुकांची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत उन्हाचे चटकेही देते.

सुख-समृद्धीसाठी नवरात्रीतील पंचमी तिथीला करावी. १९ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे. या तिथीला उपांग ललिता व्रत केले जाते. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाईल. हा देवी दुर्गेचा अवतार आहे. नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. पुराणानुसार देवी ललिता शिवाच्या हृदयात वास करते. जेव्हा सृष्टीचा विनाश होतो, तेव्हा ही देवी प्रकट होते आणि नवीन सृष्टी निर्माण करते. ही दहा महाविद्यांपैकी एक आहे. नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता देवीसोबत स्कंदमातेची पूजा केली जाते. देवी ललिताविषयी पुराण काय सांगते? शक्तीच्या ललिता देवीचा उल्लेख पुराणात आढळतो. वडील दक्षाच्या अपमानामुळे मुलगी सतीने आपला प्राण त्याग केला. सतीच्या दु:खात भगवान शिव तिचा मृतदेह उचलतात आणि इकडे तिकडे फिरू लागतात. हे दु:ख पाहून भगवान श्रीविष्णू सतीच्या शरीराचे चक्राने विभाजन करतात. यानंतर सतीला भगवान शंकराच्या हृदयात स्थान मिळाले. त्यामुळे तिचे नाव ललिता पडले. जेव्हा सृष्टी संपुष्टात येऊ लागते, तेव्हा ही देवी प्रकट होऊन नवीन जग निर्माण करते. म्हणूनच तिला ललिता असेही म्हणतात.

पुराण असेही मानतात, की कामदेव भस्म झाल्यावर त्याच्या भस्मातून एका राक्षसाचा जन्म झाला. ज्याला मारण्यासाठी देवीने शिवाच्या हृदयातून ललिता अवतार घेतला. त्यांच्यासोबत पार्वती आणि शिव यांचीही पूजा या दिवशी केली जाते. त्यांची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. पूजन विधी- या देवीची सात्विक पद्धतीने पूजा केली जाते. सर्वप्रथम दुर्गादेवीच्या मूर्तीला स्नान घालण्यात येते. त्यानंतर वस्त्र, चंदन, अक्षत, फुले, कुंकू, हळद, मेहंदी आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण केले जाते. या देवीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल विशेष अर्पण केले जाते. यानंतर पिवळ्या किंवा लाल मिठाईचा नैवेद्य दाखवतात आणि हंगामी फळे अर्पण करतात. शेवटी आरती झाल्यावर प्रसाद वाटप केला जातो.

आपल्या आईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया. एक, जिने आपल्याला जन्म दिला, ती आपली आई. दुसरी, जी आपले भरणपोषण करते, ती मातृभूमी आणि तिसरी, जिने आपल्याला आश्रय दिला, ती भारतभूमी. यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडे मागुया…! उदे गं अंबे उदे !! जय माता दी !!!

✒️संकलन -श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
पोटेगावरोड, गडचिरोली.फक्त दूरध्वनी- 7775041086