जनआरोग्य योजना भारी, मदत केंद्रामुळे मिळतोय लाभ घरोघरी

86

🔹आ.डॉ.गुट्टे यांची संकल्पना : हजारो नागरिकांची नोंदणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6नोव्हेंबर):-सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा मोफत पध्दतीने देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हि योजना हाती घेतली आहे. त्या योजनेचा लाभ घरोघरी पोहोचविण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे संचलित शासकीय योजना मदत केंद्राने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जनआरोग्य योजना भारी, मदत केंद्रामुळे मिळतोय लाभ घरोघरी हे चित्र गंगाखेड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात निर्माण झाले आहे.

आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना ५ लाख रूपयांचे उपचार अगदी मोफत दिले जातात. त्यामध्ये १३५६ आजारांचा समावेश आहे. राज्यातील १०४५ रूग्णालयांना हि योजना लागू आहे. त्यातून गरजूंच्या आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णाचे आरोग्य सदृढ होण्यास मदत झाली आहे.

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये नागरिकांना एक रुपयाही रोख भरावा लागत नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे.

शहरातील राम-सीता सदन येथील शासकीय योजना मदत केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या आयुष्मान योजनेत नावनोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो हि कागदपत्रे आवश्यक आहेत.

आयुष्यमान भारत हि महत्त्वकांक्षी योजना असून
देशातील करोडो कुटुंबांना तिचा फायदा होत आहे. कॅन्सर, हृदयरोग, डायलेसिस रुग्णांना याचा मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.