जगभरातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे! (आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस विशेष.)

42

 

 

_हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. जगभरातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे हेच त्याचे एकमेव ध्येय आहे. दुसऱ्या महायुद्धात दि.१७ नोव्हेंबर १९३९ रोजी नाझींनी प्राग विद्यापीठातील ९ विद्यार्थी आणि अनेक प्राध्यापकांना ठार मारले होते. एवढेच नाही तर जवळपास बाराशे मुलांना या शिबिरात पाठवण्यात आले होते, त्यापैकी मोजकीच मुले जगू शकली. त्या मुलांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अशी ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखात वाचा…. संपादक._

लाखो विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जातात. भारताबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश विद्यार्थी रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे जातात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त, आपण या मुलांच्या करिअरसाठी त्याग आणि समर्पणाच्या भावनेचा आदर केला पाहिजे. घरापासून दूर शिकणारे हे विद्यार्थीही होमसिकनेसचे बळी ठरतात. अनेक वेळा त्यांना भाषेच्या समस्या, सांस्कृतिक विविधता आणि आर्थिक संकटांनाही सामोरे जावे लागते. देशादेशांतर्गत वादात, युद्धांत या निरागस, निष्पाप, निरपराध विद्यार्थ्यांचा नाहक बळी जावयास नको. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने जगाला या हुशार मुलांचा आनंद साजरा करण्याची संधी मिळते.
विद्यार्थी संघटना, चळवळ, बहुसांस्कृतिकता आणि त्याचे पडसाद यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता १७ नोव्हेंबर रोजी मागील ८० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस पाळला जातो. या दिवशी चेकोस्लोवाकिया देशात झालेल्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता, या दिवसाचे निमित्त साधून विद्यार्थी कार्याचा सन्मान करणे या हेतूने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याऐवजी पाळला जातो, असे म्हणण्याचे कारण म्हणजे याच दिवसाशी संबंधित एक दुर्दैवी घटना देखील इतिहासात घडून गेली आहे. नाझी काळात १७ नोव्हेंबर १९३९ रोजी चेकोस्लोव्हाकियावर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निदर्शने काढत आंदोलने पुकारली होती. या विद्यार्थ्यांवर पलटवार करताना नाझी सैन्याने नऊ जणांना जीवे मारले, तर १२०० जणांची कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी केली. यामध्ये अनेकांना निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले होते, अशातच जान ओप्लेताल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या व अन्य हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो.
या घटनेनंतर चेकोस्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्याने सन १९३९च्या उत्तरार्धात चार्ल्स विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून या दिवशी काही सांस्कृतिक प्रात्यक्षिके करून साजरा केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या नावाने हा दिवस पहिल्यांदा १९४१ साली इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिलतर्फे लंडनमध्ये साजरा करण्यात आला होता. कालांतराने इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स आणि युरोपीयन नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स या संघटनांनीदेखील हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. दरम्यान या घटनेच्या नंतरही याच दिवशी काही महत्वाच्या घटना देखील योगायोगाने घडत गेल्या. यामध्ये ग्रीसमधील अथेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सन १९७३साली तिथल्या लष्करी राजवटीविरोधात पुकारलेले बंड सन १९८९च्या सुवर्णमहोत्सवी वर्षी सोशालिस्ट युनियन ऑफ यूथ या संघटने तर्फे कम्युनिस्ट झेक सरकारविरुद्ध छेडलेले आंदोलन या घटनांचा समावेश आहे. तसेच बर्लिनची भिंत पाडल्यानंतरही इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंट तर्फे या दिवशी आनंद साजरा करण्यात आला होता. नोव्हेंबर २००४मध्ये मुंबईत वर्ल्ड सोशल फोरममध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांविषयी कार्यक्रम केला होता.
यंदाही हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जातो. या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून या लढ्यांमधून बलिदान दिलेल्या विद्यार्थ्यांचे स्मरण केले जाते. एका अर्थी हा दिवस विद्यार्थी हुतात्मा आदरांजली दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस भारतासाठी राष्ट्रीय अपस्मार दिनसुद्धा आहे. देशाच्या धामिर्क, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत बदल घडवून आणण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असते. ही त्यांची क्षमता ओळखूनच युरोपीयन युनियन विश्व विद्यार्थी दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असते. इथल्या विद्यार्थ्यांनी कोलम्बिया, इराण, झिम्बाब्वे यासारख्या देशांत होणाऱ्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला आहे. “शिक्षण ही मुठभरांचीच मक्तेदारी नको, शिक्षण सर्वांसाठी हवे” हा त्यांचा आग्रह आहे. समाज घडवण्यात तरुण विद्यार्थी नेहमीच आघाडीवर असतात, त्यांचा उच्चरवातील आवाज राज्यकर्त्यांना असह्य होतो आणि अखेर ते नमतेही घेतात. हे देशोदेशी आढळून आलंय. अर्थात या झाल्या संघर्षाच्या कहाण्या. पण आजच्या तथाकथित शांततेच्या काळात विद्यार्थ्यांचे काय हाल होताहेत, त्यांचा आवाज, त्यांची मते सर्रासपणे धुडकावली जात आहेत. मात्र विद्यार्थी आंदोलनाकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.
!! आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या समस्त विद्यार्थीवर्गास हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


– संकलन –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.