आ.डॉ. रत्नाकर गुट्टे संतापले : वीज आढावा बैठकीत धरले अधिकाऱ्यांना धारेवर

    94

     

    अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी

    गंगाखेड (प्रतिनिधी):-
    नागरिक व शेतकऱ्यांना नियमितपणे वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी दर दोन महिन्याला अधिकारी, नागरिक व शेतकऱ्यांची बैठक घेत असतो.‌ त्यात शेतकरी व नागरिक आपल्या अडचणी अधिकाऱ्यांना सांगतात. अधिकारी माझ्यासमोर हो ला हो करतात. मात्र, कामे वेळेवर करीत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात. फोन बंद करून बसतात. परंतु, यापुढे हे चालणार नाही. शेतकरी व नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागली पाहिजेत. त्यांची अडवणूक होता कामा नये. तुम्हाला काय अडचणी आहेत. ते तुमच्या संचालक महोदय समोर सांगा, अशा संतप्त शब्दात गंगाखेड विधानसभेचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी वीज अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
    महावितरण कंपनीच्या वतीने परभणी जिल्ह्याच्या विविध विजेच्या तक्रारी व निवारण बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षकांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यात वीज वितरण संबंधित विविध समस्या व अडचणी आ.डॉ.गुट्टे यांच्याकडून मांडण्यात आल्या. तसेच त्यांनी काही पर्याय व उपाय विषयी प्रदीर्घ चर्चा केली.
    विजेच्या पुरवठा बाबतीत अनेक समस्या आहेत. नियमाने वीज पुरवठा होत नाही. शहरी आणि ग्रामीण भागात सुध्दा सातत्याने वीज गायब असते. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, असा आग्रह आ.डॉ.गुट्टे यांनी एमएसईबी होल्डींग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्याकडे धरला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
    परिणामी, पाठक यांनी आ.डॉ.गुट्टे यांच्या सूचनेची गंभीर दखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करा. लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या बाबी गांर्भीयाने घ्या आणि कारभार गतिमान करा. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली.
    याप्रसंगी स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, मोदी सरकारने देशभरातील विजेचे जाळे मजबूत करण्यासाठी आरडीएसएस ही योजना लागू केली आहे. त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात ४२ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. आगामी दोन वर्षांत ही कामे पूर्ण झाल्यानंतर अधिक दर्जेदार वीज पुरवठा होईल.
    या बैठकीस स्वतंत्र संचालक विश्वास पाठक व आ.डॉ.गुट्टे यांच्यासह परभणी मंडळ व नांदेड परिमंडळ कार्यक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‌
    अडचण नेमकी काय? अधिकाऱ्यांची खरडपट्टी
    नियमानुसार शेती व गावठाण करीता सुरळीत व नियमित वीजपुरवठा देण्यासाठी तुमची नेमकी अडचण काय आहे? साहित्याचा तुटवडा आहे की तुमची इच्छा शक्ती नाही? तुम्ही तुमची कार्यपद्धती बदलणार आहात की नाही? कधी पोलचा तर कधी मीटरचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मात्र नेमका तुटवडा काय आहे? हे आधी निश्चित करा, अस म्हणत आ.डॉ.गुट्टे यांनी महावितरणच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.