श्रम विकणारे इमान विकायला का लागतात?

275

 

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा खूप मारल्या जातात.परंतु तसे आचरण केले जात नाही. कष्टकरी मजूर कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना तर कसलेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. त्यांचे संयुक्तिकपणे शोषण करणारी समाज व्यवस्था सर्वच ठिकाणी दिसते. भारत हा कधीकाळी कृषिप्रधान देश होता.समाजात जाती व्यवस्था होती. आणि जातीने आखून दिलेल्या कामानुसार लोक काम करीत होते,त्यात स्पर्धा नव्हती,मजूर पण कुशल कारागीर होता. त्याला गुलामा सारखे वागणूक दिली जात होती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८८४ ब्रिटिशांच्या कडे मागणी केली होती सर्वांना मोफत प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य मिळाले पाहिजे. खूप संघर्ष करून ते भारतातील लोकांना मिळत होते. आता प्राथमिक शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आल्या त्याच बरोबर प्रत्येक तालुक्यात जिल्हात असलेले सरकारी दवाखाने आरोग्य केंद्र सुद्धा बंद करण्यात आले.त्यामुळे असंघटीत कष्टकरी समाजाच्या मुलांना लाचार कंत्राटी कामगार गुलाम बनविल्या जात आहे.म्हणूनच श्रम विकणारे कष्टकरी कामगार मतदार बनून मजबूर होऊन इमान विकायला लागले.
आज ही देशात ९३ टक्के समाज हा असंघटित कामगार मजूर म्हणूनच गणल्या जातो. त्यांच्या अधिकृतपणे नोंदणी होऊन संघटना स्थापन होतात, पण त्या समाज व्यवस्थे समोर टिकाव धरू शकत नाही. उलट ७ टक्के संघटित कामगार,कर्मचाऱ्यांच्या ५५ हजार नोंदणीकृत संघटना आहेत,त्यांचे समाज व्यवस्थेवर आणि शासन यंत्रणेवर भक्कमपणे पकड आहे.त्यांच्या कोणत्याही सुख सुविधेच्या विरोधात समाज व शासन कारवाई करण्यास असमर्थ आहे.त्यांना त्यांच्या मुलामुलींना मिळणाऱ्या शिक्षण, आरोग्य लहान पणापासूनच्या सुख सुविधांचा विचार केल्यास प्रचंड तफावत स्पष्टपणे दिसून येते.
असंघटित कामगारांच्या मुलामुलींना आज बालवाडी पासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देऊन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण,१०० यूनिट्स मोफत वीज,फुकट रेशन सरसकट,आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट,ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणाऱ्या आहेत.त्यांचा खरा लाभार्थी शासकीय अधिकारी,कर्मचारी आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी जास्त असतो. त्यामुळेच संघटित कामगार असंघटित अधिक असंघटित लाचार श्रम विकणारा आणि इमान विकणारा मोठा मतदार आहे तो कायमस्वरूपी लाचार गुलाम राहावा अशीच मनुवादी समाज व्यवस्था देशात राबविण्यात येत आहे.
देशात सध्या जवळपास ६७ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे ती सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच गणली जाते,ती कोणत्याही राज्यात राजकीय पक्षाची मोठी आधार शक्ती आहे,तिची अवस्था घरका नां घाटका अशी आहे.ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण,मोफत वीज,सरसकट कर्जमाफी दिली जाते.त्यामुळेच त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणारी आहे.त्यांचा कोणत्याही विचारधारेच्या राजकीय पक्षावर विश्वास राहिला नाही. सर्वच चोर आहेत अशी त्यांची भावना झाली आहे.गेल्या वीस पंचवीस वर्षात तशीच शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे,त्यातून लाचार गुलामच निर्माण होतील अशी नियोजन बद्ध योजना राबविण्यात येत आहे.यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच घेतली जात नाही.झाली तरी त्यात कोणीच नापास केल्या जात नाही.९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे.तो सुशिक्षित असूनही त्याला लिहता वाचता येणार नाही. त्यामुळेच तो राजकीय पक्षाच्या नेत्याचा विश्वासू कार्यकर्ता असणार आहे, त्याची योग्य खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की तो हजारो असंघटित कामगार सुशिक्षित बेरोजगार आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा भक्त होत आहे.
ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक,बहुतांश ठिकाणी तरुणाच्या हातात महागड़े स्मार्ट मोबाईल,१५० सीसी च्या मोटर बाईक्स, तोंडात गुटखा,सिगारेट रुबाबदार बोलणे दादा,काका,अण्णा,भाऊ,भाई च्या भरोशावर उच्च उड्या मारून नगरात, विभागात दहशत निर्माण करतात. कोण कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असतो. आता हीच तरुणाई या गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणत आर्थिक शोषण करून करोडपती झाले आहेत.त्यातील फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलायला तरुण सहज उपलब्ध असल्यामुळे फुकट जेवण,फुकट वीज,थोडासा बेरोजगार भत्ता,फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद झाली आहे आणि भविष्यात अनेक युवा पिढी अपंग,लाचार गुलाम होणार आहे.त्यामुळेच देशात सर्वच क्षेत्रात कायम चालणारे काम सुद्धा कंत्राटी पद्धतीने चालणार आहे.सरकार आणि खाजगी मालक कंत्राटदार नेमणार तो कंत्राटदार कंत्राटी कामगार त्यांच्या मर्जीने ठेवेल.त्याविरोधात बोलल्यास कायम कामावरून हकालपट्टी ठरली आहे.
आजच्या तरुणाकडे एक ध्येय उदिष्ट जिद्द असायला पाहिजे,कष्ट त्याग करण्याची तयारी असली पाहिजे.हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार. कोणतीही वस्तू फुकट पडत नसते, यासाठी लागणारा निधी जो ग्राहकांकडूनच ५-६ टक्के कर म्हणून वसूल केल्या जातो. शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनांवर महागाईच्या रुपाने वसूल केला जातो पण तो शेतकऱ्यांना दिला जात नाही. शेतकऱ्याच्या शेतीतील अन्न धन्याला एम.आर.पी नाही. पण इतर सर्व उत्पादनाला एम.आर.पी असते.त्याचा हिशेब लागत नाही.
स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती.तेव्हा ७७ टक्के लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नको, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून त्याला विरोध केला होता. जगातील लोकांना स्विट्झरलंडची सौंदर्य,सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द, कष्ट,कर्तव्यनिष्ठता मेहनत दिसत नाही.ते आपण सुद्धा विसरतो.भारत हा कृषिप्रधान देश होता सुज्लाम,सुप्लाम सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून ओळखला जात होता.
आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट देण्याची घेण्याची मानसिकता सोडावी लागेल.आणि धर्माची अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे.सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.प्रत्येक हाताला काम आणि श्रमाला योग्य दाम दिल्यास मोफत घेण्याची देण्याची गरज पडणार नाही.अन्न फुकट का पाहीजे?. ते खाण्यासाठी पैसे नाहीत म्हणूनच ना?.ते सरकार का देते?.भूकबळी जाऊ नये म्हणूनच ना ?. श्रम विकणारे इमान विकायला का लागतात?.त्यांना मजबूर कोण करतो.धर्माच्या नांवाने होणारे शोषण कोणालाच दिसत नाही. राजकीय वर्चस्वासाठी जात दांडगे, धनदांडगे याचं असंघटीत कष्टकरी कामगारांना लाचार गुलाम बनवून ठेवतात. असंघटीत कामगारांच्या मुलामुलींनी शिक्षणात प्रगती करून आर्थिक प्रगती केली तर त्याला ही शेवटी मानसिक दुष्ट्या लाचार गुलाम बनविल्या जाते.तोच मग मागासवर्गीय जातीच्या सेलचा राजकीय पक्षाचा अध्यक्ष बनविला जातो. मग पुनःपुन्हा श्रम विकणारे इमान विकायला लागतात.असंघटीत समाजातील कामगार मजुरांनी संघटीत झाले पाहिजे. संत,महापुरुषांचा इतिहास वाचून प्रेरणा घेतली पाहिजे.आणि त्यानुसार आचरण केल्यास श्रम विकणारे इमान विकायचे थांबतील. त्यामुळे मग शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही.जगातील ज्या काही क्रांत्या झाल्या त्या कामगारांनी केल्या असा इतिहास आहे.त्यासाठी असंघटीत कामगारांनी इतिहास वाचला तर इतिहास घडविता येईल.

सागर रामभाऊ तायडे
भांडूप, मुंबई.
९९२०४०३८५९