प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत आतापर्यंत 40 हजार 610 मातांनी घेतला सहभाग

30

🔸मातांसाठी योजना ठरतेयं आधार

🔹योजनेचा लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.31जुलै):-गर्भवती महिलांना व त्यांच्या प्रसूतीनंतर त्यांना पोषण आहार मिळावा व मातामृत्यू, बालमृत्यू दरात घट व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने 1 जानेवारी 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 40 हजार 610 मातांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. तर योजनेअंतर्गत 17 कोटी 34 लाख 92 हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

गर्भधारणेत व प्रसूतीनंतर बालकांना पोषण आहार आणि स्तनपान आवश्यक असते ते मिळू शकत नाही. परिणामी ते बालके कुपोषित होतात व माता अनेक आजारांना सामोरे जातात. हे सर्व लक्षात घेऊन अशी परिस्थिती देशांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

हे असणार लाभार्थी:

सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळेल. 1 जानेवारी 2017 नंतर सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनपान करणारी महिला आणि बालके या योजनेस पात्र राहतील.

लाभ घेण्यासाठी ही लागणार आवश्यक कागदपत्रे:

पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पतीचा आधार कार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, माता बाल संरक्षण कार्ड यांची प्रत आवश्यक असणार आहे.

असा मिळणार टप्प्यानुसार लाभ:

पहिल्या अपत्यासाठी मातेला रुपये 5 हजार लाभ मिळणार आहे. गरोदरपणाची नोंद शासकीय आरोग्य संस्थेतील एएनएम यांच्याकडे मासिकपाळी चुकल्यानंतर शंभर दिवसांच्या आत केलेली असल्यास पहिला लाभ रुपये 1 हजार मिळणार आहे. गरोदरपणाच्या 6 महिन्यात (180 दिवस) किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असल्यास दुसरा लाभ रुपये 2 हजार मिळणार आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद व बाळाचे 14 आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केलेले असल्यास तिसरा लाभ रुपये 2 हजार मिळणार आहे.