राष्ट्रवादी नेते अजित दादा गटाला अधिकृत मान्यता मिळूनही सातारा जिल्ह्यात उदासीनता

307

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.7फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये गेले पाच दशक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ जोडलेली आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार असे समीकरण होते पण आता ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला असून घड्याळ चिन्ह सुद्धा त्यांच्या वाटेला आलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालक झाले असले तरी त्यांच्याच सातारा जिल्हा या बालेकिल्ल्यात या राजकीय घडामोडी बाबत उदासीनता दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर २४ वर्ष पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला व इतर पक्षात गेले त्यांना सुद्धा यश मिळाले असले तरी मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजित दादा पवार गटात गेलेले आदरणीय विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबरच अनेक राष्ट्रवादी मधील दुसऱ्या फळी व तिसऱ्या फळी अशा दहा फळ्यातील कार्यकर्त्यांनी मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र केला व नवीन गटांमध्ये जाण्यातच धन्यता मानली.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून शिवसेना व अपक्ष अशा चाळीस आमदारांनी वेगळा घरोबा केला त्यानंतर न्यायालयात दावे प्रति दावे झाले. या संपूर्ण घडामोडीमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी आहे .त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण सुद्धा मिळाले. या गोष्टीचा मोठा जल्लोष सातारा जिल्ह्यात निलेश मोरे एकनाथ ओंबळे, बाळासाहेब जाधव ,महेश गोडसे तसेच अनेक शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा केला. फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण व कंदी पेढे वाटून स्वागत केले. परंतु महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत चिन्ह मिळून सुद्धा फारसा गाजावाजा अथवा अनुदोत्सव साजरा झालेला नाही.

किंबहुना घड्याळ हे अधिकृत चिन्ह मिळून सुद्धा अनेकांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वेळ नसल्याचे सिद्ध झालेले आहे. राजकारणामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी अनेक घटनेची नोंद घ्यावी लागते तसेच त्या घटनेबाबत जनतेच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण करावी लागते. याला आता अजित दादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपवाद ठरलेले आहे. सेनापती ताकदवान असला तरी बाकीच्या सैनिक जर आळशी व पराक्रमी नसले तर युद्ध अथवा लढाई अथवा निवडणुका जिंकता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांनीच आता याबाबत मार्गदर्शन करावे अन्यथा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आता तो अस्तित्वात नाही. याची मात्र नक्कीच नोंद होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी १० जुन १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.

२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर अनेक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला परंतु ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे पुतणे अजित दादा पवार यांनी वेगळा गट केल्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन शकले पडले आता एक गट महाविकास आघाडी सोबत तर दुसरा गट महायुती सोबत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष हाच आता भविष्यात मोठा सत्ताधारी व विरोधी पक्ष म्हणून दोन गटात विभाजन झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने राजकीय रंगत येणार नाही. असा एक सूर आता उमटू लागलेला आहे.

चौकट –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय हे जुन्या काँग्रेसने स्थापन केलेल्या सातारा दूध संघ मध्ये आहे परंतु ते नेहमी बंद असल्याने फारसं राजकीय वृत्त तयार होत नाही इतर पक्ष मात्र मिळावे शिबिरे कार्यशाळा घेत आहे पण अजित दादा पवार गटामध्ये शांतता असून लवकर दहा पक्ष भाजपमध्ये विनंती करून घेईल का ?अशी शंका उपस्थित केली जात आहे