स्नेहाचे प्रतीकव – रक्षाबंधन

29

श्रावण महिना म्हटले की, निसर्गाचे खरे वैभव पाहण्यासारखे असते. निसर्गाचे वर्णन बालकवींनी आपल्या कवितांमधून केलेले आहे.”श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे”.
श्रावण शुद्ध पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. कोकणात समुद्राला नारळ अर्पण करून पूजा केली जाते. आज आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तर आपली बहिण शिकावी, मोठी व्हावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिचा सुखाचा संसार नांदावा, तिला कोणताही त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला बहिणीबद्दल वाटत असते. भाऊ बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी पौर्णिमेला. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते.व भावाच्या आयुष्यात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊराया सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते, तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन ओवाळणी आरतीत घालतो. श्रावणी करण्याचा प्रकार याच दिवशी केला जातो. श्रावणी म्हणजे मन शुद्ध करणे होय.
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह आणि उत्सवाचे पर्व म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भारताच्या प्रमुख सणापैकी एक आहे. रक्षाबंधन हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहे ती अशी की महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या हाता च्या बोटाला जखम झाली होती. त्या जखमेतून रक्त वाहत होते तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदी ने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या रक्ताने माखलेल्या बोटाला बांधले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण केले.
रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या नात्याचा, पवित्र प्रेमाचा उत्सव आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते, या सणाला दृष्टी परिवर्तनाचा सण असेही म्हटले जाते, कारण ज्यावेळी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते त्यावेळी त्याची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे पाहून तो आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. आपल्या बहिणीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही पाहिजे, आपली बहीण समाजामध्ये ताठ मानेने वावरली पाहिजे, याची जबाबदारी घेतो.राखी बांधण्यापूर्वी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या कपाळावर टिळा लावते. हा कपाळी टिळा म्हणजे शंकराप्रमाणे तिसरा डोळा आहे, या तिसऱ्या डोळ्याने वासना, भोग, राग , लोभ, मत्सर, अशा सर्व विकारांकडे भावाने पहावे म्हणजे हे सर्व विकार नष्ट होऊन जातील असा बहिणीचा हेतू असतो. यानंतर बहीण भावाचे औक्षण करते ,त्याला ओवाळते, त्याच्या हातावर राखी बांधून त्याला मिठाई भरवते. राखीचा धागा केवळ साधा, सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम, आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे.

✒️सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
मो:-८००७६६४०३९.