वर्ध्यात खासदाराकडून शेतकऱ्यावर दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

  49

  ✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  वर्धा(दि.3ऑगस्ट):-नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित जमीन आपल्या नावावर असल्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्याला भाजप खासदार रामदास तडस यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  देवळी येथील नागरी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही पाइपलाइन टाकण्यात येत असलेली जमीन आपली असल्याचा दावा करीत शेतकऱ्याने विरोध दर्शविला. यावरून वाद वाढल्याने खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्याला शिविगाळ करीत दगडफेक केली. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परस्परविरोधी तक्रारीही पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पण, खासदार तडस यांनी मात्र या घटनेचा विरोध करत असं काही घडलं नसल्याचा दावा केला असून लोकांच्या पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे.

  देवळी येथील अशोक काकडे यांची शेत सर्व्हे क्रमांक पाचमध्ये ०.५८ हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर बाबाराव गुजरकर यांच्यासह सुमारे ४७ जणांनी अतिक्रमण केले. पक्की घरे बांधून राहू लागले. नगर परिषदेने या लोकांना नागरी सुविधा पुरविल्या. रस्ते, वीज, पाणी आणि नालीची सुविधा उपलब्ध करून दिली. अतिक्रमित जागा असतानाही या लोकांना घरकुल मंजूर करण्यात आल्याचा काकडे यांचा आरोप आहे. याविरोधात त्यांनी तहसील कार्यालयात दाद मागितली. तहसीलदारांनी हे अतिक्रमण अवैध असल्याचे स्पष्ट केले. पण, अतिक्रमण न्यायालयाच्या माध्यमातून हटविण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट केले. हा वाद कायम असतानाच पाइपलाइनचे बांधकाम केले जात असल्याने रविवारी काकडे यांनी विरोधात आवाज उठविला. अतिक्रमण करू नका, अशी विनंती करू लागले. तरीही कुणी दाद देत नसल्याने स्वत: नालीत उतरले. याच सुमारास खासदार रामदास तडस आले. त्यांच्याशी काकडे यांचा वाद झाला. वाद वाढल्याने संतापलेल्या तडस यांनी नालीजवळील दगड आपल्याला मारल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. पोलिसांनी त्यांना रोखून धरले. गावकऱ्यांनी या घटनेचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.

  संबंधित शेतकरी सरकारी कामात अडचणी आणत होता. म्हणूनच सरकारी कामात आडकाठी आणू नकोस असं सांगण्यासाठी मी तिथं गेलो होते. तिथं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकला नाही. त्यानं मला शिवीगाळही केली. मात्र, मी त्याच्यावर दगडफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण मी त्याच्यावर एकदाही दगड फेकला नसल्याचं खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केलं आहे.

  माझ्या जागेत कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेकडून बांधकाम करण्यात आलं. त्यावेळी मी बांधकाम करण्यास विरोध केला व तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यावेळी संबंधित अधिकारी माझ्या जागेत भेट देण्यास आले होते. तेव्हा खासदार रामदास तडसही उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी हे काम थांबणार नाही असं म्हटल्यावर मी माझे जागेत जाऊन उभा राहिलो व तेव्हाच त्यांनी माझ्यावर दगडफेक केली असा आरोप शेतकऱ्यांनं केला आहे. यासंबंधीत तक्रार दाखल केली असून मला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.