भिमजयंती साजरी करण्याचे स्पिरीट लोकसभा निवडणुकीत दाखवा

457

 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या नांवाचा जय जय कार करणे आता थांबवा. त्यांनी दिलेल्या संदेशाची त्यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करा. म्हणजेच भिमजयंती साजरी करण्याचे स्पिरिड लोकसभा निवडणुकीत दाखवा.शंभर टक्के सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमा नुसार बदलत राहतो. त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात. वेळ, काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही.म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात. उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठ्या उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही..म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल, सभागृह बांधण्यात आले आहेत.
१९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हती.पण आता समाजाने बदलेलच पाहिजे. आम्ही खेडे सोडुन शहरात आलो, शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात नाही घडला. खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्यासाठी संघर्ष करून आता स्वतःच्या घरात राहत आहोत. तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्या साठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता. सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता. आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता. झोपडपट्टी वाचविण्यासाठी बुद्ध विहार होती. म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो.बसत होतो, चर्चा करून कार्यक्रम घेत होतो. आता त्यांची गरज वाटत नाही.कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर,लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.म्हणुन एकत्र बसण्याची गरज कोणालाच राहली नाही.
आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत.पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत.कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे.म्हणुन एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल.बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल.ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत.आणि विशेष म्हणजे पिणारे खाणारे एकत्र बसू शकतात. सुशिक्षित आणि सुरक्षित नोकरी करणारे यांची इथे गरज नाही.ते असंघटीत समाजाला चालत नाही.कारण ते पित नाही.किंवा तोडपाणी करून खाऊ पिऊ घालत नाही.ते सर्वा कडून सारखी वर्गणी काढण्याची अपेक्षा करतात.
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो.हीच एकजूट महानगरपालिका,विधानसभा,लोकसभा निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?.भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो,पण तो लायटिंग,डेकोरेशन,ब्रेक डांस,कव्वाली वर खर्च करतो.आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो.पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक, आमदार की राजकीय दलालांच्या पाया पडतात.विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत. त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी, आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाही. मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार किंवा मंदिर बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, गोरगरिबांना आरोग्य सेवा, शिक्षण देणारी, किंवा ज्ञान देणारे ग्रंथालय का निर्माण केल्या जात नाही. त्यासाठी नोंदणीकृत संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवली जात नाही. त्यामुळेच दरवर्षी आमचा गुणाकार होतांना दिसत नाही,तर भागाकर होत जातो. ही क्रांतिकारी विचारांची चळवळ आहे काय? तीच खरी आंबेडकरी विचारांची चळवळ असण्यासाठी जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट लोकसभा, विधानसभा निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक, आमदार व खासदार आपला येऊ शकतो.
आता राज्यात व केंद्रात आर एस एस प्रणित सरकारे आहेत.त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणारा प्रसिद्ध क्रूरकर्मा प्रधानसेवक संविधानिक कोणतेही संकेत न पळता धडाधड निर्णय घेत आहे.जे निर्णय त्याला घेता येत नाही ते सरळ सुप्रीम कोर्टा द्वारे राबविले जात आहेत.त्यांच्याशी राजकीय टक्कर देण्यासाठी आपल्या कडे कोणता राजकीय पक्ष आहे.महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत,परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?.एकही नेत्यांचा मतदारसंघा नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?.यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही.वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला त्याची जागा दाखविली पाहिजे की नाही?.असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना कडून राजकीय दलाली करतात त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही.आजच्या घडीला राज्य पातळीवर एकमेव पक्ष कोण असेल तर तो वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांच्या नेतृत्वाचे राज्य पातळीवर पक्ष संघटना उभी राहू शकते आणि राज्यातील पक्षांना आव्हान देऊ शकते.करीता वंचित बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की वंचित बहुजन समाजातील लोकांचे काय? कार्यकर्ते, नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात, आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.
आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेला पक्ष सर्व आघाडी वर मात करीत आहे.केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे. म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था, संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो.करीता विचारांची जयंती साजरी करण्यात यावी. नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे म्हणणार नाही.कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार,मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो.नेहमी तिरस्कार करणारे लोक आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून प्रचंड अस्वस्थत होत असते. प्रत्येक निवडणुकीत यांनी भिम जयंतीचे स्पिरीट दाखवले तर राजकीय गणिते बदलल्या शिवाय राहणार नाहीत. हे सर्वच जाणकारांना वाटते. आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंत च्या निवडणूकात आपण पाहिले आहे. येत्या काळात स्वाभिमानाने जगायचे असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे स्पिरीट निवडणुकीत दाखवावे लागेल. बुद्धी भेद करणाऱ्या लबाड, लांडगे, कोल्हे शेळ्या बकऱ्या म्हणून घेणाऱ्या कलम कसाई, पत्रकार, लेखक साहित्यिक यांच्या पासून सावध राहावे लागेल.
सत्य सांगणारी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण करून राजकीय परिवर्तन घडवा नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. २०२४ नंतर आर एस एस प्रणित भाजपा केंद्रात सत्तेवर आल्यास गंभीर परिणामास तयार राहा.त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणता ही ठोस कार्यक्रम योजना नाही.व्यक्ती पूजा मूर्ती पूजा करून आपण जयंती साजरी करत असाल तर क्रांतिकारी विचारांचे काय?.तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे स्पिरीट निवडणुकीत दाखवावे लागेल.सत्य परिस्थिती आहे की नाही?.यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करावे.आणि भिमजयंती साजरी करण्याचे स्पिरीट निवडणुकीत दाखवावे.मी मांडलेले विचार चुकीचे असतील तर निर्भीडपणे प्रतिक्रिया व्यक्त करा.

सागर रामभाऊ तायडे,
भांडुप,मुंबई
९९२०४०३८५९