निवडणुका : पेड पत्रकारांना सुगीचे दिवस

170

 

सार्वजनिक लोकसभेच्या तारखा जाहीर होताच व महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात आघाडी निर्माण होताच वंचित बहुजन आघाडीबाबत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उलटसुलट लिहिताना व बोलताना दिसतात. हे बोलतच नाहीत तर सामाजिक माध्यमातूनही प्रसार होताना दिसतो. अभिव्यक्ती यु ट्युब रवींद्र पोखरकर,निर्भय बनोचे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार लोणे,निखील वागळे इत्यादी– यांनी खरी पत्रकारिता सोडून आणि सामाजिक कार्य सोडून महाविकास आघाडीसोबत मा. ॲड. प्रकाश आंबेडकर जुळवून घेत नाहीत, सांगा तुम्हाला किती जागा हव्यात? आम्ही आघाडीशी बोलतो. आंबेडकरांसाठी ही शेवटची संधी आहे अशा वल्गना करून व्हिडिओज व लेख लिहून ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना अपराधी पिंजऱ्यात कैद करण्याचा केविलवाणा प्रयोग करताना दिसतात. ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी आरएसएस,भाजप या फॅसिस्टवादी वृत्तीला आपल्या शिंगावर घेतले, सतत सभेतून त्यांच्या धोरणावर कठोरपणे हल्ला करतात त्यांना बीजेपीची बी टिम म्हणून हिणवतात, पण काँग्रेसचे जुने मंत्री भाजपात जातात,अर्ध्यापेक्षा शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी कांग्रेस भाजपात गेली तेव्हा मात्र ते भाजपाची बी टिम होत नाही! हा प्रकार फॅसिस्ट शक्तीला मदत करणे नव्हे काय? याबाबत मात्र यांचे मौन धारण दिसून येते.
वंचितचे बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत आहेत,पण महाविकास आघाडी वंचितसोबत नाही. इंडिया आघाडी उदयास आली तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते आणि विनंती करीत होते की,मला इंडिया आघाडीत जायचे आहे. आपण भाजप विरोधातील लढा सशक्तपणे उभा करू या. या म्हणण्याला इंडिया आघाडीने व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने महत्व दिले नाही. तरीपण बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्राथमिक स्वरूपात युती केली होती.ते तरी आघाडीत येण्याबाबत बोलणी करतील अशी अपेक्षा होती. बाळासाहेब म्हणत होते की, वंचित आघाडीला, महाविकास आघाडीसोबत घेण्याविषयी आमच्या वतीने आमचे वकील बोलतील.ती जबाबदारी त्यांचेवर सोपवली. ते सक्षम आहेत. बाळासाहेब आंबेडकरांकडून अजून विश्वासाची कोणती पावती हवी?. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या बैठकीत होत राहिल्या,पण उध्दवजी ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीची वकीली करता आली नाही. ठाकरेंच्या ऐवजी बहुतेक बैठकीला शिवसेना पक्षाचे संजय राऊत उपस्थित राहत होते. मधल्या गोटातून बाळासाहेब आंबेडकरांना कळले की, काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) यांना महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर नको आहेत. उद्धवजी ठाकरेंच्या हे जेव्हा लक्षात आले तेव्हा ठाकरेंनी बाळासाहेब आंबेडकरांच्या फोनला सुद्धा प्रतिसाद देणे बंद केले.अशी बातमी होती.
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीचा कुरघोडीपणा लक्षात आला. त्यांनी महाराष्ट्रात 42 सभांचे आयोजन केले.या लाखाच्या सभा झाल्या. या सभेत स्वतःचे पैसे खर्च करून लोकं आलीत.या सभा लोकवर्गणीतून झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) शिवसेना हे आपणास आघाडीत घ्यायला तयार नाहीत म्हणून बाळासाहेब हे सभेतून यांच्या पक्षनीति विरोधात बोलत होते.यात बाळासाहेबांचे काय चुकले? वंचित बहुजन आघाडीच्या सभेला जनतेचा मिळणारा उत्फुर्त प्रतिसाद पाहून व सामाजिक माध्यमाच्या रेट्यामुळे आघाडीतील घटक पक्षाने पुन्हा वावडी उठवायला सुरुवात केली. बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीचा घटक आहे. ते आमच्यासोबत आहेत. अरे वाह! निमंत्रण तर द्यायचे नाही, पत्रकारांनी विचारले तर म्हणायचे की, प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पुजा आहे?. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. आचारसंहिता लागली तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जागांचा तिढा सुटत नाही तरी बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागेवर सर्वस्वी पाठींबा देण्याचे जाहीर केले,तर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्याची गरज नाही. त्यांना कोणी पाठींबा मागितला? हे बोलणे प्रशंसनीय आहे काय? यानंतरही बाळासाहेब आक्रमक झाले नाहीत. ते शांत राहिले.नंतर महाविकास आघाडीतील बैठकीला वंचितला बोलावले. पण येथेही वंचितच्या नेत्यांना ताटकळत वाट पहायला लावली. बोलवायचे तर सन्मानाने बोलावलं पाहिजे असे कपिल पाटील म्हणतात ते यथायोग्य आहे. दाराच्या बाहेर उभे करायचे आणि शेवटच्या क्षणी जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा आत बोलवायचं याला आचारात्मक युती धर्म समजायचा काय?
बाळासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या बाजुने,लोकशाहीच्या बाजुने आणि फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात सतत भूमिका घेतली आहे. सन्मानजनक जागेचा प्रश्न नाही तर सन्मानजनक वागणुकीचा प्रश्न आहे. वस्तुस्थितीचा विचार न करता एककल्ली बाजु घेऊन फक्त बाळासाहेब आंबेडकर विरोधात लिहिणे व विचार मांडणे म्हणजे महाविकास आघाडीची सुपारी घेणे होय.हे प्रकार निवडणूक काळातच घडते. म्हणजे अशा लोकांसाठी निवडणुका सुगीचे दिवस असतात असे म्हणणे भाग आहे.

डाॅ.केशव मेंढे- नागपूर
फुले-आंबेडकर विद्वत सभा
( पूर्व विदर्भ समन्वयक)
मो. ९८९०२०६५७७