सांगलीत महाविकास आघाडीला भिकेचे डोहाळे !

100

 

दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो. 9561551006

सध्या संपुर्ण राज्यात महाविकास आघाडीला खुप चांगले वातावरण आहे. पण आघाडीत अजूनही एकवाक्यता नाही, आघाडीतल्या नेत्यांचा जिरवा-जिरवीच्या राजकरणाचा कंड अजूनही शमलेला नाही. सांगली जिल्ह्यातही हेच सुरू आहे. सांगली लोकसभेच्या मैदानातही हिच स्थिती आहे. आघाडीत जागा तुझी का माझी ? असा वाद सुरू आहे. शिवसेनेने परस्परच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहिर केल्याने कॉंग्रेसवाले नाराज आहेत. तर सगळ काही कळत असूनही राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गम्मत करतही आहेत आणि पहातही आहेत. त्यांनी पुढाकार घेवून आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली तर सांगलीचा तिडा सुटेल पण जयंतरावांची तशी इच्छा दिसत नाही. त्यांनी मौन पत्करले आहे. ‘मौनम सर्वार्थ साधनम’ या न्यायाने ते वागत आहेत. आघाडीत असेच चित्र राहिले तर सांगलीची येणारी जागा हातातून निसटू शकते. “तुला नाही मला नाही तर घाल कुत्र्याला !” असा प्रकार सांगलीत सुरू आहे. आघाडीच्या या वादात सांगलीत भाजपाचा फायदा होवू शकतो. भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर लोक नाराज आहेत. त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आघाडीने एकमुखी ताकद लावली तर संजय पाटलांना पराभूत करणे सोपे आहे पण आघाडीतली बिघाडी हे होवू दईल असे सध्या तरी वाटत नाही. सांगलीत आघाडीला भिकेचे डोहाळे लागल्यासारखी स्थिती आहे.

कॉंग्रेसचे तोंड एककीकडे, राष्ट्रवादीचे दुसरीकडे तर सेनेचे तिसरीकडे अशी स्थिती आहे. पानीपतावर लढणा-या सैन्यात जसा ताळमेळ नव्हता, तिथे सरदारांचे आप-आपसातले हेवेदावे जसे अंगलट आले तसेच चित्र सांगलीत आहे. महाविकास आघाडी आपल्या हाताने हक्काची जागा घालवणार आहे. आघाडीतल्या संरजामांना मोदी व भाजपा विरोधातल्या लढाईची तीव्रता अजूनही समजली आहे असे वाटत नाही. हे सगळे प्रस्थापित संरजाम आजही अंतर्गत लाथाळ्या, कुरापती, आडवा-आडवी, जिरवा-जिरवी करण्यात मश्गूल आहेत. शिवसेनेने सांगलीच्या जागेचा तिडा सोडवण्यासाठी संजय राऊतांना पाठवले आहे पण हा उपाय अंगलट येणारा आहे. संजय राऊतांंना सांगलीला पाठवणे म्हणजे “हगवणीला खर्ड्याचे औषध” देण्यासारखा प्रकार आहे. हा माणूस बोलून घाण करतोय असे मत सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे झाले आहे. गावाकडच्या भाषेत सांगायचे झाले तर संजय राऊत हागून घाण करतायत. त्यांनी अनावश्यक चालणा-या तोंडाला आळा घातला तर काही वाद निर्माणच होणार नाहीत, त्यांच्या काहीही बरळण्यामुळे नवे वाद होत असताना तिडा सोडवायला त्यांनाच पाठवणे हा उपाय अजब आहे. भाजपवाले ज्या पध्दतीने संकटमोचक म्हणून गिरीष महाजनांना पाठवतात व तिडा सोडवतात, तसे इकडे होत नाही. वाद सोडवायला पाठवला जाणारा माणूस नवा वाद निर्माण करणारा नसावा याची तरी खबरदारी सेनेने घ्यावी ना ? पण ती घेतली जात नाही. राऊतांनी आघाडी सरकार आणताना खुप चांगली भूमिका पार पाडली. जबरदस्त बँटींग करत आघाडीचे सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा निभावला पण त्यावेळी त्यांच्या समोर व सोबत शरद पवार होते. ती वेळ आणि ती माणसं वेगळी होती. इथं एका एका जागेसाठी अनेकांनी मुंडावळ्या बांधल्या आहेत. इथं प्रत्येकजण तुंबला आहे. त्याला काहीही करून बोहल्यावर चढायचेच आहे. अशावेळी चांगल्या पध्दतीने समन्वय साधणारा माणूस हवा असतो. तो स्वत: आक्रमक व फटकळ असता कामा नये. त्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असावी लागते. संजय राऊतांच्या बाबतीत यातलं काहिच नाही. ते सामनातल्या ऊत्सव पुरवणीतले रोखठोक सदर कुठेही चालवत असतात. त्यामुळे वाद सुटण्याऐवजी वाद अधिक चिघळला जातो. सांगलीत सध्या असेच चित्र आहे,

कॉंग्रेसने सांगलीच्या जागेचा विषय अस्मितेचा केला आहे. शिवसेनेनेही सांगलीचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. कॉंग्रेसने सांगलीत भूमिका बदलली तर देशात बदलेल ! असे संजय राऊत बोलत आहेत. संजय राऊतांची ही भाषा आगीत तेल ओतणारी आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने त्यांनाच तिडा सोडवण्यासाठी पाठवले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मनात आणले तर हा तिडा सहज सोडवता येईल पण जयंत पाटलांच्या मनातले राजकारण वेगळे आणि बाहेरचे वेगळे असते. सांगली जिल्ह्यातली भाजप संघ कमी आणि जयंत पाटील जास्त चालवतात. म्हणूणच सांगलीच्या भाजपाला, ‘भारतीय जनता पार्टी’ असं न म्हणता “जयंत जनता पार्टी” असे बोलले जाते. सांगलीत जो गोंधळ सुरू आहे त्याचा खरा सुत्रधार जयंत पाटीलच आहेत असे अनेकांचे मत आहे. ते ही गेले अनेक दिवस चिडीचुप आहेत. त्यांच्या पटावरचे घोडे, उंट कुठे, कसा व कुणाला शह देतात हे भल्या-भल्यांना कळत नाही. त्यांचा हत्ती कुणाच्या तंबूत घुसतो, कुणाचा तंबू उध्वस्त करतो ? याचा नेम नाही. कारण ते सावज टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायला सरसावत नाहीत. सावज टप्प्यात आणायची यंत्रणाही त्यांच्याकडे आहे पण त्यांच्या या टप्प्यातल्या कार्यक्रमाने अवसानघात होतो आहे. आघाडीची ताकद कमी होणार आहे. सांगलीची हक्काची जागा आघाडीला गमवावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यातले कॉंग्रेसवालेही खुपच खुषाल चेंडू आहेत. तहान लागल्यावर आड खांदायला सरसावणारे बहाद्दर आहेत. सांगलीत कॉंग्रेसला चांगले दिवस येवू शकतात पण नेते आळशी व चंगळबाज आहेत. त्यांना तळागाळात जाऊन काम करायचे नाही. पायाला व बुडाला माती लागू द्यायची नाही. लोकांच्यापर्यंत पोहोचायचे नाही. गत लोकसभेला एकमेकांची जिरवण्यासाठी हक्काची जागा सोडली आता जागेसाठी टाचा घासू लागलेत. सध्या तरी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यात चांगले सख्य दिसतय पण ते खरच आहे का ? हा ही संशोधनाचा विषय आहे. विश्वजीत कदम गोड बोलून विशाल पाटलांची पुंगी वाजवत तर नाहीत ना ? असाही संशय व्यक्त केला जातोय. जसा राजाराम बापू व वंसतदादा या दोन गटात वाद होता तसाच वाद कदम व पाटील गटात होता. सध्या विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांचे सुर जुळलेले दिसत आहेत पण ते कितपत खरे असतील ? हा प्रश्न पडतोच. कॉंग्रेसवाल्यांच्या आडवा-आडवीच्या आणि जिरवा-जिरवीच्या राजकारणात त्यांची सर्वांचीच जिरली आहे पण पक्षाचीही वाट लागली. अजून लोकांच्यात कॉंग्रेसबद्दल चांगले मत आहे. राहूल गांधींनी लोकांच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या आहेत पण सांगलीचे कॉंग्रेसी पुढारी अजूनही आपली खुराडी सोडून बाहेर पडत नाहीत, लढत नाहीत. हेवेदावे सोडत नाहीत, संरजामी मानसिकता सोडत नाहीत. त्यांची हिच मानसिकता पक्षाची वाट लावते आहे.