समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

79

 

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

केरळमधील ॲसिड हल्ल्यातील गुन्हेगार राज्याच्या विविध भागातून बेपत्ता होतात. ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या मुलींच्या घरासमोर या गुन्हेगारांना त्यांच्या कापलेल्या लिंगासह टाकण्यात येते. या वारंवार घडणाऱ्या घटना समाजात व्हायरल होतात आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागतात. मात्र ही कृत्ये करणाऱ्या अज्ञात कोण आहे याचा सुगावा लागत नाही. नेमका कोण असेल हा अज्ञात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपट हा मूळ मल्याळम भाषेत असून याचे मराठी रूपांतर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

“समाजात विक्षिप्त मानसिकतेचे लोक आणि त्यांचे विक्षिप्त कृत्य मनाला हेलावून टाकणारे असतात. समाजातील ही विक्षिप्तता दाखवणारा ‘ॲसिड’ (आघात) चित्रपट प्रेक्षकांना सादर करून जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.