पत्नीवर संशय घेवुन खुन करणा-या पतीस जन्मठेपेची शिक्षा (पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल)

250

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

पुसद:- (दि. 4 मे) उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील आरोपी गणेश नाथा पुरी याने पत्नीच्या चारित्रावर संशय घेवुन पत्नीचा खुन केल्याप्रकरणी गुन्हा सिध्द होउन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे.या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, उमरखेड तालुक्यात पोफाळी येथील आरोपी गणेश नाथा पुरी याचा विवाह राधाबाई अंदाजे वय ४० वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपी व त्याची पत्नी मयत राधाबाई हीचे चारित्रावर संशय घेवुन तिला मानसिक व शारीरिक त्रास देउन मारहाण करित असे. घटनेपूर्वी १५ दिवस आधी मयत राधाबाई हिला आरोपीने मारहाण केल्यामुळे मयत राधाबाई ही तिची मोठी बहीण कमलबाई नारायण गिरी हिचेघरी मौजे कोथळा ता. हदगांव जि. नांदेड येथे राहण्यास गेले असता त्यानंतर आरोपी ईतर नातेवाईकांना घेवुन मौजे कोथळा येथे जावुन पंचासमक्ष राधाबाई हिला त्रास देणार नाही व तिच्या चरित्रावर संशय घेणार नाही असे पंचासमक्ष कबुल करुन मयत राधाबाई हिला पोफाळी येथे नांदावयास घेवुन आला.दि.२४. मार्च २०१६ रोजी रात्री १०.०० वा.च्या सुमारास आरोपीने मयत राधाबाई हिला मौजे पोफाळी येथे राहत्या घरामध्ये कु-हाडीने मारहाण केली. त्यावेळेस तिने वाचवा वाचवा असा आवाज केला. त्यावेळेस घराशेजारील डॉ. अमोल प्रकाश पुरी हे घराबाहेर धावत आले. त्यावेळेस आरोपी हा मयत राधाबाई हिला घरातुन केसाला धरुन घराबाहेर ओट्यावर ओढत आणले. त्यावेळेस मयत राधाबाई ही रक्ताने माखलेली होती त्यावेळेस आरोपीचे हातामध्ये कु-हाड होती.

आरोपीने डॉ. अमोल प्रकाश पुरी याला बघताच त्याच्या हातातील कु-हाड डॉ. अमोल पुरी यांना फेकुन मारली व ती कु-हाड सिमेंट पोलच्या खांबाला अडली. त्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरुन पळुन गेला. त्यानंतर डॉ. अमोल प्रकाश पूरी यांनी राधाबाईला बघितले असता ती मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर डॉ. अमोल प्रकाश पुरी यांनी पो.स्टे. पोफाळी येथे जावुन आरोपीविरुध्द रिपोर्ट दिला. त्यावरुन आरोपीविरुध्द ३०२ भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.सदर प्रकरणाचा तपास सहा.पो.नि. सरदारसिंग अजाबसिंग ठाकुर यांनी केला व साक्षदारांचे बयाण नोंदविले. त्यानंतर आरोपी विरुध्द भरपुर सबळ पुरावा उपलब्ध करून दोषारोपत्र दाखल केले. सत्र न्यायालयामध्ये प्रकरण पुराव्या साठी लागल्यानंतर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्याकरीता सरकारी पक्षातर्फे एकुण १० साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये डॉ. अमोल प्रकाश पुरी, कलमबाई उर्फ रत्नकलाबाई नारायण गिरी, माधव केवळ पुरी, कैलास नत्थु हातमोडे, वैद्यकीय अधिकारी शेख मोहम्मद गौस यांची साक्ष महत्वाची ठरली.

मयत राधाबाई हिला कु-हाडीने मानेवर, चेह-यावर, डोळयावर, पाठीवर गंभीर जखमी करुन राधाबाई हिचा खून केल्यांनतर आरोपी हा पळून जावुन जनुना शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला मफलरने फाशी घेण्याचा प्रयत्न केला, परंतू मफलर तुटल्यामुळे आरोपी हा खाली पडुन जखमी झाला व त्याठीकाणावरुन आरोपीस अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर त्याची वेहद्यकीय तपासणी केली असता त्याचे कपडयावर रक्ताचे डाग असल्याचे न्याय वैद्यकीय अहवालामध्ये दिसुन आले. एकंदरीत मयत राधाबाई हिचा आरोपी गणेश नाथा पुरी हयाने कु-हाडीने खुन केल्याचे सरकारी पक्षाने सिध्द केले.सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे व सरकारी वकील अॅड. रवि केशवराव रुपुरकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी गणेश नाथा पुरी याचे विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायधिश क. २ श्रीमती एन. एच. मखरे यांनी आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा व १०,००० हजार रू. दंड तसेच दंड न भरल्यास सहा महीने साधी शिक्षा सुनावली.या प्रकरणामध्ये शासनाची बाजु सरकारी वकील अॅड. रवि केशवराव रुपुरकर यांनी प्रभावीपणे मांडली तर अधिकारी म्हणुन पो.हे.कॉ. राहुल मार्कन्डे यांनी काम पाहीले.