‘कुचर’ म्हणजे काय हो….?

  139

   

  आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात, ज्या लिहिण्याचे काम एक लेखक करतो. संपादक ते वर्तमानपत्रात छापून सर्वांपर्यंत पोहचवतो. मुळात असे नाही की त्या गोष्टी लोकांना माहिती नसतात. अर्थात त्या माहिती असूनही जे दुर्लक्षित राहतात किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते त्या बाबी आपल्याला लिहून लोकांना दाखवून द्याव्या लागतील. त्यातल्या त्यात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या तरी निदान सांगाव्या लागतीलच.
  आता हा वरचा ‘कुचर’ नावाचा शब्दच बघा की, भरपूर लोकं तशी वागतात पण आपण त्या प्रकारात आहोत हे कोणी कबूल करत नाही. मुळात या शब्दाची ओळख संबंध महाराष्ट्रात म्हणावी तशी नाही. ज्याला पर्यायी शब्द वेगवेगळ्या प्रांतात असेल. आमच्या मराठवाड्यातील काही निवडक जिल्ह्यात प्रामुख्याने हा शब्द वापरला जातो. अर्थात मराठी शब्दकोशात तो खूप अर्थाने प्रचलित आहे. पण आमच्यासाठी त्याचा एक अर्थ व एक वागणे ठरलेले आहे. शब्दकोशाप्रमाणे त्याचा अर्थ होतो – असा धान्यालातील दाणा जो शिजत नाही; ज्याला कांडता येत नाही; जो चांगल्या ठिकाणी वावरत नाही; जो वाईट कर्म करतो, वैगरे बरेच अर्थ आहेत. अर्थ जे काही असतील ते वाईटच आहेत. आमच्याकडे त्याचा वापर आणि त्या अंगी बाणलेले गुणधर्म हे एकाच बाबीसाठी प्रसिद्ध आहे; ते म्हणजे ‘ दुसऱ्याचे वाईट चिंतने, कुठे काही चांगले होत असेल तर त्याचे कौतुक कधीच न करणे, लोकांच्या चांगल्या गोष्टी इतरांना मुद्दामहून न सांगणे, जेव्हा कोणाचा कौतुक सोहळा चालू असेल तेव्हा गप्प बसून फक्त पाहत बसणे, थोडक्यात कोणाचेही बरे न दिसणारा माणूस म्हणजे ‘ कुचर ‘ होय.
  या प्रवृत्तीचे प्रमाण सदैव वाढलेलेच असते. मग ते शिवकाळात जा की आधुनिक काळात. मुळात कुचर लोकांचे वाढणे हेच कलयुग होय. यांचे प्रकारही भरपूर आहेत. त्यातली चांगली बाब एकच की हे फारसे घातक नाहीत, जीवघेणे नाहीत. त्यांचा तोटा लोकांना फार कमी त्यांना स्वतः लाच जास्त होतो. म्हणजे लोकांचे वाईट चिंतणे, लोकांचे कौतुक न करता अंगातली ऊर्जा जाळत बसणे. यामुळे होते काय, यांना अन्नपाणी गोड लागत नाही. कामात मन लागत नाही. ज्याने शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे नुकसान होते. यातला पुढचा प्रकार म्हणजे हे विशिष्ट लोकांचे व विशिष्ट कामातच कुचरपणा करतात. बाकी लोकांसमोर चांगुलपणाचा आव आणतात आणि विशिष्ट लोकांसाठी त्यांचा आतला कुचरपणा राखून ठेवतात. त्यात असे वागण्याचे कारण की हे मुळात भित्रे असतात. अणि ज्या विशिष्ट लोकांच्या बाबतीत जे हे कुचरपणा करतात त्यामागे कारण हेच की ती लोकं शांत वृत्तीची असतात. आपला हेतू साध्य करायला सोपी असतात. तशा ठिकाणी मग घमंड, शहाणपणा करायचा व जी माणसे वरचढ असतात तिथे लाळ पुसायची. म्हणजे व्यक्ती ही एकच पण भिन्न ठिकाणी निराळा स्वभाव. म्हणजे माणसातले सरडेच हे! विरोधाभास असा की, या कुचर लोकांना त्यांचे कौतुक इतरांनी नेहमी करावे असे वाटते. मग ही कोणाचे करो की न करो.
  मुळात चोरं जशी ओळखू येत नाहीत तसा या कुचर लोकांचा ना पोशाख वेगळा न राहणीमान. ही आपल्यातलीच असतात. ही अशी माणसे असतात जी आपल्यात राहून काही न करता त्यांची कामे करून जातात. त्यांची ट्यूनिंग फक्त ज्यांच्याविषयी वाईट चिंतन करायचं त्यांच्याशी बरोबर लिंक लागते, ज्याला समजायचे ते समजून घेतो. यांचा उद्देश सफल झाला म्हणजे ते इतरांची कुचराई करायला मोकळे.
  आता ही कुचराई नेमकी कशी करतात ते सांगतो. ज्याची कुचराई करायची त्याचे कौतुक न करणे हे पहिले क्लासिफाईड लक्षण. कौतुक न करणे म्हणजे कधीच नाही! दुसरी गोष्ट, ज्यांची कुचराई करतात त्यांची माघारी खूप जास्त निंदा करतात. समोर हे कधीच निंदा करू शकत नाहीत. कारण वर सांगितल्याप्रमाणे ही भित्री असतात. निडर माणसे तोंडावर बोलतात व मोकळी होतात. यांना जर खूपच कुचराई करायची असेल आणि समोरच्या माणसाचे चांगले पाहणे शक्यच होत नसेल तर ती त्याच्याशी बोलणे विनाकारण बंद करतात. अशाने त्यांना त्यांची किंमत वाढल्याचे समाधान लाभते. एकाचे वाईट चिंतायचे म्हणजे ते इतरांशी मुद्दाम जुळवून घेतात. माणसे तोडण्यासाठी नवीन माणसे जोडणे ही कल्पना व ती अमलात आणणारी लोकं म्हणजे अजबच नाही का! अशाने त्यांना असे वाटते की पुढचा जळेल. परंतु तो असे विनाकारण कशाला जळेल ? तो तुमच्या सारखा थोडा आहे! या कुचरचे आणखी एक लक्षण म्हणजे दुसऱ्याचे कौतुक व्हायले की हे तिसऱ्याचे कौतुक करून नको तो संदर्भ ताणतात. यांचा जळफळाट इतका असतो की विषय बदलण्यासाठी त्यांना तिसऱ्याचे कौतुक केलेले पण सहन होते; नंतर ते त्या तिसऱ्याचे सोयीस्कर सोपस्कार करतात. मला प्रश्न हा पडतो की, इथे स्वतः ची कामे करायला वेळ नाही तिथे दुसऱ्याचे वाईट चिंतायला यांची घड्याळ दोन घंटे अधिक असावी.
  दुसरा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे, ही कुचर लोकं सुशिक्षित मध्येच जास्त आहेत. आपल्या पुढे कोणी जाणे यांना अजिबात रुचत नाही. कोणी आपल्याहून मोठे होणे म्हणजे नकोच! आपल्या बुड जाग्यावर असले तरी. पण ती हे विसरतात की प्रत्येकजण कधी न कधी नावारूपाला येतोच. या कुचर लोकांहून काही रुकत नाही. स्वतः ला चांगले म्हणणाऱ्यांनी असे करणे अजिबात अपेक्षित नाही. कारण ते स्वतः ला कितीही चांगले म्हणत असली तरी या सो कॉल्ड चांगल्या लोकांच्या कुचर स्वभावाचा लेखजोखा यातलीच खरीखुरी चांगली माणसे ठेवत असतात.
  माणसातला कुचरपणा ओळखण्याच्या यंत्राची गरज भासली असती तर मी ते यंत्र व्हायला तयार झालो असतो. कारण ही माणसे कितीही लपली तरी माझ्या दृष्टीतून लपू शकत नाही. मुळात कोणाला शोधण्याची व लपण्याची वेळ येवूच नये. इतके चांगले आपण का वागू शकत नाही. लोकांनी चांगले म्हणावे म्हणून नाही तर स्वतः ला चांगले वाटावे म्हणून तसे वागायला काय हरकत आहे. जी माणसे अशी वेड्यासारखी वागतात त्यांना इतरांना खुश पाहून मिळणारा आनंदच माहीत नाही. कधी लोकांच्या चेहऱ्यावरील खुशी आपल्या चांगल्या वागण्याने, चार छान शब्दांमुळे कशी वाढते ते कधी पहा आणि स्वतःला किती आत्मिक समाधान लाभते हे पण कधी अनुभवा; कुचरपणा विसरून जाल…

  हे बघा;
  कोणी कौतुक केले काय अन्
  न केले काय…
  काम करणारे करत राहतील..
  कुचर जितके जन्मतील
  त्याहून कैक चांगले
  इथे उमगतील…

  लेखक – अमोल चंद्रशेखर भारती
  ( लेखक / कवी / व्याख्याते, नांदेड )
  मो. 8806721206