मला काही सांगायचय -अंतरंगातील भावगर्भ

337

 

मानवी मन हे आनंद आणि दुःख या दोन्ही प्रक्रियेने प्रयुक्त असे असते. संवेदनाक्षम नव्या जाणीवांची निर्मिती करते. बालवयात मिळालेल्या विचारांच्या शिदोरीवर भावी आयुष्य प्रगतीच्या शिखरावर पादाक्रांत करते. म्हणून बालवयाच्या जीवनाला अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मराठी साहित्यामध्ये बाल वाङ्ममयाची निर्मिती झाली आहे. कविता, कथा, नाट्य, बडबड गीते अशा स्वरूपाच्या कलाकृतीतून आपली अभिव्यक्ती वाचकांसमोर अनेक लेखकांनी मांडलेली आहे. श्रीजीत दिलीप लोहकरे हा एक संवेदनाक्षम बाल लेखक व कवी आहे. त्यांनी *मला काही सांगायचय* (आत्मचरित्र भाग एक ) मधील लेखाच्या व कवितेच्या माध्यमातून आपले भावविश्व प्रस्तुत केलेले आहे. याबद्दल मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या प्रस्तावनेत डॉ.एस.जी .गवई लिहतात की,’श्रीजीत म्हणजे साहित्याच्या वृक्षाची असलेली नाजूक कळी आहे. तिचं रूपांतर फुलात व फळांमध्ये होण्यासाठी वेळ लागणार नाही.’ हे निरीक्षणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

वर्ग सातव्या वर्गात शिकणारा तेरा वर्षाचा श्रीजीत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रसंगाचे अचूक निरीक्षण करतो. त्याचे वृत्ती आशयगर्भी व नव्या निर्मितीचे मूल्य घेऊन साकार झालेली आहे. मला काही सांगायचय या आत्मचरित्रात्म पुस्तकातील तेरा लेखांतून स्वः जाणिवा, ज्ञानप्रक्रियेचा आरंभ, अभ्यासाची चिकाटी ,मोटिवेशन्स, मी आणि मीच ,नवोदय ,आणि शाळेतून फोन आला,आपले जीवन व शिवाजी महाराजांचा आदर्श अधोरेखित केलेला आहे. त्यांच्या वडिलांची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आंबेडकरी विचार प्रक्रियेतून त्यांचे बाबा वागत असल्याचे श्रीजीत कबूल करतो. हीच परिवर्तनवादी विचारांची पेरणी करण्याची भूमिका आहे.

श्रीजीतने आपल्या नवोदय विद्यालयातील घडणाऱ्या प्रसंगाला मोठ्या खुबीने प्रस्तुत केले आहे. एम पी हॉलमध्ये असलेल्या सुविचाराचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे.*The roots of education is bitter but the fruits is sweet* हा सुविचार त्याच्या जीवनाचा सर्वाधिक प्रेरणास्त्रोत बनला आहे. विद्यालयातील त्याचे काम नक्कीच मुलांना प्रेरणा देणारे आहे. कविता या विभागात एकूण सोळा कविता आहेत. बालवयातील भावनात्मक, मनोविश्लेषणात्मक, लडिवाळपणाने युक्त अशा कविताचे लेखन त्यांनी केलेले आहे. आपली आई, बाबा, प्राचार्य, भाऊ ,दादा ,स्वच्छता, विक्रम बत्रा,घनदाट रात्र,अशा विविध विषयावर त्यांनी रचना केलेल्या आहेत. त्या रचना वाचकाला अत्यंत विचारवेधक वाटतात.वाचकाला अंतर्मुख करतात.आईचा आदर्श अत्यंत मौल्यवान वाटतो.आई म्हणजे सृजनाची ऊर्जा.समाज शिक्षण देणारी प्रेरणा.आई खरे व खोटे समजवून सांगणारी मार्गदर्शिका.
लहान वयात त्यांची निरीक्षणक्षमता किती विलक्षण आहे यांची प्रचिती दिसून येते. श्रीजीत अभ्यास या कवितेत लिहितो की,

स्वप्न व्हायला जाते पूर्ण
तेव्हा उगाचच वाटते
काहीतरी राहिल्यासारखेच अपूर्ण
पण जर जिद्दीने केल
तर हे कदाचित
होईलही पूर्ण
हो हो.. नक्कीच होत पूर्ण…
पृ क्र 49
ही कविता बालवयातील त्याच्या जिद्दीला नवे पंख देणारी आहे. आज देशातील वातावरण गंभीर होत आहे. ‘अपना काम जमता, भाड मे जाये जनता ‘.अशी परिस्थिती पाहायला मिळते त्यावर लोगो नींद से जागो..! ही कविता नक्कीच चिंतनात्मक आहे. तो लिहितो की,

अब तो खोलो ऑंखे
बोलो मुह से कुछ तो बोलो
तुम्हारा मुह हो रहा है काला
अब तो उठो नींद से बेटे …57

आपल्या जीवनात नवे बदल घडवायचे असेल तर आपण भक्त होण्यापेक्षा सच्चे भारतीय व्हावे. अत्याचार करणाऱ्या वृत्तीवर प्रहार करावे. अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
मला काही सांगायचय …(आत्मचरित्र भाग एक ) यातील लेखन बालवयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे .त्यांची विचारक्षमता व शब्दाला पकडण्याची हातोडी उच्च पातळीची आहे. मला काहीतरी सांगायचं आहे हा ग्रंथ अंतरंगातील भावगर्भ उलगडून दाखवणार आहे. हा ग्रंथ आपल्या लहान मुलांना वाचायला नक्कीच द्यावा.प्रत्येक शाळेतून या पुस्तकाचे वाचन झाले तर वाचन संस्कृती वाढविण्यास फायदा होईल. हा श्रीजीत दिलीप लोहकरेचा पहिलाच ग्रंथ असल्याने यामध्ये काही मर्यादा आहे .पण त्यांची निरीक्षण क्षमता व विश्लेषण अत्यंत प्रभावी आहे. पुढील त्याची कलाकृती अधिक प्रभावी होण्यासाठी त्यांनी बुद्ध, जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,अण्णा भाऊ साठे यांचे ग्रंथ वाचून नव्या दृष्टीची जाणीव करून घ्यावी. पहिला ग्रंथ असल्याने त्यामध्ये काही कमतरता आहेत. त्या पुढे होणार नाही याची काळजी घ्यावी. मराठी साहित्यात तो एक उभारता तारा आहे . नव्या वैचारिक विचाराचा ठाव घेऊन परिवर्तनवादी, वास्तवगर्भी, संविधाननिष्ठ अशी कलाकृती निर्माण व्हावी अशी आशा व्यक्त करतो.त्याच्या पुढील लेखनास सुयश चिंतितो….

संदीप गायकवाड नागपूर
9637357400

मला काही सांगायचय..
(आत्मचरित्र भाग 1)
श्रीजीत दिलीप लोहकरे
प्रकाशकः सुधीर प्रकाशन, वर्धा.
सहयोगमूल्यः 90 रूपये
भ्रमणध्वनीः9922788038