ग्रामसभा सक्रिय झाली तर लोकशाहीचे बळकटीकरण

    146

    *सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*


    म्हसवड : अग्रणी संस्थेच्या वतीने लोकशाहीमध्ये वंचित घटक व महिलांचा सहभाग वाढावा म्हणून वींग प्रक्रिया खानापूर तालुक्यातील पाच गावांमध्ये चालवली जात आहे.त्या अनुषंगाने महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये जाऊन त्या निवडून आल्यानंतर आजपर्यंतचा अनुभव व प्रवास कसा होता,याची माहिती घेण्यात आली.यामध्ये लेंगरे,मादळमुठी, वेजेगाव तसेच जोंधळखिंडी गावामध्ये कोरो संस्था व अग्रणी संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली.यामध्ये खानापूर तालुका विंग प्रोसेस प्रमुख व अग्रणी संस्थेच्या कार्यकारी संचालिका शोभाताई लोंढे,संघटिका सुहासिनी शिंदे,ग्रा.पं. सदस्या अपेक्षा सावंत, सल्लागार यास्मिन पिरजादे,संचालिका सुनिता पवार व अग्रणी संस्थेचे सचिव मुनीवर शिकलगार हे उपस्थित होते.
    यावेळी कोरो संस्थेच्या विंग प्रोसेस उपक्रमाच्या प्रभारी वैशालीताई रायते मॅडम या मार्गदर्शन करतेवेळी म्हणाल्या की, गावच्या ग्रामपंचायतीमध्ये मतदार म्हणून ज्याप्रकारे ५०%महिलेचा वाटा आहे,तेवढा सत्तेत सहभाग आरक्षणामुळे लाभला परंतु याविषयी कोणतेही प्रशिक्षण महिला सरपंच व सदस्य यांना देण्यात आले नाही.त्यामुळे प्रत्येक योग्य लाभार्थींपर्यंत योजना पोहोचवणे, गावात सामंजस्य निर्माण करणे व गावचा विकास करणे याविषयीची अडचणी येत आहेत.प्रत्येक सदस्यांची गाव कारभार समजून घेण्याची तळमळ आहे.त्यासाठी ग्रामसभा नियमीत होणे गरजेचे आहे.त्यासाठी सुरूवातीला जनजागृती करून वार्डसभा,महिला ग्रामसभा यांना प्रतिसाद मिळाला तर नक्कीच स्थानिक प्रश्नांचे नियोजन व निराकरण होऊ शकते.गावच्या प्रत्येक सामुहिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.ग्रामपंचायत विषय समित्यांचे सक्षमीकरण केले तरच ग्रामविकासात सर्वांचा हातभार लागेल.खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो.यासाठी कोरो‌ संस्था मुंबई व अग्रणी संस्था विटा सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लेंगरेच्या लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीताई शिंदे,मादळमुठीच्या सरपंच संगिता निकम,वेजेगावच्या सरपंच चंपाताई गुरव,वाळूजच्या मा. सरपंच सुनिता पवार व जोंळखिंडीचे ग्रा.पं.सदस्य कैलास घाडगे यांनी आपापल्या गावातील आजपर्यंत झालेल्या कामांची माहिती व आपले अनुभव सांगितले.येत्या काही काळात अग्रणी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य,विषय समिती सदस्य, ग्रामपंचायत यंत्रणामधील साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.यामुळे वंचित घटकांचा व महिलांचा लोकशाही मधील सहभाग वाढेल व सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल.