काय भुललासि वरलीया रंगा? [संतश्रेष्ठ चोखोबा मेळा महाराज स्मृतिदिन विशेष.]

  66

   

  _संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌र्‍य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला, परंतु त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे कडकडून मिठी मारावी- उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु त्यांना ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागत असे, ही खंत त्यांच्या मनात कायम होती. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी संकलित करून रोचक शब्दांत मांडलेली माहिती वाचकांच्या सेवेत समर्पित… संपादक._

  संत चोखामेळा महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले एक सुप्रसिद्ध संत होते. संतशिरोमणी नामदेव महाराज हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखामेळा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत.
  “जोहार मायबाप जोहार| तुमच्या महाराचा मी महार||
  बहु भुकेला जाहलो| तुमच्या उष्ट्यासाठी आलो||”
  गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌र्‍य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला, परंतु त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे कडकडून मिठी मारावी- उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु त्यांना ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागत असे, ही खंत त्यांच्या मनात कायम होती-
  “आमुची केली हीन याती| तुज कां न कळे श्रीपती||
  जन्म गेला उष्टे खाता| लाज न ये तुमचे चित्ता||”
  चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखामेळा म्हणतात-
  “खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे|
  दवंडी पिटीभावे डोळा||”
  असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखामेळांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
  संत चोखामेळांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखामेळांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात-
  “हीन मज म्हणती देवा।
  कैसी घडे तुमची सेवा।”
  असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. “का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या? भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?” असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखामेळांचे सुमारे ३५० अभंग सद्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम अभ्यंग अनंतभट्ट हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.
  “ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा।
  चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।
  काय भुललासी वरलीया रंगा।।”
  संत चोखा मेळांविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाच्या नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती. तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ, ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत. पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले, अशी कथा प्रचलित आहे. संत चोखामेळांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग रचना आहेत. संत चोखामेळांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत.
  संत चोखामेळांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार म्हणून समजत असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते.
  “विठ्ठल विठ्ठल गजरी।
  अवघी दुमदुमली पंढरी।”
  त्यांचे आशयगर्भ अभंग आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत काळजी वाटत होती.आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
  “धाव घाली विठू आता| चालू नको मंद||
  बडवे मज मारिती| ऐसा काही तरी अपराध||”
  किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असताना ते एकाएकी कोसळले व त्याखाली दबून संत श्री चोखोबा मेळा महाराज आणि अनेक मजूर मयत झाले. ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८मध्ये आजच्या दिवशी वैशाख वद्य- कृष्ण पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून “विठ्ठ्ल विठ्ठ्ल…” असा आवाज येत होता, त्या अस्थि श्री चोखामेळारायांच्या आहेत, असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सद्याच्या नामदेव पायरीजवळ ठेवून समाधी बांधली.
  !! पावन पुण्यस्मरण दिनी संत चोखोबा महाराजांच्या मंगल चरणयुगुली करोडो दंडवत प्रणाम जी !!

  – संकलन व सुलेखन –
  संतचरणधूळ: श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी,
  श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,
  रामनगर वाॅर्ड, गडचिरोली, जि. गडचिरोली.
  फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.