रेती तस्करांपुढे महसूल यंत्रणा हतबल!-हळदा नदीपात्रातून अवैध रेती उपसा जोरात

  303

  रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

  ब्रम्हपुरी:- तालुक्यातील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती उत्खननातील कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने दोन तिन रेती तस्कर ब्रह्मपुरी तालुक्यातील व पवनी तालुक्यातील एक या व्यवसायात उतरले आहेत.

  या दोन तिन तस्कराची काळी नजर हळदा वैनगंगा नदी घाटावर असून दररोज रात्री व पहाटेपर्यंत अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे होत असून संबंधित अधिकारी बघायची भूमिका निभवतात. याला कारण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना असा प्रश्न हळदा येथील नागरिक करीत आहेत.

  रेती तस्करी करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत दररोज दिवस रात्र उपसा करीत आहेत. त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. हळदा नदीपात्रातील रेतीही दर्जेदार व बांधकामासाठी उत्कृष्ट असल्यामुळे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातही मोठी मागणी आहे.

  या तालुक्यात मोठे बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे अमर्यादपणे रेतीचा अवैधपणे उपसा होत आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर रेती तस्करांकडून केला जात असून, यात जेसीबी व पोकलेन ट्रॅक्टरच्याही मदतीने नदीपात्रातील रेतीच्या उपसा करून मोठ-मोठ्या टिप्पर व ट्रॅक्टर द्वारे शहराकडे व ग्रामीण भागात पाठविली जात आहेत.

  रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. हळदा येथून वैनगंगा नदीपात्रात वाहने उभे करून त्यात रेती भरून गुप्त मार्गाने गावांमधून काढले जातात. त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे रेती तस्करावर महसूल व पोलीस विभागाचे वतीने कार्यवाही का होत नाही असे गावकऱ्यांचे मत आहे.

  या अवैध रेती तस्करी ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा व आवळगांव यासह इतरही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा दिवस-रात्र सुरू आहे. काही दिवस रेती साठवणूक करायची व नंतर जास्त दरात पावसाळ्यात विकायची असा गोरखधंदा हळदा आणि आवळगांव, परिसरात सुरू आहे.व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या महसूल पोलीस विभागावर तसेच स्थानिक तलाठ्यावर महिन्याकाठी आर्थिक देवाण-घेवाण संगणमत करून हा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. अवैधपणे होत असलेल्या या रेती तस्करांवर वरदहस्त कोणाचे असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.

  तो रेती तस्कर हळदा गावामध्ये चौका चौकात जाऊन मोठ्या आवाजात ओरडून सांगतो कि ब्रह्मपुरी तहसील पासून ते चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत मी कर्मचाऱ्यापासून तर अधिकाऱ्यापर्यंत हप्ते देतो म्हणून कर्मचारी सोडा अधिकाऱ्याचीही ताकत नाही माझ्यावर कारवाई करायची. जिथे तक्रार करायची आहे तिथे करा मला काही फरक पडत नाही. असं बोलून हळदा गावातील नागरिकांना धमकी देतो.

  त्यामुळे दररोज अवैध रेती उपसाची माहिती प्रतिष्ठित व सुजान नागरिक महसूल व पोलीस विभागाला देतात. परंतु येथे तस्कर सापडतच नाहीत. असे हास्यास्पद उत्तर संबंधित विभागाकडून देण्यात येते. एवढेच नाही तर एखाद्या वेळी रेती तस्करांचे ट्रॅक्टर किंवा अन्य वाहन मिळाले तरी कारवाई न करता स्वार्थापोटी सोडून देण्यात येते असे प्रकार नेहमी होत असल्याची गावामध्ये चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे वैनगंगा नदी पात्रातील अवैध तस्करीवर संबंधित महसूल व पोलीस विभागाकडून कारवाई व्हावी व रेतीची चोरटी वाहतूक थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.