मानधन नको, वेतन द्या

    49

    ?आशा वर्कर  उतरल्या आपल्या मागण्यांसाठी रस्त्या वर…

    ✒️नागपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.8ऑगस्ट):-‘मानधन नको, वेनत द्या,’ अशी मागणी करत नागपुरातील आशा वर्कर संघटनेने शुक्रवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने केली.

    केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आशा वर्कर यांच्या संघटनेने ७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून आंदोलन केले. या संपाच्या माध्यमातून आशा वर्करच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

    केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात ७ व ८ ऑगस्ट रोजी संप पुकारला आहे. ९ ऑगस्ट रोजी सर्व कमगार, शेतकरी, कष्टकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) पाठिंबा दिला असल्याचे सीआयटीयूचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.

    या मागण्या मान्य करा:-

    आरोग्य, पोषण व शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्या, आयसीडीएस, एनएचएम,(राष्ट्रीय आरोग्य अभियान)माध्यान्ह भोजन आदी केंद्रीय योजनांवरील केंद्राच्या आर्थिक तरतुदीत भरीव वाढ करून त्या कायम करा, भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार आशा-गटप्रवर्तकसहित सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना २१ हजार रुपये किमान वेतन, १० हजार रुपये मासिक पेन्शन व इएसआय, पीएफ लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या असल्याचे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या महासचिव प्रीती मेश्राम यांनी सांगितले.