इंगळे साहेब लोकांचे खून पडण्याची वाट पाहताय का ?

    36

    ✒️दत्तकुमार खंडागळे,संपादक वज्रधारी,मो:-9561551006

    परवा मँक्स महाराष्ट्रचे पत्रकार सागर गोतपागर यांना जातीवाचक शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. खानपुर तालुक्यातल्या कमळापुर येथील बौध्द वस्तीतल्या समाज मंदिराच्या भ्रष्ट कामाचा वज्रधारी न्युजनेच पर्दाफाश केला होता. ठेकेदाराने समाज मंदिरातले संडास खाल्ल्याची बातमी लावली होती. तेव्हा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी सदर कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सदरचे काम थोरात नावाच्या ठेकेदाराने घेतले होते आणि राहूल साळूंखेने केले होते. त्यानंतर दलित वस्ती सुधार योजनेतून आलेल्या पेव्हींग ब्लॉकच्या कामाचीही तीच त-हा. ते ही काम निकृष्ट आणि पैसे ढापणारे होते. ते ही काम ठेकेदार राहूल साळूंखे याने केलेले आहे. तोच या कामाचा रितसर ठेकेदार आहे. त्याने केलेल्या कामावर कमळापुरच्या सरपंचानीच आक्षेप घेत सदरचे निकृष्ट काम व्यवस्थित करावे आणि नंतर बिल काढण्यात यावे असे पत्र दिले होते. बौध्द वस्तीतील लोकांनीही हिच मागणी केली होती. मँक्स महाराष्ट्रचे पत्रकार सागर गोतपागर यांनीही अशाच मागणीचे पत्र जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी चंद्रकांत गुडेवार व पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांना दिले होते. सदरच्या पत्रानंतर गुडेवार यांनी सदर कामाची तपासणी व चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या सांगण्यावरून कामाच्या चौकशीसाठी एक्झ्युकेटीव्ह इंजिनियर येणार होते. तसा निरोप सरपंच मँडमचे पती सामाजिक कार्यकर्ते जयकर साळूंखे यांनी त्या लोकांना दिला होता. इंजिनीयरची वाट पहात थांबलेल्या लोकांना ठेकेदार राहूल साळूंखे आणि त्याच्या पोलिस पाटील असलेल्या भावाने येवून दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केली. सदर प्रकाराबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होवून आठवडा उलटत आले तरीही आजतागायत आरोपींना अटक केली जात नाही. आरोपी मोकाट सुटले आहेत. या उलट सदर आरोपींनी बगलबच्च्यांना हाताशी धरून सागर गोतपागर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या सागर गोतपागरने तीन वर्षे गडचिरोलीत राहून आदीवासींच्यात मोठे काम केले, दारूबंदीवर काम केले. कालच्या लॉकडाऊनच्या काळात वज्रधारी फाऊंडेशन आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून धान्य वाटपाचे काम केले. जो सागर उपाशी राहणार्या मजूरांना पाहून ढसाढसा रडला, त्यांना मदत वाटप करण्यासाठी दिवसरात्र पळाला त्या सागरवर खंडणीची खोटी तक्रार दाखल केली आहे याचे वाईट वाटते. सागर गोतपागर पितळ उघडे पाडतो, आपल्या भानगडी व भ्रष्टाचार बाहेर काढतो म्हणून त्याला चिरडायचे चालू आहे. त्याच्यावर खोट्या केसेस टाकण्याचे कारस्थान चालू आहे पण सागर गोतपागर दबणार्यातला नाही. तो स्वयंभू आहे. तो पुन्हा या भ्रष्ट लोकांच्या छाताडावर बसेल यात शंका नाही. लबाडीला जास्त आयुष्य नसते. ज्यांची नितिमत्ताच ढासळलेली आहे त्यांच्याकडून नैतिकतेच्या काय अपेक्षा करणार ? जे खात्या ताटात घाण करतात ते काय नैतिकतेने वागणार ? ज्यांची घरं व पिढ्या टक्केवारीवर पोसली जातात ते काय प्रामाणिक वागणार ? आणि त्यांच्या डोक्यात तरी काय येणार ? असो.

    सागर गोतपागर यांनी ज्याच्या विरूध्द तक्रार दाखल केली आहे तो राहूल साळूंखे ठेकेदार आहे. तो राजकीय पक्षाच्या वळचणीला आहे. त्याचे प्रत्येक काम निकृष्ठ आहे. सरकारी पैशावर डल्ले मारायचे, कागदं रंगवायची, अधिकारी मँनेज करायचे, नेत्यांची चाटूगिरी करायची आणि गावगुंड्या करायच्या असा प्रकार सध्या खुप फोफावला आहे. यातून गुन्हेगारी, दादागिरी पोसली जाताना दिसते आहे. ठेकेदार राहूल साळूंखे याने केलेल्या कामाबद्दल अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. त्याने जिथे जिथे काम केले आहे तिथे तिथे लोक तक्रारी करत आहेत. लोक तक्रारी करतात पण राजकीय आशिर्वादाने सदरची प्रकरणं दाबली जातात. त्यामुळे आपलं कोण काय वाकडं करतय ? हा उन्माद अशा लॉबीत बळावतो आहे. त्या उन्मादातच गावात दादागिरी करणे, टगेगिरी करणे असले प्रकार सुरू आहेत. राजकीय आशिर्वाद आणि खिशातली खळखळ यामुळे खानापुर तालुक्याचा बिहार होवू घातला आहे. हे सगळं होत असताना विट्याचे डिवायएसपी डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसले आहेत की काय ? असा प्रश्न पडतो. ते आरोपींना अटक करत नाहीत, धाक लावत नाहीत. मागे दिघंची येथील एका प्रकरणातही इंगळेंनी असेच केले. न्यायालयाचा आदेश असूनही आरोपी मोकाट फिरत होते. त्यांना अटक केली जात नव्हती. इंगळे इथे आल्यापासून तालुक्यात गुटखा विक्री जोमात आहे. दारूविक्री जोमात आहे. या दोन नंबर वाल्यांच्यावर कारवाईच होत नाही. लॉकडाऊनच्या काळातही हे धंदे जोमात आहेत. तरीही इंगळेंनी गांधारीची भूमिका स्विकारली आहे काय ? डोळ्यासमोर जे घडतय ते रोखायची त्यांच्यात हिम्मत नाही काय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडतात. इंगळे साहेब लोकांचे खून पडण्याची वाट पहात आहेत की काय ? असेही या निमित्ताने वाटते. पोलिसांची अशी गांधारीसारखी भूमिका गुन्हेगारीला बळ देणारी असते. कायदा जर सोईस्कर वागू लागला तर समाजातली विकृती फोफावते आणि मस्तावते. मस्तवाल लोक कायदा-व्यवस्थेला फाट्यावर मारतात. इंगळे साहेब पोलिस उपाधिक्षक आहेत. बहूदा त्यांना इतपत कळत असावे. वर्दीचा रूबाब तेव्हा वाटतो जेव्हा तो न्यायाला आणि सत्याला प्रमाण मानतो, न्याय आणि सत्याची कास धरतो. न्यायाला आणि सत्याला प्रमाण मानून काम करणारे खुप अधिकारी आहेत. त्यांच्यामुळे वर्दीचा धाकही समाजात आहे. पण राजकारण्यांच्या आणि धनदांडग्यांच्यापुढे शेपट्या हलवणार्या काही लोकांनी कायदा बदनाम केलाय. त्यागाचे, बलिदानाचे व शौर्याचे प्रतिक असलेली वर्दी काही मुठभर लोकांनी विटंबीत केली आहे. असे लोक सामान्यांचा बळी देतातच पण कायदा आणि व्यवस्थेचाही बळी देतात. सागरच्या प्रकरणात खंडणीची केस दाखल करून घेताना पोलिसांनी गुपचूप करून घेतली, गुपचूप पंचनामा केला. सागर त्याची तक्रार दाखल करावयास गेला असता ठाणे अंमलदाराने थेट आरोपीस फोन लावत तुमच्याविरूध्द तक्रार आलीय तुम्ही पोलिस स्टेशनला या ! असे सांगितले. ते आरोपी आल्याशिवाय तुमची तक्रार दाखल करून घेता येणार नाही असेही सांगितले गेले. त्यानंतर सागर गोतपागरविरूध्द तक्रार दाखल करून घेताना ठाणे अंमलदाराचा सागरला फोन नाही आला. त्यांनी तुमच्याविरूध्द तक्रार आली आहे, तुम्ही पोलिस स्टेशनला या ! असे नाही सांगितले. एक महिन्यापुर्वी खंडणी मागितल्याची खोटी तक्रार तब्बल एक महिन्यानंतर बिनबोभाटपणे दाखल करून घेतली गेली आहे. टक्केवारीवर पोसलेल्यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपाची लबाडी लवकरच पुराव्यानिशी बाहेर पडेल. लबाडांचे थोबाड काळे पडेलच पडेल पण त्यांना मदत करणार्या व्यवस्थेेेचेही थोबाड काळे पडेल यात शंका नाही.