दिव्यांग पेन्शन मंजूरीची ३३ महिन्याची वाटचाल – श्री. दत्ता सांगळे

30

✒️माधव शिंदे (नांदेड विशेष प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली महानगरात रहाणारे ज्येष्ठ शिवसैनिक, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते व “दिव्यांग परिवार”.! चे संस्थापक श्री. दत्ता सांगळे यांनी “दिव्यांगशक्ती”चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री. माधव शिंदे यांच्याकडे “दिव्यांग पेन्शन मंजूरीची ३३ महिन्याची वाटचाल”…!!! नुकतीच पुराव्यांसह कथन केली. हा रंजक प्रवास दिव्यांगांना मार्गदर्शक ठरु शकेल याच भावनेने तो येथे प्रस्तूत करीत आहे.

तब्बल दोन हजार कोटीहुन अधिकचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालीकेने “अपंग कल्याणार्थ” राज्य शासनाने १८ गाईडलाईन जाहिर केल्यावर पालिकेच्या महासभेने १६ आॅगस्ट २०१७ रोजी “अपंगांच्या कल्याणार्थ” १८ योजना मंजूर केल्या. मंजूर योजनांतील त्रुटी, जाचक अटी – शर्ती, अवास्तविकता याचा श्री. दत्ता सांगळे यांनी अभ्यास करुन याबाबत संबंधीतांशी वारंवार प्रत्यक्ष भेटीतून चर्चेअंती निवेदन देवून ‘सुधारित फेरप्रस्ताव’ महासभेपुढे सादर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संबंधीतांनी त्यातील सत्यसत्यता पडताळून मागणीतील तथ्य समजावून घेवून आवश्यक ते “बदल व निकष” यात सुधारणा करुन मनपाच्या सर्वसाधारण सभेने २० डिसेंबर २०१८ रोजी “सुधारित प्रस्ताव” मान्य केला.

१८ कल्याणकारी योजनांपैकी काही निवडक “सुधारीत योजना” पुढीलप्रमाणे होत्या. ०१. मागील योजनेत अपंग खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती (वार्षिक) जिल्हास्तर – ₹ ६,०००/- , राज्यस्तर – ₹ ९,०००/- , राष्ट्रीय स्तर – ₹ १२,०००/- , आंतरराष्ट्रीय स्तर – ₹ २४,०००/- अशी होती तर सुधारित प्रस्तावाद्वारे अपंग खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती (वार्षिक) जिल्हास्तर – ₹ १५,०००/- , राज्यस्तर – ₹ ३०,०००/- , राष्ट्रीय स्तर – ₹ ५०,०००/- , आंतरराष्ट्रीय स्तर – ₹ १,००,०००/- करण्यात आली. ०२. मागील योजनेत अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (वार्षिक) १ ते ५ वी – ₹ ५००/- , ६ वी ते ८ वी – ₹ ७००/- , ९ वी ते १० वी – ₹ १,०००/- , ११ वी ते १२ वी – ₹ १,५००/- , ऊच्चशिक्षण – ₹ २,०००/- होती तर सुधारित प्रस्तावाद्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (वार्षिक) मतिमंद / गतिमंद – ₹ ३,०००/-, १ ते ५ वी – ₹ ६,०००/- , ६ वी ते ८ वी – ₹ १०,०००/- , ९ वी ते १० वी – ₹ १५,०००/- , ११ वी ते १२ वी – ₹ २०,०००/- , पदवी – ₹ ३०,०००/-, ऊच्चशिक्षण – ₹ ५०,०००/- करण्यात आली. ०३. मागील योजनेत घरकुलासाठी ₹ २,००,०००/- अर्थसहाय्य होते तर सुधारित प्रस्तावाद्वारे घर विकत घेण्यासाठी ₹ ४,००,०००/- अर्थसहाय्य तसेच मालकिच्या घर दुरुस्तीसाठी ₹ २,००,०००/- अर्थसहाय्य देण्यात आले. ०४. मागील योजनेत मनपांच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांकरिता ₹ २५,०००/- वार्षिक मदतनीस भत्ता होता तर सुधारित प्रस्तावाद्वारे मनपा क्षेत्रातील खाजगी तसेच शासकिय शाळांच्या मागणीनुसार अपंग विद्यार्थ्यांकरिता आवश्यक त्या सोईसुविधा ऊपलब्ध करुन देण्याकरिता ₹ १०,००,०००/- तरतूद करण्यात आली. ०५. मागील योजनेत अपंगांना विवाहासाठी ₹ ५०,०००/- अर्थसहाय्य होते तर सुधारित प्रस्ताव योजनेद्वारे अपंगांना विवाहासाठी ₹ १,००,०००/- अर्थसहाय्य देण्यात आले. ०६. मागील योजनेत अपंगांना प्रतिमाह ₹ १,०००/- पेंशन होते तर सुधारित प्रस्ताव योजनेद्वारे अपंगांना प्रतिमाह ₹ २,५००/- पेंशन योजना मंजूर करण्यात आली.

अपंगांना दरमहा अडीच हजार रुपये पेन्शन मंजूर तर केले पण, अपंगांना सिव्हिल सर्जन यांचा “अकार्यक्षमतेचा दाखला” देण्याची अट कायम ठेवली गेली. यासाठी अपंगांना येणार्या अडीअडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनाने कडोंमनपाच्या रुग्णालयातून सदरहु दाखला आणण्याची अट घालून प्रशासन त्यावर ठाम राहीले. त्यानंतर श्री. दत्ता सांगळे यांनी शासकप्रशासकांच्या वारंवार भेटी घेवून, लेखी निवेदन देण्याचा सपाटाच लावला. अखेरीस प्रशासनातर्फे तत्कालीन मा. आयुक्त गोविंदजी बोडके साहेबांनी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी श्री. दत्ता सांगळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत, येत्या महासभेत अपंग पेन्शनसाठीची “अकार्यक्षमतेचा दाखला” सादर करणेची अट रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करुन मंजूर करुन घेण्याचे मान्य केले. अखेरीस २० डिसेंबर २०१९ च्या महासभेत ती जाचक अट रद्द करण्यात येवून तब्बल सव्वा दोन वर्षाच्या (२८ महिने) संघर्षानंतर दिव्यांगांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

त्यानंतर आता लवकरच पेन्शन मिळेल या आशेवर दिव्यांग असतानाच, कोरोनाच्या महामारीने देशभर थैमान घालायला सुरुवात केली. कडोंमनपाचीही संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा कोरोना विरुध्दच्या युध्दात ऊतरली आणि दिव्यांगांचा पेन्शनप्रश्न मागे पडला. पुन्हा एकदा मार्चपासून पाठपुरावा सुरु केल्यावर अखेरीस ३३ महिन्याच्या (पाऊणेतीन वर्ष) प्रदिर्घ संघर्षानंतर २८ एप्रिल २०२० रोजी लाभार्थी दिव्यांगांच्या खात्यात थकबाकीसह प्रत्यक्ष पेन्शन जमा झाली आणि एका संघर्षमयपर्वाची यशस्वी सांगता झाली. त्यानंतर दरमहा पेन्शन देण्याची मागणी मान्य असूनही प्रशासन ते देत नाही हे लक्षात येता, प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्या तांत्रिक अडचणी समजून घेतल्यावर श्री. दत्ता सांगळे यांनी प्रशासनाशी सहकार्याची, सकारात्मक भूमिका घेतली. परिणामी कडोंमनपा प्रशासनाने जून – २०२० अखेरपर्यंतचे पेन्शन १८ आॅगस्टला वितरीत केले.

वरील माहिती देताना श्री. दत्ता सांगळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले की, “प्रशासनाकडे आपली बाजू मांडताना प्रशासनाच्याही अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्यातून सुवर्णमध्य साधल्यास आपल्याला न्यायहक्क मिळू शकतो. या ३३ महिन्याच्या संघर्ष काळात समोरच्याची भूमिका ऐकून घेणे, वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेणे, विषयाची योग्य मांडणी, कायद्याचे पाठबळ, सतत फोन, प्रत्यक्ष भेट व लेखी निवेदन, प्रसारमाध्यमांशी योग्य संवाद याचाच वापर केला. प्रत्येक वेळी प्रशासनाशी आक्रस्ताळपणा, धमकीची भाषा, दबावाचे राजकरण न करताही परस्परांच्या सामंजस्याच्या भूमिकेतूनही न्यायहक्क मिळू शकतो हे याक्षेत्रात काम करणार्यांनी लक्षात घ्यावे”. कोरोनाचे वातावरण निवळल्यावर कडोंमनपाच्या केडिएमटी सेवेतर्फे दिव्यांगांना “मोफत प्रवास पास” देण्याची सुविधा, सन – २००० पासूनच्या दिव्यांगांना स्टाॅल देण्याच्या धोरणाचा फेरआढावा घेवून नविन धोरण आखणे, काही योजनातील अटीशर्ती शिथील करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

या संघर्षमय वाटचालीत श्री. दत्ता सांगळे यांना मार्गदर्शन व सहकार्य करणारे कल्याणचे शिवसेना खासदार मा. डाॅ. श्रीकांतजी शिंदे साो, तत्कालीन राज्यमंत्री व डोंबिवलीचे भाजप आमदार मा. रविंद्रजी चव्हाण साो, शिवसेनेचे तत्कालीन महापौर मा. राजेंद्रजी देवळेकर साो, कडोंमनपाचे तत्कालीन आयुक्त मा. गोविंदजी बोडके साो (भाप्रसे), विद्यमान आयुक्त मा. डाॅ. विजयजी सूर्यवंशी साो (भाप्रसे), तत्कालीन ऊपायुक्त व केडिएमटीचे विद्यमान व्यवस्थापक मा. मिलिंदजी धाट साो, तत्कालीन वैद्यकिय आरोग्य अधिकारी मा. डाॅ. राजू लवंगारे साो, लेखाधिकारी मा. विनयजी कुलकर्णी साो, लेखापरिक्षक मा. संजयजी पाटील साो, समाजविकास अधिकारी मा. प्रशांतजी गवाणकर साो आणि दै. लोकमत, मुंबई आवृत्तीचे मा. प्रशांतजी माने साो यांचे ते व्यक्तीश: आभार व्यक्त करतात. तसेच याकाळात पाठिशी खंबीरपणे ऊभे राहिलेले “दिव्यांग परिवार”.! चे सदस्य प्रियाताई देढिया, अर्चनाताई वैद्य, कविताताई शिखरे, लक्ष्मीताई चित्रीगेमठ, सुरेखाताई चौधरी, मंजुताई झा,शिल्पाताई पै, विवेक नवरे, ऊदय वेळासकर, विजय बनसोडे, विजय कदम, प्रभाकर पडियार, अनिलकुमार गिरी, रमेश जावळे, गणेश शिरीसकर, सचिन म्हाप्रळ, अरविंद सकपाळ, मिलिंद पाटिल, जितेंद्र गिरासे, अविनाश कुलकर्णी, बाळकृष्ण जाधव, इत्यादींसह मित्र परिवाराचेही श्री. दत्ता सांगळे “ॠण” व्यक्त करतात…!

श्री. दत्ता सांगळे, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता, संस्थापक – “दिव्यांग परिवार”.! डोंबिवली, जि. ठाणे, संपर्क क्र. ८१६९०८५७६६