श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व मंदिर आंदोलन !

67

🔹वंचितांचा बुलंद आवाज तमाम – वंचितांचे तारणहार

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किंबहुना विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन पुकारले . आणि त्यांच्या स्वभाव धर्मानुसार आंदोलन पुर्णत्वास नेले . आता ते पुर्णपणे यशस्वी झाले असा दावा त्यांनी देखिल केला नाही . एसओपी तयार करुन मंदिरे खूली करण्यासाठी त्यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला . हे सगळे बाजुला राहू द्या . या मंदिर प्रवेश आंदोलनानंतर एकच सवाल उपस्थित केला जातोय म्हणा अथवा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत त्या म्हणजे डॉ. आंबेडकरांचे नातू बाळासाहेबांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा स्विकार केलाय का ? बाळासाहेब अशी कशी भुमिका घेवू शकतात . असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जावू लागले .
बरोबर आहे हिंदू धर्माला लाथाडूण बाबासाहेबांनी बौध्द धम्म स्विकारला. कारण धम्मामध्ये कुठेही वर्ण व्यवस्था नाही . विज्ञानवादी धर्म म्हणून बाबासाहेब तथागत गौतमांना शरण गेले . हा इतिहास सर्वांना माहिती आहे .
बाबासाहेबांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून काळाराम मंदिर आंदोलन केले . सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्यास मिळावे म्हणून चवदार तळ्याचे आंदोलन केले .
बाबासाहेबांवर लोकशाहीवर आधारित स्वतंत्र भारत देशाची घटना लिहण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली होती. ज्या धर्मात फक्त ३ टक्के लोकांनाच हक्क अधिकार मिळतात आणि बाकीचे गुलामीत जगतात हे त्यांनी अभ्यासांती सिध्द केले होते. मात्र घटना लिहताना देशातील सर्वात मोठ्या असलेल्या हिंदू धर्मावर सुड उगवला नाही. फक्त या धर्मातील अनिष्ट चालीरीती कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्येकाला न्याय मिळवून दिला. त्यांनी ठरवले असते तर हिंदू धर्मावर सुड उगवू शकले असते . मात्र त्यांनी तसे न करता विविधतेने नटलेल्या या देशात प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र्याबरोबरच धर्म स्वतंत्र दिले.
बाबासाहेबांच्या सोबत त्यावेळी समाजवादी विचारसारणीची ब्राह्मण मंडळी देखिल होती. इतकेच काय तर बाबांनी सविता कबीर या ब्राम्हण असतना त्यांच्याशी विवाह केला. ब्राह्मण मुलीशी विवाह केल्याने बाबासाहेबांनी सॉफ्ट हिंदुत्व स्विकारले होते का ? आज बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी ब्राह्मण मुलींशी विवाह केले मग ते हिंदुत्ववादी झाले का ?

राज्यात भाजप, सेना कट्टर हिंदू विचारसारणीचे पक्ष तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी हे तथाकथित पुरोगामी पक्ष आणि उरले सुरलेले डावे , आंबेडकरी विचारांचे पक्ष.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने तथाकथित समाजवाद, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांवर देशावर राज्य केले. त्याच विचारांची चलती असल्याने भाजप आणि सेना सोडले तर हिंदुत्ववादी म्हणून दुसरे कोणा नव्हते. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने त्याकाळी भाजपा बरोबर युती करून उत्तरप्रदेशची सत्ता मिळवली. हाथी नही गणेश हैं, ब्रम्हा विष्णु महेश हैं च्या घोषणा दिल्या . त्यावेळी त्यांचे सोशल इंजिनिअरिंग होते. सॉफ्ट अथवा हार्ड हिंदुत्व म्हणून बसपावर कोणी टीका केली नाही .

बाळासाहेब आंबेडकर हे राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांचे आजोबा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द स्विकारला आणि पुर्वाश्रमीच्या महारांना बौध्द केले. २२ प्रतिज्ञा दिल्या. यामध्ये मुर्ती पुजा करणार नाही , ब्रम्हा, विष्णु महेश यांना देव मानणार नाही ह्या महत्वाच्या प्रतिज्ञा . दारू पिणार नाही ही पण एक प्रतिज्ञाच होती . मात्र आज दारु धंदे कोण करते? आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर अनेक वेळा हातभट्टीच्या दारू विक्रीला परवानगी देण्याची मागणी केलीय . मग इथे बाबांची प्रतिज्ञा भंग झाली नाही का ? शिवशक्ती – भीमशक्तीचा प्रयोग केला आणि आता भाजपा बरोबर केंद्रात सत्तेत आहेत . मग त्यांनी हिंदुत्व स्विकारले का ? आरपीआयचे अनेक गट आहेत. या गटांच्या नेत्यांमध्ये पराकोटीचे मतभेद असल्याने राजकीय ताकद असताना सगळे तुकड्यात आहेत.
वंचितच्या माध्यमातून बाळासाहेबांनी सोशल इंजिनिअरिंग केले . धनगर, मुस्लिम समाजासह शेवटच्या घटकाला निवडणूकीत प्रतिनिधित्व दिले.
२०१४ साली भाजपा सत्तेवर आली . त्यांच्या सत्तेचा अश्व रोखणे त्यानंतर कठिण झाले . देशात हिंदुत्वाची लाट आली . आणि समाजवादी, पुरोगामी विचारांचे पक्ष पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळले. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना देखिल जानव्हे दाखवावे लागले . टेंपलरन करावा लागला . हा २०१९ नंतरतर अनेक पक्षांनी धर्म , देव विचार मांडण्यास सुरवात केली.
२०१४ पुर्वी राजकीय पक्षांच्या दुकानात धर्मनिरपेक्ष हाच माल चालत होता . मात्र भाजपने हिंदुत्वावादाचा माल ठेवून सत्ता मिळवली . त्यांचा पाया हिंदुत्वाचा आहे . म्हणून त्यांनी शिवराय , फुले, शाहू , आंबेडकर विसरले नाही . त्यांच्या भाजपच्या मॉल मध्ये या महापुरुषांचे फोटो ठेवले . २०१४ ला पहिल्यांदा ससंदेत पाऊल ठेवण्यापुर्ण प्रधानमंत्री मोदींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर लोटांगण घेतले. म्हणून त्यांनी घटनेतील सर्व तत्वे स्विकारली का ? तर नाही . भाजपने आपला ठरलेला अजेंडा राबविण्यास सुरवात केली .
या हिंदुत्वाच्या हवेत राष्ट्रवादीही सुटली नाही. ३१ ऑगस्टला मी तर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देवाची पूजा करताना पाहिले . याही पुढे त्यांनी थेट कट्टर हिंदू विचारधारेचा पक्ष शिवसेने बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. सोबत कॉंग्रेसला ही घेतले . मग कॉंग्रेस किंव्हा राष्ट्रवादी कुठल्या प्रकारचे हिंदुत्व स्विकारले म्हणायचे.
अजित पवार भाजपा बरोबर ८० तासांचे उपमुख्यमंत्री झाले . मग त्यांनी उघडपणे ( हे जबाबदारीने म्हणतोय ) हिंदुत्वावाद स्विकारला का ? की भाजप पुरोगामी झाला ? ना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ना भाजपच्या स्वंयसेवकांनी हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना विचारला नाही .
तर गांधींच्या विचारांची कॉंग्रेस शिवसेने बरोबर गेली. मग त्यांनी गांधी विचारधारा सोडली का ? की सेनेने हिंदुत्व सोडले. कारण बाबासाहेबांनी एक संदेश दिला होता. “शासनकर्ती जमात बना” म्हणजे सत्तेची सर्वच स्थाने काबिज करा . प्रशासनापासुन ते सत्ताधीशापर्यंत . हे फक्त आंबेडकरी अनुयायांनी लक्षात ठेवले नाही. त्यांनी शासनकर्ती जमात म्हणजे आरपीआयचे गट काढणे हेच आत्मसात केले.
पुरोगामी म्हणून मतांची बेगमी करणाऱ्या प्रत्येक पक्षाचा नेता हा देवभोळा आहे. इतकेच काय पुरोगामी म्हणून सर्वात जास्त जातीयवाद हेच करतात .

आता राहिला प्रश्न बाळासाहेबांच्या मंदिर प्रवेशाचा. प्रातिनिधिक स्वरुपात पंढरपूरचा विचार केला तर पंढरी वारीवर जगणारे गाव म्हणून ओळखले जाते . वर्षाकाठी एक कोटी भाविक पंढरपूरला भेट देतात . यावर गावाचे अर्थकारण चालते. पंढरीच्या वारीत माती देखिल विकली जाते. आज मंदिरावर आधारित संसार चालविणारा प्रत्येक जण अडचणीत आहे . पाच महिने झाले जीवन जगणे मुश्किल झाले . आता तर एकवेळची चुलच पेटवली जाते. यामध्ये सर्व बहुजन, वंचित समाज आहे . मंदिर उघडल्याने यांना दोन घास पोटभरूण मिळणार आहेत . या वंचितांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची हाक दिली. हा ते एक राजकीय पक्ष चालवत असल्याने यामध्ये मतांचे राजकारण येवू शकते . त्याला अपवाद कोणताच राजकीय पक्ष नाही .

आंबेडकरी अनुयायांनी आता कुठे तरी राजकीय भुमिका घेतली पाहिजे . असेही आजपर्यंत कॉंग्रेस , राष्ट्रवादीला मतदान केले आहे . आता भाजप , सेनेला पण करावे लागले . मग या पक्षांच्या विचारधारेचा विचार कधी केला जात नाही . या सर्व पक्षांचे नेते उघडपणे देवाचा , कट्टर धार्मिकतेचे समर्थन करतात . ते चालतात मग बाळासाहेब आंबेडकरांच्या भुमिकेवरच आक्षेप का ?
राजकीय भुमिका वेगळी आणि धर्माचे आचरण , वैयक्तिक जगणे वेगळे हेच समजून घ्या . बाकी आपण आंबेडकरी अनुयायी म्हणून अंत्यंत बुध्दीजीवी आहात .

✒️लेखक:-अभिराज उबाळे
(पत्रकार , राजकीय विश्लेषक)
पंढरपूर ,जिल्हा- सोलापूर

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185