पंढरपूर वारीचा संदेश

30

31 ऑगस्ट रोजी एॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्माई मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील तमाम विठ्ठल भक्तांच्या दर्शनाच्या हक्कासाठी हे आंदोलन होते. कोट्यावधी श्रध्दाळू भाविकांसाठी विठू माऊलीचे दर्शन ही मनाला शांतता देणारी गोष्ट आहे. अनेक भौतिक समस्यांनी बेजार झालेल्या, तणावग्रस्त जीवनात कोंडी झालेल्या अवस्थेत साध्या सर्व सामान्य माणसाला देवळे, मशिदी, चर्च, पीर, गाव देवस्थानांचा आधार वाटतो ही वस्तुस्थिती आहे. अन्न-पाणी-हवा यांच्या इतके अत्यावश्यक नसले, तरी देवा बद्दलची मानसिक ओढ आणि आस ही सर्व सामान्य माणसांच्या विशेषतः हिंदू ओबीसी, कारागीर, भटके-विमुक्तांचा भाव जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या भावसृष्टीमधील परमेश्वर एका उदात्त करुणामय व समर्थ पालकाचे रुप असतो. तो कधीच हिंसा करत नाही. वा कुणाचा द्वेषही करत नाही. उलट वारकरी परंपरा ही तत्कालीन व आताही सर्वांत मोठी स्त्री-पुरुष समतेची परंपरा आहे. म्हणून वार्षिक वारीत लाखो स्त्रिया सहज निर्भयपणे सहभागी होत असतात. संत तुकाराम महाराजांच्या परंपरेतील हा वारकरी आहे.

करोना लॉकडाऊनच्या काळात माणसाचा जीवन संघर्ष अधिकच तीव्र झालेला आहे. सर्व सामान्य माणसाला सरकारचा आधार वाटत नाही. सत्ताधारी राजकिय पक्षांचा आधार वाटत नाही हे वास्तव आहे. लोकांच्या हक्कांची लढाऊ, संवेदनशील, राजकिय चळवळ देवावरचे हे अवलंबित्व काही प्रमाणात कमी करत असते. विशेषतः यातील अंध:श्रद्धा कमी करत जाते. एवढेच नाही तर विविध धर्म, जात व स्त्री-पुरुषांच्या सक्रीय सहभागाने जातीय विद्वेषही कमी होत जातो. अशी वंचितची धारणा आहे. अनुभव आहे.

या पार्श्वभूमिवर अशी संघर्षशील सामाजिक-राजकीय चळवळ उभी करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. 31 ऑगस्ट चे आंदोलन हे सर्व सामान्यांच्या भावभक्ती स्वातंत्र्याचे आंदोलन होते. त्याच्या मागे वारकऱ्यांच्या व विठ्ठल भक्तांच्या दर्शन स्वातंत्र्याच्या हक्काचे रक्षण करण्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही राजकिय उद्दिष्ट नव्हते. अशा आंदोलनातून प्रत्येक माणूस तुम्हाला मतं देतोच असे नाही. म्हणून ते राजकीय हेतूने म्हणणे ही बौद्धिक आणि वैचारिक दिवाळखोरी आहे असे वाटते.

यामागे धार्मिक उद्दिष्ट तर अजिबातच नव्हते. बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्माचा व वैचारिक मार्ग दाखवला त्याचा स्विकार एका मोठ्या समूहाने केला व येथील पारंपरिक विषमतेवर आधारित ब्राह्मणी व्यवस्थेत स्वतःच्या प्रगतीसाठी व विकासासाठी वाट मोकळी करून घेतली. जे या प्रवाहात नाहीत त्यांच्या उपासना स्वातंत्र्यासाठी राजकिय संघर्ष व आंदोलन उभे करण्याची संवेदनशील व प्रगल्भ भूमिका वंचित बहुजन आघाडी घेत आहे.

कोणती धर्मश्रध्दा श्रेष्ठ आणि श्रेयस्कर आहे हे ठरविण्याचा किंवा त्यामागे समाजाला नेण्याचा खटाटोप यामधे नाही. रामजन्मभूमी सारख्या हिंदू- मुस्लिम विद्वेषाच्या उद्देशाने उभ्या केलेल्या आंदोलनाशी याची तुलना करणारांचे हेतू खोडसाळ आहेत. याचा आम्ही निषेध करतो.

या आंदोलनाला पार्श्वभूमी ही करोनाशी लढण्यासाठी सरकारने अवलंबलेल्या रणनितीची आहे. कोविड-19 ची लागण झालेल्यांपैकी रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 97.4 % आहे. अत्यवस्थ होणाऱ्यांचे प्रमाण अंदाजे 15 % आहे आणि मृत्यू दर 2.6 % च्या जवळपासआहे. हे लक्षात घेऊन आरोग्य सेवेचा मुख्य भर हा अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांसाठी अद्ययावत वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यावर असला पाहिजे. आरोग्यविषयक धोरण बदलण्याची गरज आहे.

भारतात समाजात शारीरिक अंतर राखणे केवळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये रहाणाऱ्यांचे स्वच्छतेचे निकष पाळता येत नाहीत असे सार्वजनिक संडास वापरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. आणि तरीही अशा वस्त्यांमध्ये जेवढी भिती दाखवली गेली, त्या प्रमाणात करोना पसरला नाही. ज्यांना लागण झाली, त्यातले बहुसंख्य किरकोळ उपचारानंतर बरे झाले. ह्याचा अनुभव लोक घेत आहेत. गरीब वस्त्यांमधील जे लाखो लोक आपल्या गावाकडे पायी चालत गेले त्यांना करोनाची बाधा झाली नाही किंवा त्यांनी करोना पसरवला नाही. ह्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने रणनितीमधे बदल करणे आवश्यक होते. संवेदनशीलतेने हे सर्व लक्षात घेऊन धोरणात बदल करण्याऐवजी बिनडोकपणे लोकांचा रोजगार नष्ट करणारी, लोकांना बेकार करणारी व अर्थव्यवस्थेला खीळ घालणारी लॉकडाऊन सारखी धोरणे बेमुदतपणे राबविण्यात आली. ज्या लोकांना करोनाची बाधा झाली, त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांची लूटमार करण्याचे अनैतिक कामं अनेक खाजगी हॉस्पिटल्सनी केली. सरकारी व सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे व सरकारचा खाजगी हॉस्पिटलवर अंकुश नसल्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडल्याची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी जे दरडोई पॅकेज जाहीर झाले, त्यातून पैसे कमावण्याचा भ्रष्टाचार अधिकारी, सत्ताधारी व दलालांनी केला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही प्रवृत्ती जनतेला हतबल करणारी आहे.

कोरोनाची भिती एवढी निर्माण केली, याविरुद्ध कोणी बोलण्याचे धाडस करत नाही. आणि जे बोलतात, त्यांना ब्लॅकमेल केले जाते. पंढरपूरमधील आंदोलना दरम्यान एका पत्रकाराने बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, आंदोलनकारी शारीरिक अंतर राखत नाहीत आणि मास्क लावलेले नाहीत हे योग्य आहे का ? त्याला उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले की, ” त्यांना भिती वाटत नाही, तर तुम्ही का घाबरवताय ? आम्ही कायदा मोडण्यासाठीच आलो आहोत.” आणि खरोखर तिथे आलेल्या आंदोलनकाऱ्यांमधे भितीचा लवलेशही दिसत नव्हता. महिला आणि वयस्कर लोकही खूप मोठ्या प्रमाणावर सामिल झाले होते. एवढ्या दिवसांच्या संचारबंदीनंतर घराबाहेर पडून बाहेरगावी येण्याची मिळालेली संधी आणि सरकारच्या पोलिसराजला झुगारून मोकळेपणाचा घेतलेला अनुभव याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यांवर ओसंडत होता. माझी खात्री आहे कि, लांबून टीव्हीवरुन ही दृष्ये पहाणा-यांना एवढे दिवस भितीच्या सावटाखाली दबलेल्या अनेकांचा श्वास देखील या अनुभवाने मोकळा झाला असेल.

मिडियाने देखील आंदोलनात अंतर ठेवण्याच्या नियमाला न पाळून बाळासाहेबांनी व वंचित बहुजन आघाडीने भयंकर गुन्हा केल्याची बदनामी केली. लोकांच्या मनात निर्माण केलेल्या अनाठायी भितीचा गैरफायदा घेऊन लोकविरोधी कारभार चालू आहे. जुलुमी व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी लोकांच्या मनातली भिती दूर करणे आणि त्यांना लढण्यासाठी रस्त्यावर उतरविणे आवश्यक असते. करोनाची भिती दाखवून लोकांचे अन्याया विरुद्ध लढण्याचे राजकिय स्वातंत्र्यच हिरावून घेतले जात आहे. मृत्यूची भिती दाखवून जिवंतपणी मेल्यासारख्या स्थितीत जगणे आम्हाला मान्य नाही हा पंढरपूरच्या आंदोलनाचा संदेश आहे.

मनुष्य जीवनात मृत्यू ही नैसर्गिक अटळ घटना आहे. मृत्यूचा स्वीकार कसा करायचा याचा हितोपदेश अनेक तत्त्वज्ञानांनी माणसाला केला आहे. मृत्यू विषयी पराकोटीची भिती माणसाला गुलाम करते. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी ही भिती निर्माण करुन जनतेला वेठीस धरले आहे. बाळासाहेबांनी या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारच्या मनमानी विरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवला आहे.

आणि शेवटचे कोरोना प्रकरणी प्रथमपासून संघ-भाजपने ठरवून “सुरक्षित अंतर” ही वैज्ञानिक संकल्पना वापरण्याऐवजी “सामाजिक अंतर (social distance)” ही अस्पृश्यतेचे समर्थन करणारी ब्राह्मणी संकल्पना वापरली. वंचितने परत परत आग्रह धरूनही तीच पारंपारिक संकल्पना वापरत आहेत. आणि एवढा कुणीही आग्रह धरलेला नाही हेही नमूद करत आहे.यात सर्वांची कोणती मानसिकता आहे हे स्पष्ट दिसते. कुणाला पंढरपूर व ही संकल्पना हा “non issue” वाटेल, पण वंचितला याची फिकीर नाही. आमचे उद्दीष्ट साफ आहे. त्याच मार्गाने आम्ही जाणार.
तुकाराम महाराज म्हणतात तसे, “निंदकाचे घर असावे शेजारी—-!” हे अनुभवतो आहोत!!

✒️लेखिका:-रेखा ठाकूर
                  अध्यक्ष
वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य
मो:- 98195 84554

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185