अंधश्रद्धा निर्मूलन

34

🔹मराठी साहित्यमंच व वृत्तपत्र पुरोगामी संदेश आयोजित लेखमालेसाठी लेख

           ▪️अंधश्रद्धा निर्मुलन▪️

वाजे पाऊल आपले
म्हणे मागे कोण आले ॥
शब्द पडसाद उमटला
म्हणे कोण रे बोलला ॥
काही दिसे अकस्मात
तेथे वाटे आले भूत ॥
रामदास सांगे खूण
भीतो आपणा आपण

कैक वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी किती मार्मिक उदाहरण दिले आहे पहा. अंधश्रद्धा म्हणजे तरी काय हो ? तर कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारणे. मनातील भीतीचे स्वरूप म्हणजे अंधश्रद्धा . ही अचानक एका दिवसात निर्माण झालेली नसते . बालपणापासून ऐकलेल्या, पाहिलेल्या आजूबाजूच्या परिसरातील घटना, मोठया व्यक्तींनी सांगितलेल्या भुताखेताच्या गोष्टी यांचा कुठेतरी अदृश्य परिणाम मनावर झालेला असतो व त्यातूनच अंधश्रद्धा जन्माला येते.
आजच्या जगामधे सुशिक्षित लोकही बुवाबाजीच्या मागे लागताना दिसतात. अनेक मोठमोठया व्यक्ती साधू लोकांना आपले गुरु मानतात. त्यांच्या वरदहस्तावर हे ढोंगी लोक सर्व समाजाला आपल्या तालावर नाचवताना दिसतात व श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडतात .त्यांचे भक्त बनतात. जेव्हा जाग येते तेव्हा आपण फसलो गेलो याची जाणीव होते .
असे अनेक भोंदबुवा आज तुरूंगात आहेत . आजचे युग हे विज्ञानयुग आहे असे म्हणताना दुसरीकडे नरबळी देणे , लोकांच्या अंगात देवदेवता येणे , जादूटोणा करणे ही अलिकडच्या काळातील ताजी उदाहरणे आहेत. छत्तीसगडमधे तर अनेक माहिलांना डाकिण / चेटकीण ठरवले जाते व तिची धींड काढली जाते . नवअर्भकांचे बळी चढवले जातात. भोंदूबाबा जे सांगतील ते ऐकले जात आहे .
हे पाहिले की म्हणावेसे वाटते,

बुवा खूप झाले I समाजात आज l
गळयामध्ये साज l लेऊनिया ॥
बुवाबाजी ढोंग I स्वीकारावे सत्यI
जाणावे हे तथ्य I पदोपदी ॥

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने डोळसपणाने , तार्किकतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट विचार करून स्वीकारावी. झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक या मागे लागताना दिसतात .टीव्हीवरील हिंदी चॅनेलवर तर सर्रास भूताखेतांच्या मालिका, काली जादू नावाच्या अनेक सीरीयल्स चालू आहेत .परवाच खाली बिल्डिंगच्या पार्किंगमधे ५-६ मुले मुली एक खेळ खेळत होती .एकाला हटकल्यावर सांगितले की आम्ही काळी जादू खेळ खेळतो व मुलांना घाबरवतो .
अशा प्रकारे जर मुले वारंवार अशा मालिका पहायला लागले तर नकळत ही मुले अंधश्रद्धाळू बनू शकतात . म्हणून पहिल्यांदा या मालिकांवर बंदी घातली गेली पाहिजे.
कुष्ठरोग्यांना तर मागच्या जन्मातील पाप समजून समाजाने उपक्षिले होते . त्यांना वाळीत टाकले जात होते परंतु बाबा आमटेंसारख्या महान विभूतींनी त्यांची सुश्रृशा करून हे दाखवून दिले की त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. व ही केवळ माणसाच्या मनातली अंधश्रद्धा आहे.
डॉ . नरेंद्र दाभोळकर यांनी १९८९ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली .सलग १६ वर्षे संघर्ष केला . त्यांच्या हत्येनंतर जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला जो फार पूर्वीच अस्तित्वात यायला हवा होता.
अंध विश्वासातून मुक्ती करण्यासाठी प्रत्येकाने आधी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा . श्रीमंत होण्यासाठी मंत्र नाही तर मनगटातील कष्टाचे तंत्र वापरणे आवश्यक आहे .विवेकबुद्धी जागृत करून सत्याचा स्वीकार करायला हवा. नवस सायासावर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवला की यश , किर्ती, पैसा हे सर्वकाही माणूस मिळवू शकतो असा विचार समाजात रूजायला हवा तरच बुवाबाजीला आळा बसेल .
अनेक चांगली कीर्तने,प्रवचने ऐकायला हवीत . संत गाडगेबाबांनी तर खूप वर्षापूर्वीच समाजाला किर्तनाच्या माध्यमातून जागे करण्याचा प्रयत्न केला होता. देवाला कोंबडया बकऱ्याचा बळी देऊ नका असे सांगितले तरीही अनेक यात्रा जत्रांना आजही मुक्या प्राण्यांचा बळी दिला जातो.
प्रत्येकाने विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट पारखून घ्यायला हवी तरच ही अंधश्रद्धेची कीड मरेल.चला तर ही कीड वेळीच काढून टाकून नव्या विज्ञानवादी समाजाचे स्वप्न साकारूया .
श्रद्धेस धरा
कास विश्वासाची
प्रगल्भ चिकित्सा
पडताळणी सत्याची

✒️स्वलेखन :-सौ .सावित्री कैलास कांबळे
पुणे
mb .no.9822996146

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620