कोरोना सोई- सुविधा निर्मितीबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करू नये – विजय वडेट्टीवार

26

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23सप्टेंबर):- सैनिकी शाळा आणि महिला रुग्णालयात आय सी यु सहित ऑक्सिजन बेड तयार करण्याची प्रक्रिया शासन आणि प्रशासासनाने 12 दिवसांपूर्वीच सुरू केली आहे. परंतु आम्ही काहीच केले नाही असे भासवून कोरोना रुग्णांसाठी जी व्यवस्था व सुविधा निर्माण करण्यास आम्ही पूर्वीच मंजुरी दिली आहे आणि कामही प्रगतीपथावर आहे तोच निर्णय आमच्या आंदोलनामुळे झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत. कोरोना काळातही राजकारण करणाऱ्यांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे लक्षात घेऊनच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासनाला वाढीव बेड चे रुग्णालय तयार करण्याच्या सूचना मी 15 दिवसांपूर्वीच केल्या होत्या.
यात चंद्रपूर येथील सैनिक शाळेमध्ये 400 ऑक्सिजन बेड आणि पंचवीस (आयसीयु) बेडसह 14 सप्टेंबरलाच मंजुरी दिली आहे. तसेच महिला रुग्णालयात 100 बेड ऑक्सिजन (आयसीयू) व 300 बेड फक्त ऑक्सिजनचे तयार करण्यासाठी 7 आणि 10 सप्टेंबरला मंजुरी दिली आहे. त्यासाठी तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली असून काम प्रगतीत आहे. मात्र काही राजकीय पक्षाने 48 तासात एक हजार बेडचे रुग्णालय उभे न केल्यास आंदोलन करण्याची भूमिका लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

जी तयारी करण्यासाठी आम्ही 12 दिवसांपूर्वीच मंजुरी दिली आणि कामही सुरू केले तो निर्णय काही राजकीय पक्षाच्या आंदोलनामुळे झाला असा आभास निर्माण करून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा काही राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या काळात राजकारण करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करू नये, अशी विनंती श्री वडेट्टीवार यांनी राजकीय पक्षांना केली आहे.