ज्येष्ठ नागरिक दिन

35

कोणतीही भारतीय स्त्री किंवा पुरुष ज्याची वय वर्षे साठ अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जेष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते . साधारणपणे या वयात माणसाला मानसिक व शारीरिक थकवा येत असतो .शरीर साथ देण्यास हळूहळू असमर्थ ठरू लागते .त्यामुळे थोडीशी चिडचिड हटवादीपणा वाढतो . म्हातारपण म्हणजे कळत्या वयातील एक बालपण असते .आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी भारत सरकारने धोरण राबवले परंतु अजूनही त्याची परिणाम कारकता म्हणावी तेवढी रुजलेली नाही.

आजही या अखेरच्या टप्प्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या मानवी अधिकारांचे हनन होत आहे . आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना एकाकी व नीरस आयुष्य जगावे लागत आहे .सामाजिक सुरक्षितता नाही . काही कौटुंबिक अत्याचाराने पिडीत आहेत . काही लोक आजही एकाकी जीवन जगत आहेत . प्राण्यांच्याही वाट्याला येऊ नये असे हलाखीचे दीनवाणे जीवन कित्येकांच्या वाट्याला येताना दिसत आहे . विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात ‘आम्ही अन आमची मुले” एवढा संकुचित दृष्टिकोन निर्माण झाला आहे . त्यांना घरातील म्हातारी माणसं अडगळ वाटतात किंवा त्यांच्या संसारातील अडसर वाटू लागतात . ही विचारसरणी दिवसेंदिवस मूळ धरू लागली आहे .त्यांना कडक शासन किंवा कायदे लागू केल्याशिवाय ही वृत्ती संपुष्टात येणार नाही.

आजकालच्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर संस्कार तरी कसे होणार? शहरीकरणाच्या ठिकाणी जागेअभावी किंवा महागाईमुळे आई-वडिलांना गावी पाठवले जाते . कामानिमित्त दिवसभर बाहेर असलेले आई-वडील मुलांवर संस्कार कधी करणार ? त्यांना पुराणातील बोधकथा , संस्कार कथा कोण सांगणार ?
आज वृद्धाश्रमांची संख्या वाढणे हे कशाचे द्योतक आहे ? का आई-वडिलांना मुलेबाळे असूनही वृद्धाश्रमांमध्ये जीवन व्यथीत करावे लागते ? का त्यांचे थकलेले डोळे आजही निमिषात पाहून कुणीतरी आपला येईल म्हणून वाट पाहत असतात ? या सगळ्याच्या मुळाशी आजची कुटुंब पद्धती आहे . जीवनामध्ये आपण संस्कारांना तिलांजली दिलेली आहे .तोही एक जीव आहे याचा आपल्याला विसर पडला आहे .आपल्या आई-वडिलांना आपण जशी वागणूक देतो तशी प्रेमाची वागणूक सासू-सासऱ्यांना का मिळू नये ? सर्रासपणे १५ टक्के स्त्रिया सोडल्या तर इतराच्या त्यांच्या मनात मत्सराची भावना अधिक दिसते . लग्नानंतर पती एवढे हतबल का होतात ? का त्यांना मातेच्या पान्हयाचा विसर पडतो ? का त्यांना वडिलांच्या काळजातील वेदना जाणवत नाहीत ? एवढी स्वार्थी कशी काय मुलं होऊ शकतात ? शेवटी पेराल तसे उगवाल.

मुलं नेहमी अनुकरण करत असतात . आपणही कधीतरी म्हातारे होणार आणि त्यावेळी आपल्या मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर त्यात त्यांचं काय चुकलं ? म्हणून अजुनही वेळ गेली नाही .वेळीच सावध व्हा शासनाने सेवा ज्येष्ठांसाठी कित्येक धोरणे , योजना आखल्या परंतु कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून पदरी निराशाच पडते . कुणीही पोटतिडकीने माईचा लाल शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढे सरसावत नाहीये . इतकी का माणुसकी मेलेली आहे ?
जेष्ठ नागरिक हा .उत्पादनक्षम घटक नसला तरी समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे .त्याचे राहणीमान सुसह्य व्हावे ,आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात , त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजात व त्यांच्या पाल्यांना व्हावी म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारित केले आहे . हा अधिनियम महाराष्ट्रात १ मार्च २००९ पासून लागू करण्यात आला त्यामध्ये वृद्धाश्रम निर्मिती, निराधार योजना व इतर अन्य योजना यांचा समावेश करण्यात आला म्हातारपण हे नैसर्गिक आहे . प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी म्हातारी होणारच.

प्रत्येक बियाचा प्रवास रोपटे, झाड, वृक्ष असाच होतो. त्याच ची मुळे कमजोर झाली की उन्मळून पडणारच .पण आपण या वृक्षाला सामाजिक ,मानसिक , भावानिक आधार दिला तर त्याची कमजोर मुळे नव्याने बंध पकडून मजबूत होतील . सुरकुतलेल्या चेहर्‍यावर हास्य अन समाधानाची पालवी येऊन ते देह टवटवीत होईल .असा मनोहर हरित बगीच्या घरोघरी फुलवणे हे उद्याच्या पिढीसाठी आजच्या काळाची गरज आणि आव्हानही आहे.
वृद्धांच्या मृत्युनंतर विधी म्हणून त्याच्या नावाचे बारावे , मासिक श्राद्ध किंवा वर्षश्राद्ध घालून आपण अन्नदान करतो . त्यापेक्षा जिवंत असताना त्यांना भाकरीचे दोन तुकडे का बरं मिळत नाहीत ? समाजाची रीतच अशी चालली आहे .काकस्पर्श झाला नाही तर त्यांच्या काहीतरी अतृप्त इच्छा राहिल्या असा निष्कर्ष काढून आपण त्या मृतात्म्याला तृप्त होण्यासारखं वचन देतो हे सर्व मृत्युपश्चात का ? एक सोपस्कार म्हणून ?
काही दानशूर लोक ,श्रीमंत लोक आपले किंवा आपल्या मुलांचे वाढदिवस वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जाऊन साजरे करतात . त्यांचे चेहरे फुलतात . त्या मुलांमध्ये ती आपली नातवंडे शोधतात.

एखाद्याला मूल नसेल तर तो माणूस अनाथाश्रमामध्ये एखादं मूल दत्तक घेतो आणि त्याचा आयुष्यभर सांभाळ करतो . ज्याला आई-वडील नाहीयेत किंवा ज्याला आपल्या मुलांना आजी-आजोबांचे प्रेम द्यायचं आहे त्या लोकांनी अशा वृद्धाश्रमातील लोकांना दत्तक घेतले तर माझ्या मते यापेक्षा मोठे पुण्यकर्म नाही . एक माणूस म्हणून त्यांच्या इच्छा पुरवायला आपण किती लायक ठरतो ? त्यांच्या आयुष्यात सुखाची झुळुक आणण्यासाठी आपल्यापैकी किती सुशिक्षीत जे,स्वतःला सुसंस्कृतपण समजतात ,पुढे सरसावत आहेत ?माझे ठरले मी माझ्या आयुष्यात हे सत्कर्म करणारच आणि तुम्ही ?…..

आज १ ऑक्टोबर . ज्येष्ठ नागरिक दिनी आपण सर्वांनी संकल्प करूया

श्रावण बाळ मी होईन माझ्या मातापित्यांचा
कदापि ना मार्ग दाखविणारे वृद्धाश्रमाचा

✒️लेखिका:-सौ.शामल शंकर मांजरेकर
वेंगुर्ला सिंधुदुर्ग
मो:-९४०४४४७५५०

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
मो:-९४०४३२२९३१