सदगुरू जगन्नाथबाबा सार्वजनिक वाचनालयास ग्रंथसंच भेट

31

🔹ग्रंथवाचन निसर्ग ,जीवन आणि जाणिवेच्या कक्षा विस्तारण्यासाठी सहाय्यक ठरते – बंडोपंत बोढेकर

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.15ऑक्टोबर):-थोर तत्त्वज्ञ वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आपल्या स्वलिखित ग्रंथासह इतर ग्रंथाचा संच सदगुरू जगन्नाथबाबा सार्वजनिक वाचनालयास भेट स्वरूपात प्रदान केला. याप्रसंगी वाचनालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर निखाडे , सचिव प्रा. विलासराव पारखी , समितीचे सदस्य देवानंद देवाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कॕम्प एरिया स्थित हनुमान मंदिरासमोर असलेल्या ह्या वाचनालयाचे स्वरूप आणि व्यापक उद्दिष्ट लक्षात घेता ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले , ब्रम्हलिन संतश्री जगन्नाथबाबा यांनी भक्ती मार्गातून सामान्य जनांचे नैतिक अधिष्ठान उंचावण्याचे अविरत कार्य केले. अन्नदाता शेतकरी वर्गावर ते विशेष प्रेम करायचे.त्यांनी आयुष्यभर भाविक शेतकऱ्यांच्या दमनी , रेंगी च्याच माध्यमातून प्रवास केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून सामाजिक वातावरण शुध्द करण्याचे महान कार्य केले.

त्यांच्या नांवाने स्थापन झालेल्या ह्या वाचनालयाचा लाभ युवकांनी अवश्य घ्यावा . आजच्या काळात ज्ञान संपादन करण्यासाठी प्रत्येकानीच शिकले पाहिजेत . निसर्ग ,जीवन आणि जाणिवेच्या कक्षा विस्तारण्यासाठी युवा वर्गांनी ग्रंथ वाचन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 लोकसहभागातून ह्या वाचनालयाची स्थापना २१ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आली असून यामध्ये जेईई , सिईटी, नीट ,एमपिएससी आदी स्पर्धा परीक्षेच्या संबंधित पुस्तके ,कृषीविषयक , वैचारिक ,मनोरंजन , इतर वाचनिय ग्रंथ व्यवस्थापन समितीने उपलब्ध करून दिलेले आहे . विद्यार्थी वर्गांनी ह्या वाचनालयाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मनोहरराव निखाडे यांनी केले. ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार प्रा. विलासराव पारखी यांनी मानले.