बंडोपंत बोढेकर यांचा “आनंदभान”अभंगसंग्रह – एक जीवन संजीवनी

    38

    ?पुस्तक परिचयः आनंदभान (अभंगसंग्रह)

    पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर फिरताच अस्पष्ट पांडुरंगाचा स्पष्ट टिळा गुगलवरील लोकेशन प्रमाणे मानवाचे जीवनातील स्थान दर्शविते. राष्ट्रसंतांची नजर झेंडापताका घेऊन नाचणार्‍या व टाळ मृदूंगात तल्लीन झालेल्या वारकर्‍यांत गुंतलेली आहे असे अत्यंत सुचक मुखपृष्ठ अभंगसंग्रहास चंद्रपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री.सुदर्शन बारापात्रे यांनी चितारलेले आहे,त्यांचे मनापासून कौतुक करतो.

    “ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर” –
    झाडीपट्टीच्या सांस्कृतिक ,शैक्षणिक व सामाजिक चळवळीत नावारूपास आलेलं व्यक्तिमत्व.
    विद्युत अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेऊन माणसांच्या मेंदूचे फ्युज झालेले तार जोडण्याकरीता व एम.ए.(मराठी)च्या सहाय्याने माणसांच्या मनाची घडी नीट बसविण्याकरीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारकृती साहित्य संमेलन व झाडीबोली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि झाडीबोलीच्या माधूर्याचा प्रचार व प्रसार तन मन धनाने करीत आहे, हिच सरांची खरी ओळख.

    माणसांचा गोतावळा जुळविणे व टिकवून ठेवणे हि त्यांची खासीयत. आय.टी.आय.मध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे गणित शिकविण्याबरोबरच समाजातील लोकांना जीवन जगण्याच्या गणिताचे धडे देण्यात सरांचा लिलया हातखंडा आहे.अगदी सहज सुंदर जीवन कसे जगावे असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर आनंदभान बोढेकर सरांना भेटावे. अशा उत्तुंग आशावादी सरांनी समाजात आनंद जागविण्याकरीता “आनंदभान” अभंगसंग्रहाची निर्मिती केली असावी असे मला वाटते.

    आज माझ्या वाचनात श्री.बोढेकर सरांचा विदर्भातील झाडीपट्टीचे कौतुक करणारा व प्रसंगी टिकास्त्र सोडणारा “आनंदभान” अभंगसंग्रह वाचण्यात आला आणि याबद्धल लिहणे महत्वाचेच वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.

    आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदची अंग, आनंदाचे।।
    हा मला आवडणारा जगदगुरू संत तुकारामांचा अभंग. आनंदा शिवाय दुसऱ्या कशाचेही भान असू नये या अवस्थेला नेणारा हा अभंग माझ्यासाठी ‘जीवीच्या जीवना केशिराजा रे’ असाच आहे.

    काही माणसं समाजाला आनंदी कसं करता येईल यासाठी निरंतर प्रयत्नशील असतात, नव्हे तर नवनवीन आनंददायी वाटा शोधून आनंदभान निर्माण करतात. ही आनंद पेरणारी माणसं आपणास शोधावी लागत नाही तर तीच आपला शोध घेत येतात, असंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. ऑगस्ट २०१७ मध्ये गडचिरोलीला राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाच्या परिसंवादात ‘राष्ट्रसंतांचे गद्य साहित्य’ या विषयावर विचार मांडण्याकरीता श्री बोढेकर सरांचा मला फोन आला आणि मी त्या फोनशी जोडल्या गेलो तो कायमचाच.
    श्री.बोढेकर सर एक वेगळंच रसायन आहे,मनाला आनंदाची आणि पायाला भटकंतीची भिंगरी बांधल्यागत.

    आज महाराष्ट्रातील दुर्लक्षित गडचिरोली जिल्हा स्वतःच्या झाडीपट्टीतील हिरव्याकंच वनराईने,बोलीभाषेच्या लवचिकतेने आणि गुणवैशिष्ट्यांच्या नैपुण्याने आपले वेगळेपण जोपासून अवघ्या महाराष्ट्राचेच नाही तर सार्‍या देशाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करावयास भाग पाडले आहे ज्यामध्ये मार्कंडादेव , हेमलकसा, लेखामेंढा आणि बहूसंख्य ठिकाणांचा समावेश करता येईल. झाडीपट्टीतील रंगभूमीने पुण्या-मुंबईतील सिनेकलाकारांना सुद्धा गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्यातील झाडीपट्टीच्या रंगमंचावर आणून कलेच्या क्षेत्रात आनंद दिलेला आहे. एवढेच नाही तर झाडीच्या मेव्याची चव चाखायला लावून नानाविध झाडीचा पसारा काय असतो हे, झाडी म्हणजे स्वप्नांचे कोंदण व झाडी म्हणजे देवानी दिलेलं आंदण अशा बहुरूपी जीवनाचे व झाडीच्या बोलीचे शास्त्र झाडीचा आत्मा आहे.

    अशा “आनंदभान” अभंगसंग्रहाविषयी थोडेसे…

    आनंदभान अभंगसंग्रहामध्ये एकून ७८ अभंगांचा समावेश केलेला आहे.

    महाराष्ट्रातील आनंदाचे घर विदर्भातच आहे हे ‘विदर्भाची महती’ अभंगातून दिसून येते.

    झाडीपट्टी भासे।हिरवे छप्पर।
    आनंदाचे घर। विदर्भात।।
    धानाची ही पेठ। तूडूंब तलाव।।
    मंडई उत्सव। गावोगावी।।
    झाडी मुळी वैद्य। करीती निदान।। वाचविती प्राण। गरिबांचे।।
    येथील संस्कृती।नाटक दंडारी।
    ती तमासगिरी। येथे नसे।।
    बाया कष्टकरी। माणसे आळशी। झाडीच्या ये देशी। मज वाटे।।

    अशा या आनंदाच्या घरात एक गोष्ट आनंदानेच खटकते ती म्हणजे,
    बाया कष्ट करी। माणसे आळशी।।
    कदाचित कवीला असेही म्हणायचे असेल की आनंदाच्या घरात माणसाने अधिक कष्ट करावे आणि झाडीचा पसारा श्रीमंत व्हावा.
    म्हणूनच पुढील अभंगात कवी म्हणतो,
    झाडीबोली माझी। आत्म्याचा सुस्वर।
    सुगंध तुपाचा !बोलीमध्ये।
    शिक्षित व्हावे।सारे गुणवान।
    करा बलवान।बोली शास्त्रे।
    प्रदेश आपुला।झाडीपट्टी छान।
    वाढवावा मान। सदोदित।

    कवीची झोळी संतांच्या ज्ञानाने भरली असल्यामुळे ढोंगी, स्वार्थी आणि दुर्गुण धारण करणारे कवीपासून फटकून आहेत. स्वतःच्या मनाची निर्मिती करताना साहित्य हेच जीवनाची कला आहे म्हणून ज्ञानामुळे दुःख दूर करता आले पाहिजे, मानवी तत्व वापरून त्यागाचे व सत्वाचे जीवन जगावे असे कवी पटवून देतो.
    आज सर्वत्र मोबाईलचा नवा रोग सुरू झाला आहे ज्यामध्ये सुसंवाद कमी व झगडेच जास्त होत आहेत. माय बाप दोघेही व्हाट्सअप चॅटिंग मध्ये गुंतले तर मुलांना पुस्तक धर म्हणून सांगावे कोणी ? आयुष्यात विषारी फुत्कार,डंख,जखमांची घरे सर्वत्र जेंव्हा दिसतात तेंव्हा कवी बोढेकर सर यांना साक्षात्कार झाल्यासारखे अभंगाच्या ओळी सुचतात.

    अस्तित्व मिळून। होईल मी थेंब।
    जीवनात रब ।मिळावया।
    करुनेचा धीर।सत्प्रवृत्ती झरा।
    संतत्वाचा वारा।मिळो मज।।
    आणि
    शब्दांचे सौष्ठव।रस परिपाक।
    पद्य ते रोचक।गद्याहूनी।।
    ह्दयाची किरणे।कविता व्यासंग।
    विलसे दिव्यांग।शब्दांमुळे।।

    शब्दांची आराधना करणारे व खरोखरच शब्दांची पूजा बांधणारे बोढेकर सर खांद्यावर खोर घेऊन आणि डोक्यावर टोपी लावून मांडवस सण साजरा करताना घरादाराला तोरण बांधून कुटूंबातील सर्व सदस्य शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात घुगर्‍याच्या जेवणाने करतात.

    गावाची संस्कृती जपण्याकरीता ‘ग्रामनाथ राजा’ अभंगामध्ये म्हणतात, आपण भांडण तंटे मिटवून सामुहिक ध्यानाचे आचरण करूया व तुकाराम दादा गीताचार्यांचे स्मरण करुया…

    सेवेचे कंकण।जाणिवेचे मंत्र।
    समर्पण तंत्र। दावी जना।।
    राष्ट्रकार्याचाच। होता दीपस्तंभ।
    ग्राम मूळारंभ।कर्मयोगी।।

    श्री.बोढेकर सरांना संजीवन रान मिळालेले आहे. येथे झाडीच्या मातीत माणिक खंजेरी वाजते आहे. ध्येयप्राप्तीसाठी बेचैन स्पंदने हृदयास भेटून सत्याची तत्वेच सर्वश्रेष्ठ असून वाचन संस्कृती हाच जीवनाचा पाया आहे. जगात सहिष्णुता नांदण्याकरिता कलह नष्ट व्हावा. रिकामी ऐट आणि दिखाऊ ढब कामाची नाही. निकोप व्यवस्था आणि आत्मिक अवस्था हाच जीवनाचा गाभा होय.
    देश मूल्य शिक्षणाने व कला कौशल्याने महान बनतो.शुद्ध आचरण हेच पांडूरंगाचे निवासस्थान होय.

    मुखी पांडुरंग।मन हो प्रसन्न।
    मुक्तीचे कारण ।सेवाकार्य।।
    विठोबा सर्वांचा। सर्वत्र नांदतो।
    देवळी नसतो।स्थिरावला।।
    शुद्ध आचरण। विश्व माना घर।
    तुमचेच गाव। पंढरपूर।।

    आनंदभान जपण्यासाठी श्रमाचा सुगंध आला पाहिजे.
    मातीच्या गंधाने !मोहरली काया।
    कैसा जाई वाया शेतकरी राजा।।
    बळीराजा खुष।प्रसवले बीज।
    आनंदाचा ताज। डोईवरी।।

    “योग कर्मस्य कौशल्यम” याप्रमाणे कवीचा कर्मावर विश्वास आहे. अध्यात्म,देहभाव, आत्मा, मंत्रधून आत्मग्लानी , अद्वैती जीवन या अभंगांमधून कवीने मानव धर्माची महती विशद करून जीवन सार्थकी लावण्याकरिता सत्संग कसा महत्त्वाचा आहे हे विविध दाखल्याने अभंगाद्वारे पटवून दिले आहे.
    ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अभंगावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा प्रभाव दिसून येतो.
    कवी आनंदभान रचनेत म्हणतो…
    देहवंत बोली।ज्ञानाची प्रतिक्षा।
    निष्काम अपेक्षा।सत्यार्थी तो।।
    ते परमसत्य।हे आनंदभान। स्व-अनुसंधान।प्राप्त होई।।
    मुठीत शिंपले। देहभाव रंगे।
    कळपाचे दंगे। दुःख मार्गी।।

    एकंदर जगाच्या कल्याणा !
    संतांच्या विभूती !
    देह कष्टविती !
    परोपकारे !! …या वचनाप्रमाणे कवीने खेड्यापाड्यातील सर्वसाधारण जनतेला केंद्रस्थानी ठेवून अत्यंत सोप्या सुलभ शब्दांमध्ये अभंग रचना केलेली आहे, हेही नसे थोडके! अज्ञानदोष,आई,कणव आणि आदिवासी बाई या अभंगांतून झाडीपट्टीतील भाकड कथांच्या माध्यमातून अज्ञान कसे पसरते हे सुद्धा पटवून दिलेले आहे.
    आदिवासी बाई।राहते वनात।।
    दारिद्र्य अनंत।तिच्या ठायी।।
    कटिवर बाळ।नाही त्याला दूध।।
    भाषणात मध । दावी नेते।।
    घनदाट वनी।सर्पांचा वावर।।
    कोणाही विचार।नसे तिचा।।

    आजच्या धकाधकीच्या काळात ‘तोषोनि मज द्यावे पसायदान हे’ हीच जीवन संजीवनी आहे. महाराष्ट्रातील संत समुदायांनी अवघाची संसार सुखाचा करीन म्हणून अभंगाच्या,ओव्यांच्या, भारुडाच्या,आणि कीर्तनाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर पंजाबपर्यंत आनंद वाटला आहे.
    आनंदभान अभंगसंग्रहातून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर सरांनी केलेला अभंग रचनेचा प्रयत्न सफल झाला आहे,असे मला वाटते.
    श्री.बोढेकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन…!!
    ……..
    ✒️लेखक:-प्रा.डाॅ.विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले
    मु.पो.-चामोर्शी. जिल्हा-गडचिरोली