धर्मचक्र प्रवर्तन आणि संबोधनाचा घोळ

31

धर्माची मूल्ये रुजविण्याचे कार्य धार्मिक संघटना करतात. मात्र त्यांना रुजवून प्रचारीत करण्याचे कार्य एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्देशनात किंवा त्यांच्या अधिनस्थ झाले तर……?अर्थातच, तेच होईल जे राजकीय नेत्यांच्या हेतुपूर्तीसाठी योग्य असेल आणि त्यांच्या सोईचे तसेच त्यांच्या राजकारणासाठी अथवा राजकीय स्वार्थसिद्धीसाठी उचीत असेल. १९५६ च्या दीक्षेचा पहिला वर्धापन दिन सोहळा १९५७ ला पृथकपणे साजरा न होता ३ ऑक्टोबर (दसऱ्याच्या दिवशी) संयुक्त रूपाने साजरा करण्यात आला.

कारण त्यादिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेची घोषणा जोडण्यात आली आणि त्यानंतर दीक्षाभूमीवर जी _धार्मिक-राजकीय उत्सव प्रदर्शनाची_ संयुक्त परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे. खरे तर, १९५६ च्या दीक्षेच्या वर्धापन दिन सोहळ्याला बाबासाहेब आंबेडकर कृत धम्म(धर्म)दीक्षेचा वर्धापन सोहळा म्हणणे संयुक्तिक ठरले असते. _मग, अडचण कुठे आली आणि १९५६ च्या दीक्षेला धर्म चक्र प्रवर्तन हे संबोधन कसे चिपकले….?_ २९ सप्टेंबर १९५६ च्या प्रबुद्ध भारत मध्ये धर्म चक्राच्या नव-प्रवर्तन साठी चलो नागपूर! शीर्षकांकित बातमी होती.

१३ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले “मला संपूर्ण भारतात ‘धर्म परिवर्तन’ घडवून आणायचे आहे”.उपरोक्त वक्तव्याचे रिपोर्टिंग १५ ऑक्टोबर १९५६ च्या _तरुण भारत_ वृत्तपत्रात ‘ _माझे क्षेत्र मला केवळ अस्पृश्य पुरतेच मर्यादित करावयाचे नाही.मला संपूर्ण भारतात धर्मचक्र प्रवर्तन घडवून आणावयाचे आहे_ असे चुकीचे आणि विपर्यस्त केले गेले. त्याच प्रकारे “नागपुरातील आणि नागपुरात बाहेर गावाहून आलेल्या हजारोंच्या संख्येतील अस्पृश्य समाज _या भव्य धर्मचक्र प्रवर्तन समारंभाची_ तहानभूक विसरून उत्कंठेने प्रतीक्षा करीत आहे यात नवल नाही”. असेही त्यात नमूद केले.

त्यामुळे काय झाले?आंबेडकर बौद्ध दीक्षाविधी समारंभाचे स्वागताध्यक्ष रे. वि. कवाडे यांनी _प्रबुद्ध भारत(२७ ऑक्टोबर १९५६) च्या आंबेडकर बुद्ध दीक्षा विशेषांकात_ नागपुरात धर्मचक्र प्रवर्तन* शीर्षकांकित लेख लिहिला. म्हणजे _पूर्वी नव-प्रवर्तन वाला ‘प्रबुद्ध भारत’; तरुण भारत च्या प्रभावात येऊन धर्मचक्र प्रवर्तन वाला झाला._ त्यानंतर १७ नोव्हेंबर १९५६ च्या प्रबुद्ध भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश* या शिर्षकांतर्गत जो मजकूर होता,तो असा:

मला भारतात बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करायचे आहे. _(यातही बाबासाहेब धर्मचक्राचे प्रवर्तन करायचे आहे, असे म्हणत नाही)_ १४ आणि १५ ऑक्टोबर १९५६ ला दीक्षा देऊन, १५ ऑक्टोबर ला दीक्षा निमित्ताने भाषण दिल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी चंद्रपूर मुक्कामी दीक्षा दिली. _त्याला आपण नुसतीच दीक्षा म्हणायची की बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणून धर्मचक्र प्रवर्तन म्हणायचे…?_ बुद्ध म्हणतात, धर्मचक्राचे प्रवर्तन केवळ बुद्ध करू शकतात.(चक्रवर्ती सूत्र, अंगुत्तर निकाय) _खरे म्हणजे,ज्याचा धम्म/धर्म, (धर्म विनय)तो त्या धर्माचा प्रवर्तक_ हे साधे आणि सरळ समीकरण आहे. पण आज लक्षात कोण घेतो? अशी प्रश्नार्थक स्थिती आहे. _धर्माच्या चक्राचे प्रवर्तन म्हणजे,धर्माच्या विचाराचा जनक(creator) त्या विचाराला शिस्तबद्ध पद्धतीने लोकाभिमुख करतो; गतीमान करतो ती प्रक्रिया._

मात्र त्याच विचारांचे रोपण समाजात करण्यासाठी झटणारा नायक/नेता/सेनानी/सेनापती, तो त्या धर्मचक्राचा अनुवर्तक ठरतो. म्हणून “मया पवत्तीत धम्मचक्क सारिपूत्त अनुवत्तती,अनुजातो तथागत.” (सेल सूत्त, मज्झिम निकाय)_(मी प्रवर्तीत केलेले धर्म चक्र, सारिपूत्त अनुवर्तीत करतो, तो तथागताचे अनुगमन करणारा आहे,/त्यांच्या मागोमाग जाणारा आहे.)_ हे👆 बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या तऱ्हेने ज्ञात होते आणि तत्कालीन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या धुरीणांना सुद्धा. _म्हणूनच १९५६ ला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता नागपुरात धर्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला होता._ (भारतीय बौद्धजन समिती च्या पुढाकारात) पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात मात्र भारतीय बौध्द महासभा (BBM) ने तीच भूमिका पुढे न नेता, १९५७ पासून आणि त्यानंतर RPI वाल्यांनी तसेच प पू बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने रेटलेल्या भूमीकेची री ओढली आणि पुढेही ओढतच गेले.(आजही तेच सुरू आहे).

अश्याप्रकारे _१९५६ चा दीक्षा दिन (१४ ऑक्टोबर)आणि त्या दीक्षेचा पाडवा (१५ ऑक्टोबर)_ अडगळीत पडला आणि पुढे अश्विन शुद्ध दशमी उर्फ दसरा/विजयादशमी चा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा होऊ लागला. त्यांचाच कित्ता गिरवीत मग १४ ऑक्टोबर ला दीक्षा दिन मानणारेही, धर्मचक्र प्रवर्तन दिन, या नामकरणात संतुष्टी शोधू लागलेत.

मुंबईत १६ डिसेंबर १९५६(रविवार) रोजी प्रस्तावित दिक्षेला बाबासाहेब दीक्षा विधी समारंभ म्हणतात. _समजा बाबासाहेबांचे महाप्रयाण ६ डिसेंबर ऐवजी १६ डिसेंबर नंतर झाले असते आणि नियोजित तारखेला त्यांनी दीक्षा दिली असती तर त्यांच्यापश्चात मुंबईच्या बौद्धांनी तो दिवस कोणत्या नावाने साजरा केला असता……? बाबासाहेबांनी नागपुरात धर्म चक्राचे प्रवर्तन केले, असे मानणारे चंद्रपूरच्या दिक्षाभूमीचे कर्तेधर्ते १६ ऑक्टोबर ला बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा म्हणजे अनुवर्तन मानतात. तेही त्याच माळेचे मणी ठरतात.कारण _अनुवर्तन ही एक युगनिर्माण (epoch making) प्रक्रिया अथवा संकल्पना आहे._ त्याअंतर्गत १९५६ ची दीक्षा, मग ती नागपुरातील असो अथवा चंद्रपुरातील, ती दिक्षाच आहे. त्यामुळेच आज जर कोणी ५ अथवा पन्नास लाख लोकांना दीक्षा दिली म्हणून ते धर्म चक्राचे अनुवर्तन ठरणार नाही.असे कां..?

_आजची/वर्तमानातील दीक्षा ही १९५६ च्या दीक्षेतून प्रेरणा घेऊन स्फुरलेली कृती असणार. ती स्वतंत्र दिसत असली तरी, त्या कृतीची नाळ जोडली गेली आहे .म्हणून ती जुन्याची विस्तारित कृती आहे, नागपुरातील १९५६ च्या धर्म(धम्म)क्रांतीचा विस्तार आहे._ यात मुद्दा संख्येचा नसून विशिष्ट मूल्यव्यवस्थेच्या अंगीकाराचा आहे, ज्याचा आरंभ आधुनिक भारतात बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून बाबांनी केला.काही सुज्ञ-विज्ञ जण १९५६ ची बाबासाहेब कृत दीक्षा हे धर्मचक्राचे प्रवर्तनच होय, असे दामटताना युक्तिवाद करतात की, बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म जसाच्या तसा न सांगता, त्यात झालेली कालानुक्रमिक प्रदूषणे लक्षात घेऊन त्याला चाळणी लावत, परिष्कृत धम्म सांगितला दिला. _बाबासाहेबांनी परिष्कृत रुपात, धर्म(धम्म) दिला हे १०० टक्के मान्यच_. पण शेवटी तो तर बुद्धाचाच धम्म(धर्म) होता की नाही?. म्हणून TBHD मध्ये अंतर्भूत धम्माच्या अनुषंगाने ते म्हणतात, “What the Buddha Originally taught during his lifetime.” (बुद्धाने त्यांच्या हयातीत जे मूलतः शिकविले) बाबासाहेबांनी त्यांच्याद्वारे उपदेशीत धम्म दिला नव्हता. त्यामुळे _बाबासाहेबांना धर्मचक्राचे प्रवर्तक म्हणणे आणि 1956 दीक्षा हे धम्मचक्राचे प्रवर्तन हे संबोधन युक्त प्रचार हा केवळ अज्ञानमूलक आणि सहजवृत्तीचे आहे._

_बुद्ध हे धर्माधिपती आणि धर्मराज होते.(असे स्वतः बुद्ध सांगतात)_ म्हणून ते धर्म चक्राचे प्रवर्तक आणि त्यांच्याद्वारे उपदेशीत धम्माला पुढे विस्तारित करण्यासाठी नेतृत्व देणारा(बुद्धकालीन) सेनापती सारिपुत्त होते. म्हणून ते धर्म चक्राचे अनुवर्तक.असेच धर्मसेनापती होण्याचे कर्तव्य आणि जवाबदारी बुद्धापश्चात सम्राट अशोक यांनीही यशस्वीपणे पार पाडली. म्हणून तेही धर्म चक्राचे अनुवर्तक ठरतात. आधुनिक भारतात त्याच जवाबदारीचे वहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणून तेही धर्म चक्राचे अनुवर्तक ठरतात.

आता, तुम्हीच सांगा,

१. _एका धर्माचे/धर्मचक्राचे/धर्म विनयाचे, प्रवर्तक (founder and propagator) किती असू शकतात?_
२. बुद्ध हे जर धर्मचक्राचे प्रवर्तक, तर सारिपुत्राला सुद्धा बुद्धाने धर्मचक्र प्रवर्तक का म्हटले नाही?
३. धर्मचक्राचे प्रवर्तन बुद्धाव्यतिरिक्त इतर कोणी करू शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर, ते खुद्द बुद्धाच्या वक्तव्याविरोधात जाणारे ठरत नाही का?
४. _मग १९५६ ची दीक्षा, मग ती तुम्ही तारिख वाली माना, अथवा तिथीवाली *धर्म चक्र प्रवर्तन* कसे….?_( तिथीच्या घोळाबाबत पुढे लिहू). मात्र *आजवर आम्ही त्या दिवसाला धर्म(धम्म)चक्र प्रवर्तन दिन असे म्हणत आल्याने, यापुढेही तसेच संबोधू,असे म्हणणार असतील, त्यांनी कृपया एक काम करावे:*

_नागपूरच्या दीक्षाभूमीला, दीक्षाभूमी ऐवजी धर्म चक्र प्रवर्तन भूमी असे नामकरण करण्याचा प्रस्ताव स्मारक समितीकडे पाठवावा. त्यामुळे तुमच्या धारणांचे दृढीकरण होऊन त्याचे सार्वत्रिकरण होण्यास हातभार लागेल._

🙏🏻नमो बुद्धाय🙏🏻
✒️धर्मचक्र प्रवर्तन संभ्रम निवारण समिती (ABP)द्वारे बौद्ध हितार्थ जारी

शंका अथवा कुशंका असल्यास,निरसनासाठी संपर्क साधला जाऊ शकतो.

सुगत सिद्धव्रत
मो:-8169965534,9673582315