‘ उत्सव स्री शक्तीचा ‘ इ-काव्य संग्रहाचे प्रकाशन

35

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.24ऑक्टोबर):-नाते शब्दांचे साहित्य मंच ‘ समूहाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत ‘ उत्सव स्री शक्तीचा ‘ या दुसऱ्या महिला विशेष ई प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि.२३ ऑक्टो.२०२० वार शुक्रवार रोजी रात्री ठीक आठ वाजता आपल्या व्हॉट्सअप समुहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ऑनलाईन पद्धतीने पार पाडले.

सदर प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी समूहातील, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी कवयित्रीनी आपापल्या स्त्री विषयावरील कविता पाठविलेल्या होत्या, पैकी नियमात पाठविलेल्या रचनांपैकी ७६ रचनांचा दर्जेदार ई काव्यसंग्रह झालेला असून कवितांचे संकलन कवयित्री सौ.चंदन तरवडे, यांनी तर सहसंपादक म्हणून कवी पंडित निंबाळकर यांनी काम पाहिले.

सदर ई काव्य संग्रहाला अधिक आकर्षक आणि सुबकता आणण्याचे काम समूह प्रमुख, संपादक व ग्राफिक्सकार कवी ज्ञानेश्वर शिंदे,कोपरगाव यांच्या कार्य शैलीतून झालेले आहे.कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम समुहात उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर सहसंपादक कवी पंडित निंबाळकर सर यांनी अध्यक्ष निवडीची सूचना मांडून त्यास अनुमोदन जेष्ठ कवी डॉ. जी.के. ढमाले यांनी दिले. नंतर मुखपृष्ठाचे अनावरण करून संपादकीय मनोगत पेज सर्वांसमोर सादर केले.

तद्नंतर जेष्ठ कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वनमालाताई पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडून संपूर्ण काव्यसंग्रह pdf स्वरूपात प्रकाशित करून वाचकांच्या हाती सुपूर्त केला, जेष्ठ कवी बाळासाहेब देवकर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली. सर्व सदस्य प्रत्यक्षात प्रकाशन सोहळ्याचा आनंद घेत असल्याचे अनुभवत असल्याचे प्रतिक्रियेत सर्वांनी व्यक्त केले.

स्त्रीचा सन्मान व्हावा, तिच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी, तसेच एकाच विषयावरील विविध कवितांचे संकलन व्हावे या उदात्त हेतूने आपण या ई प्रातिनिधिक काव्यसंग्रह निर्मितीची संकल्पना राबविल्याचे समूह प्रमुख व संपादक कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे.