विजया दशमीचा आनंदोत्सव

31

       ▪️विजयादशमी विशेष▪️

मी इतरांकडे अंगुलीनिर्देश करणारा शतपट बदमाश असतो. येथे स्पष्ट आहे की मी एकच बोट दुसऱ्याकडे दाखवतो. मात्र माझीच उर्वरित चारही बोटे मला दोषी ठरवत आहेत. परंतु मी आपल्या दोषांवर पांघरुण घालण्यासाठी बदमाशी करून दुसर्‍यास उघडा पाडत असतो. दोषारोप करण्यास तो स्वस्त असतो का? मात्र श्रेय्य लाटताना किंवा पाठीवर थाप मिळवितांना ‘मी-मी’ करतो. खरं सांगा, मग मी मस्त असतो का? मी आहे म्हणून सर्व नीट चाललंय. मी नाही तर सगळं खल्लास होईल, अशी मनोभावना म्हणजेच संकुचितवृत्ती व वृथाभिमान होय. हा आपला स्वप्नवत आभास काढून मन स्वच्छ केले तर मी खऱ्याखुऱ्या विजयाचा दावेदार ठरणार आहे. विश्वशांतीचे दूत संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी म्हटले आहे.

“मै में हैं अभिमान साधो तू में ये भगवान हैं |
मैं से होती जीवन हानि और तू से कल्याण हैं |
मैं मेरी न कर मन मेरे तू ही तू ही करता जा |
कहे ‘हरदेव’ सदा दुनिया में आनंद से विचरता जा |”
[ सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र. १९१ ]

विजयाचा उत्तुंग शिखर मर्यादित कालावधीत सर करताना समयसूचकता व बुद्धीचा वापर दक्षतेने करावा लागतो. चालताना अकस्मात बुटात शिरलेला खडा मनात राहून राहून काहूर उठवितो. आंत मनाला तर बाहेर तळपायाला कळा व जखमा होत असतात. पण आपण त्यांना दुर्लक्षित करून झटपट शिखर सर करण्याच्या विचाराने झपाटलेले असतो. लागेल थोडा वेळ! पुढचा टप्पा आपण त्वरेने पार करू, म्हणून वेळीच खडा काढून फेकून दिला पाहिजे. अन्यथा यशाच्या अगदी जवळ जाऊन पायच निकामी व्हायचे आणि नाहक दोन्ही गोष्टींची चोट बसायची! मराठीत एक म्हण आहे तसे…

“तेल गेले, तुपही गेले |
हाती धुपाटणे आले ||”

जगात सर्वत्र मी, माझे, मला या स्वार्थी व आपमतलबी भावनेला महापूर आलेला दिसतो. मीपणा म्हणजेच अहंकार किंवा गर्व होय. हा दहा तोंडांच्या रुपाने अर्थात त्याहूनही अधिक अंगाने दृष्टीस पडत असतो. श्रीमंती, तारुण्य, सुंदर रुप, विविध कला, हुशारी, धर्म, जात, लिंग, वर्ण, सद्गुण, कर्तृत्व आदींचा गर्व माणसाला माणूसकी व जीवनातूनही उठवू शकतो. म्हणून वेळीच मीपणाला जाळले, गाडले, ठेचले व ठार केले पाहिजे. हा ‘मी’ दहनयोग्य दशानन, दशग्रीव आहे ! प्रतिकात्मक दहनापेक्षा भावनात्मक दहन खरी विजया दशमी साजरी केल्याचा आनंदोत्सव ठरतो. आपल्यात अनेक चांगल्या गोष्टी प्रतिबिंबित झालेल्या आहेत. मात्र त्याबद्दलचा मीपणा – वृथाभिमान हे एकच अवलक्षण सारं काही होत्याचं नव्हतं करून बरबादीची अवकळा पसरविते. विश्वबंधुत्वाचे मसीहा निरंकारी बाबा म्हणतात..

“निंदा और चुगली की बातों से जो सजती महफ़िल हैं ।
तू क्यों आदत के वश बन्दे उस महफ़िल में शामिल हैं ।
कहे ‘हरदेव’ यदि निंदा से बाज़ नही तू आयेगा ।
निंदक भी कहलायेगा और भक्ति से भी जायेगा ।”
[ सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र. २०३ ]

पंढरपूरचे महान भगवद्भक्त मा.संतोषजी चौंडावार हे वाचक सज्जन मला नेहमी माझी ख्यालीखुशाली विचारत असतात. ते माझ्यातील मीपण अवास्तव फुगू नये म्हणून वारंवार फोन करीत असतात. माणसातील मीपणा खरेच सत्यानाशक कीड असल्याचेही ते सांगून सचेत करतात. सगळे लोक असाच सण साजरा करतात. म्हणून मीही त्यात सहजच सहभागी होत असतो, अशी आपली प्रांजळ कबुली असते. ते तसे नाही मित्रा ! प्रत्येक सत्सवामागे काही ना काही वैज्ञानिक दृष्टिकोन व कार्यकारण भाव दडलेला असतो. आधी त्याचा सुगावा घ्यावा लागतो. मगच त्याचे फलित कळते. संत अथवा सद्गुरुच्या सहवासाचा अलभ्य लाभ हा दसरा आणि दिवाळीच ठरतो. ब्रह्मनिष्ठ सद्गुरुला शरण जाऊन त्याच्या चरणांवर मीपणा समर्पावा लागतो. ज्ञानोत्तर जीवन हे पुनर्जन्म झाल्यासारखेच असते..

“सद्गुरुशी शरण जाये,
त्याशी ब्रह्म प्राति होय ।
न लगे आनिक उपाय,
धरी सद्गुरुचे पाय ।।”

संताजवळ आपले दुःख व्यक्त केले जातात. मात्र सुखाचे विश्लेषण टाळण्याचाच प्रयत्न होत असतो. तद्वतच श्रीचरणी आपले सद्गुण हासीखुशीने प्रकट केले जातात. मात्र आपले दुर्गुण, दोष, गुन्हे आणि पापे ही समजून उमजूनही लपविली जातात. मी पूर्वी चोर, दरोडेखोर, हत्यारा, बाहेरख्याली, महापापी, विघ्नसंतोषी आदी दुर्गणांचा भांडार होतो, हे व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. असे का? कारण अजूनही आपल्यातील मीपणाचा अंश कायम धुमसतच असतो. जो सद्गुरु चरणांवर आपले सकळ गुणावगुण व सुखदुःख निःसंकोचपणे सांगून मन हलके करतो तोच जीवनात मृत्युंजय ठरतो. यामुळे मन धुऊन निघते व निर्मळ बनते. या कथनालाच अध्यात्मज्ञान-विज्ञानात आत्मनिवेदन म्हंटले जाते. नेहमी नेहमी दशानन समजून प्रतिकांचे दहन करणे काय कामाचे? एकदाच असे मीपणाचे दहन करुया आणि आजीवन विजयानंदात तल्लीन होऊन राहुया !

“विजया दशमी मोठी ।
नाही आनंदास खोटी ।।”
!! आवडीने दररोज वाचा पुरोगामी संदेश !!

✒️लेखक:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
[ मराठी साहित्यिक तथा संत व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक]
मु.- प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास.
एकता चौक, रामनगर, गडचिरोली.
पो. ता. जि.- गडचिरोली.
मोबा.नं. ७७७५०४१०८६.
इ-मेल – krishnadas.nirankari@gmail.com