पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल

31

🔹नाशिक मनपा व नगरसेवक प्रविण तिदमे यांचे प्रयत्न सफल

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25ऑक्टोबर):- पाकिस्तानला युद्धात धूळ चारणारा आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यातील टी 55 हा रणगाडा बुधवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाला. नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या दीड वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

नाशिक मधील नागरिकांना भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची, शौर्याची महंती कळावी आणि तरुणांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी नाशिक मध्ये सैन्यदलाची वॉर ट्रॉफी असावी अशी संकल्पना नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी मांडली होती तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने लष्कराने टी ५५ हा रशियन बनावटीचा रणगाडा नाशिक महापालिकेला देण्यास मंजुरी दिली.

गेल्या दीड वर्षांपासून हा रणगाडा नाशिक मध्ये आणण्यासाठी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे व नाशिक मधील सेवाभावी संस्था प्रयत्नशील होते. अलीकडेच त्यांनी महासभेतच आंदोलनाचा इशारा पण दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या. बुधवारी पुणे येथून हा 40 टन वजन असलेला रणगाडा नाशिक महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे . जुने सिडकोतील लेखानगर येथे हा रणगाडा ठेवण्यात येणार आहे.

मात्र, येथील काम पूर्ण झालेले नसल्याने हा रणगाडा सध्या जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या मागील क्रीडांगणात उतरविण्यात आला आहे. टी 55 या रणगाड्यांनी सन १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या ५८ रणगाडे नष्ट केले होते. सन १९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यादलात चांगलीच दहशत निर्माण केली होती.

भारतीय सैन्यदलात या रणगाड्यांनी ४० वर्षे देशसेवा केली आहे आणि आता नाशिकच्या लौकिकात भर घालणार आहे.सिङको परिसरातील विविध संस्था राजकीय सामाजिक सांस्कृतिक स्तरावरील अनेकांनी नगरसेवक प्रविण तिदमे यांचे अभिनंदन केले आहे.