विकलांग शेखर कुलकर्णी यांचे यशस्वी ऑपरेशन

43

🔸समाजमनच्या आवाहनाला नाम फाउंडेशचा प्रतिसाद: अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंचे मानले आभार

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1नोव्हेंबर):- काही महिन्यांपूर्वी शेखर कुलकर्णी यांचा घरात अपघात झाला आणि शेखर कुलकर्णी यांना गंभीर इजा झाली होती, त्यांचे पहिले ऑपरेशन झाले होते, मात्र दुसरे ऑपरेशन आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकले नव्हते. या प्रश्नाला कोल्हापुरातील समाजमन संस्थाने लक्ष वेधले, त्यानंतर अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनतर्फे शेखर यांच्या पुढील उपचाराची जबाबदारी घेतली, त्या नुसार विकलांग शेखर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील अस्टर आधारमध्ये ऑपरेशन झाले.

याबाबत सावली केअरचे सर्वेसर्वा किशोर देशपांडे यांनीही सामाजिक बांधिलकी जपली. ऑपरेशनपूर्वी शेखर कुलकर्णी यांना श्री. देशपांडे यांनी सावली केअरमध्ये दाखल करुन त्यांच्यावर फिजीओथेरपीचे विविध उपचार मोफत केले, या काळातील सर्व खर्चाचा भार त्यांनीच उचलला.
शेखर हे कोल्हापुरातील एका उद्योगपतींकडे नोकरीला होते. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे काही महिन्यांपूर्वी ते जरगनगरमधील घरी होते.

एकेदिवशी ते घराबाहेरील लोखंडी जिन्यावरुन तोल जावून खाली पडले आणि त्यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर एका दवाखान्यात ऑपरेशन झाले. त्यानंतर त्यांचे दुसरेही ऑपरेशन करणे अत्यावश्‍क होते. मात्र, संबंधित दवाखान्याने ही जबाबदारी स्वीकारली नाही. या अपघातात शेखर यांच्या डोक्‍याला गंभीर इजा होण्यासह एक पाय आणि एक हात लुळा पडला होता. तसेच त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते अंथरुणालाच खिळून होते. ते आणि त्यांच्या आई पुष्पा कुलकर्णी या दोघांचाच एकमेकांना आधार होता.

भाड्याचं घर, मिकळत शून्य आणि दवाखान्यात दाखल केल असत तर खर्च कोण भागवणार, असा यक्षप्रश्‍न त्यांच्या आईसमोर होता. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट बनली होती. दरम्यान, शहाजी छत्रपती कॉलेजचे प्राध्यापक एम.टी. पाटील यांनी त्यांच्या सद्यपरिस्थितीबाबतची माहिती कोल्हापुरातील समाजमन सामाजिक संस्थेच्या लक्षात आणून दिली. संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे आणि हितचिंतक सतीश वणिरे यांनी कुलकर्णी यांच्या घरी जावून त्यांची पाहणी केली. शेखर हे ज्या उद्योगपतींकडे कामाला होते. त्यांच्याकडे प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर हे कधी, कधी येत असत. एकेदिवशी नाना पाटेकर त्यांच्या घरी आले असता, शेखर यांनी नाना पाटेकरांसोबत फोटो काढला होता.

तो फोटो पुष्पा कुलकर्णी यांनी दाखवला. यावेळी महेश गावडे यांनी, त्यांच्या परिस्थितीविषयी नाना पाटेकर यांना बोलूया, असे सांगताच पुष्पा कुलकर्णी उदगारल्या, नाना पाटेकर मोठा माणूस, तो आम्हा गरिबांकडे त्यांचे लक्ष जाईल का, असे म्हटल्यावर महेश गावडे यांनी, सोशल मिडियाच्या माध्यमातून हीच त्यांची विवंचना आणि त्यांच्यावर ओढावलेली परिस्थिती बातमीच्या माध्यमातून समाजासमोर आणली, तशीच ती अभिनेते नाना पाटेकर यांच्यापर्यंतही पोहचली. याकामी सतीश वणिरे यांच्या कोल्हापूर मिरर या वेब पोर्टलचाही उपयोग झाला. दरम्यान, नाना पाटेकर यांनी संस्था अध्यक्ष गावडे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत, शेखर कुलकर्णी यांच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी आपण घेत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शेखर कुलकर्णी यांना ऑपरेशनसाठी अस्टर आधारमध्ये दाखल केले होते.

त्यांचे डोक्‍याचे ऑपरेशन नुकतेच झाले. ते यशस्वी झाले. यासाठी अस्टर आधारमधील डॉ. खान यांच्यासह ब्रदर गौरव गावडे व तेथील स्टाफ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शेखर यांना आता डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. दरम्यान, महेश गावडे यांनी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे व सावलीचे श्री. देशपांडे यांचे आभार मानले आहेत. या मान्यवरांनी दाखवलेल्या दातृत्वामुळेच शेखर कुलकर्णींचे ऑपरेशन यशस्वी होवू शकले, अशी भावना समाजमन संस्थेची आहे. समाजमनचे सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे यांच्याकडे कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाने कुलकर्णी यांच्यासाठी मदत दिली आहे, ती त्यांना सुपूर्द केली जाणार आहे.