साक्षात मृत्यूशी झुंज देणारा झुंजार (खल) नायक-अनिल नाकतोडे

62

झाडीची माणसं कलासक्त आहेत . ते कला आणि कलाकारांवर जिवापाड प्रेम करतात . झाडीच्या मातीला कलेचा वारसा असल्यामुळे तो वारसा पिढ्यान् पिढ्या जपणारे कलावंत झाडीच्या मातीत निपजतात आहेत . आपल्या कलाविष्काराने झाडीचा कला प्रांत समृद्ध करतात आहेत.

झाडीच्या नाट्य कलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलीया म्हणजे मा. अनिल नाकतोडे . त्यांचे वडील श्री . दाजीबा नाकतोडे गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे . “आपण त्यांच्या समान व्हावे ” असे त्यांना नेहमी वाटायचे.

त्यांनी जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतले . दहावीची परीक्षा चालू असतांना अभ्यासापेक्षा रात्रभर नाटक आणि सिनेमा पाहण्याची त्यांना अधिक रूची होती . त्यामुळे जेमतेम ‘ मॕट्रीक ‘ राहिल्याची खंत ते बोलून दाखवतात . खरं तर त्यांचं पाठांतर चांगलं आहे . ते एकपाठी आहेत . नाटकाततील संवाद आजही ते घळाघळा बोलून दाखवतात.

पाचवी ते सातवीत असतांना सकाळी शाळा आणि त्यानंतर गाई राखयला जावे लागत असे . त्यामुळे बापाची बोलणी खावी लागायची . शाळेतील वही ,पुस्तक ,पेना ऐवजी गुराख्याची काठी अधिक वेळ त्यांच्या सोबत असायची . त्यामुळे साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे.खरंतर त्यांचे बंधू फॉरेस्ट डिपार्टमेंटमधे नोकरीला लागल्यामुळे त्यांनी शिक्षणाची वाट दाखवली खरी . पण ती त्यांना अवघड वळणाची वाटली . पुढे आटाचक्की चालवणे , शेतीमातीत राबणे याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

घरकाम , शेती , गुरे आदीं कामामुळे आईला त्रास व्हायचा . त्यामुळे तिला कामात मदत व्हावी म्हणून लवकरच लग्न बंधनात अडकावे लागले.भाऊबिज ते होळी या कालावधीत आयोजित केलेल्या नाटकांना मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळेच वडसा हे “झाडीवूड ” म्हणून नावारूपास आले आहे . बैलांचे इनामी पट , मंडई अथवा काहीतरी निमित्त्य वा औचित्य साधून गावात नाटकांचे आयोजन केले जाते . त्यामुळे आज पन्नास ते साठ नाटक कंपण्या तग धरून आहेत . जवळपास पाचशे पुरूष कलावंत तर अडीचशे स्त्री कलावंत आणि दोनशे संगीतसाथ करणारे कलावंत , नेपत्थ्य , ध्वनी व प्रकाश योजना साकारणारे मंडप डेकोरेशन बांधकाम करणारे शेपाचशे पडद्यामागचे कलावंत झाडीच्या चार महिन्यांच्या सिजनवर आपली चूल पेटवतात.

झाडीवूडने पुण्या मुंबईच्या सुप्रसिद्ध सिनेकलावंतांना भुरळ पाडली . त्यामुळेच मोहन जोशी , मकरंद अनासपूरे ,दीपक शिर्के , रमेश भाटकर, अरूण नलावडे , यासारख्या अनेकांनी झाडीच्या रंगभूमीवर हजेरी लावली.16 जानेवारीला उदापूर मधे इनामी शंकर पटाचे आयोजन . त्या निमित्ताने नाटक . हे ठरलेले समिकरण . हा अलिखित नियमच जणू . आजही ती परंपरा कायम आहे . शंकरपट बंद झाले असले तरी नाट्य परंपरा चालू आहे . आजही गावात दोन नाटकांचे आयोजन केले जाते . उदापूरची शंकर पट परिसरात अत्यंत नावाजलेली . भंडारा ,गोंदिया, गडचिरोली , चंद्रपूर जिल्ह्यातील जोड्या शर्यतीसाठी पटाच्या दानीवर उतरायच्या . पट बघण्यासाठी आलेले सोयरेधायरे , पैपाहुणे रात्री नाटक बघायला यायचे . गावात दोन नाटकं असतात . पण अगदी सुरवातीच्या काळापासून ते कधीच तोट्यात आले नाही.

शंकरपट बंद झाल्यानंतरच्या वर्षी दोन नाटकांचे आयोजन केले होते . गावात पाहिजे तेवढा पाहुण्यांचा राबता दिसत नव्हता . नाटकांची बुकिंग होणार की नाही या वंचनेत दोन्हीही मंडळांचे सदस्य होते . रात्री आठ साडेआठ वाजतापर्यंत एकही तिकिट कटली नाही . पैसा निघणार की नाही ही चिंता सतावत होती. पण नंतर मात्र दहा वाजतापर्यंत दोन्हीही थिएटर हाऊसफुल झाले . दोन्हीही बाजूला प्रत्येकी पन्नास ते साठ हजारांचे बुकिंग झाले . आणि मंडळांचा पुर्णतः विश्वास बसला की नाटक हे पटावर अवलंबून नसून जनतेच्या रसिकतेवर अवलंबून आहेत . झाडीची माणसं खरच नाट्यवेडी आहेत . याचा पूर्णतः प्रत्यय आला होता . आजूबाजूच्या खेड्यांतील रसिक मंडळी कुडकुडत्या थंडीत नाटकांचा आस्वाद घ्यायला मोठ्ठ्या संख्येने आली होती.

अनिल नाकतोडे यांना आधीपासूनच नाटकाची आवड असल्यामुळे ते नाटकाला पहिली पसंती दर्शवतात . त्यांचे रंगभूमिवरील पहिले पाऊल पडले ते अनपेक्षितच . अगदी ध्यानीमनी नसतांना . त्यांच्याच शब्दात त्या प्रसंगाची आठवण उभी करायची झाल्यास ते सांगतात.

त्या दिवशी गावात ” सिंहाचा छावा ” नाटक होतं . ते बघायला मिळणार असल्याने खूप आनंद झाला होता . खिशात फक्त चार रूपये होते . तिकीट सहा रूपये असल्याने दोन रूपयांचा जुगाड कुठून तरी जमवावा लागणार होता . शेवटी जमलं. यादवराव नाकतोडे मोठेभाऊ यांचे कडून मिळाले पैसे . तिकीट काढून थेट थिएटर मधे प्रवेश घेतला . बघतो तर काय ? माझाच पहिला नंबर . अजून एकही प्रेक्षक आले नव्हते . त्यामुळे पहिल्या रांगेतील खुर्ची मिळाली . नाटक जवळून बघायला मिळणार होते . हा आनंद शब्दातीत होता . तेवढ्यात मंडळाचा सदस्य आला . म्हणाला ,अबे तुलं आतमंदी बलवत आयेत . ” “मी नाई ये रे बावा . तिकळं आलो तं माजी सिट जाईल .” “अबे चल ना . तुलं नाटकात काम करालं बलावतेत .” दुसरा सदस्य आला . त्याने आग्रह केला.

“मजाक बाजी नोको करा . माजी सिट जायेल . फुकट नाही . हे पाय टिकीट काढून आलो . ” “मज्जाक नोहे . एक कलाकार नाही आला . जरासाच काम आये . “”माजं टिकटीचं सा रूपे देत असाल तं येतो . ” म्हणत मेकअप रूममध्ये प्रवेश केला . त्यांनी माझ्या नुकतीच मिसरूढ फुटलेल्या उंच सडपातळ शरीराला न्याहाळलं .
” हं जमते याला सहदेवचा रोल !” म्हणत मेकअप करायला लावलं आणि पहिल्यांदा रंगमंचावर अभिनय साकारण्याची संधी आयती चालून आली . ही साक्षात नटेश्वराचीच कृपा . नाहीतर एवढ्या नावाजलेल्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी सहज उपलब्ध झाली नसती.

बराच वेळ पर्यंत चेहरा रंगवून डायलाग पाठ करत एन्ट्रीची वाट पाहत बसलो . ” अभिमन्यु , चक्रव्युव्ह भेदणे म्हणजे पोरखेळ नव्हे .” एकदाची एन्ट्री झाली . संवाद झाला आणि जेष्ठांचा आशीर्वाद मिळाला आणि हायसे वाटले . पुढे नाटकांची आवड वाढली . चौदा वर्षांनी “सिंहाचा छावा ” नाटक बसवले . त्यात द्रोणाचार्यांची भुमिका साकारायला मिळाली . यात सहा पद होते . उदापूर ते मोहटोला ( किन्हाळा )हे अंतर सायकलने पार करत संगीतकार शाम शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली ती सहा पद( नाट्य गीत) बसवले आणि रसिकांची वाहवा मिळवण्यात यश आले.

या यशानंतर हुरूप वाढला . गावातील प्रतिष्ठित मंडळाचे अध्यक्ष रामदास पाटील नाकतोडे यांचे सहकार्याने नाटक उभे करायला सुरवात केली . वर्गणी गोळा करणे . नाटक बसवणे . सादरीकरण करणे ही महत्वाची कामे आनंदाने स्विकारत असे . पुढे तर एक वर्षांपासून त्या तयारीला लागत असल्यामुळे फारशी अडचण जात नसे . जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे शिवधनुष्य पेलने सहज शक्य होई.

पुढे दत्ता आगलावे , राम दोनाडकर , शोभा जोगदेव , शबाना खान ,प्रा. शेखर डोंगरे ,के. आत्माराम , हिरालाल पेंटर यासारख्या पट्टीच्या कलावंतांसोबत रंगभुमीवर अभिनय आकारास आला . अनेक ज्येष्ठ , समवयस्कांचे सहकार्य आणि मार्गदर्शन कामात आले . वीर उमाजी नाईक मधे उमाजी , तेजस्वी नाटकात कर्ण , आम्ही एकशे पाच नाटकात चित्रसेन , प्रीत जमली चाळातून मधे हंबीरराव , बिजली कडाडली मधला विलास या भुमिका रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत.

मौशी ( ब्रम्हपुरी ) येथील ” बिजली कडाडली ” नाटकात रंगेल ,दारूबाज विलास रंगवला . पहिला प्रवेश झाल्यानंतर प्रेक्षक कुजबुजायला लागले . ” अबे हा पक्का बेवळा मारून आहे . मायच्यान हा आता काम नाही करू सकत .” मंडळाची माणसेही तशीच बोलली . पण त्यांना कळले होते की पात्र उभे करायला नशेचा सहारा घ्यावा लागत नाही तर कलेतच खरी नशा असते .

हिरालाल पेंटर यांनी नाकाडे प्रेस वडसाला कलावंत म्हणून नावे दिली होती .

महाराष्ट्र प्रेसला दोन गृप होते. दोन्हीही गृपची नाटकं बुकिंग झाली की एका गृपला वर्णी लागायची . रू. तीनशे मानधनात मा. बब्बूभाई प्रेसवाले यांचेकडे मनापासून काम केलं . मा. वडपल्लीवार गुरूजी , मा. शेखर डोंगरे , मोरेश्वर खानोरकर ,केशव खरकाटे आदी नामवंत कलावंतांसोबत रंगमंचावर मोकळेपणानं वावरता आलं . रायगडाचा राजेश्वर ,तंट्या भिल्ल (मेजर ) ,तेजस्वी मधला कर्ण , संसार मधला अविस्मरणीय गुलशन साकारता आला.

कोच्ची ही व्यंकट राऊत यांची सासूरवाडी मधे ” प्रीत जमली चाळातून ” नाटकाचे आयोजन केले होते. वडसाच्या प्रेसमधे छपाईसाठी टाकलेले पांम्प्लेट अचानक पहायला मिळाले . त्यात हंबीररावच्या भुमिकेत अनिल नाकतोडे लिहिलेले पाहिले आणि आश्चर्याचा धक्काच बसला . तशीच धाकधूक सुद्धा . या नाटकाची स्क्रिफ्ट हातात नाही . तेव्हा सरळ पिंजारकरांचे पुस्तकांचे दुकान गाठले .नाटकांची पुस्तके मिळण्याचे ते एकमेव स्थान . तिथून पुस्तक आणले आणि पाठांतर चालू केले .खरं तर यात विलास आणि देवदत्ताच्या भूमिका साकारलेल्या होत्या . परंतु हंबीररावच्या भूमिकेचा अनुभव नवा होता . पण रंगमंचावर हंबीररावच्या भुमिकेला न्याय दिल्यामुळे सहकलावंतांनीही रसिकांनीही कौतुकाची थाप दिली.

रंगपंचमीला अमिर्झा येथे ” झाकून किती झाकायचं ” या नाटकाचा प्रयोग होता . मा. गुलाम सुफींनी मला पाचारण केले . तिथे पाम्प्लेवर नाव दुस-याच कलावंताचे होते . माझ्या नावाचा थांग पत्ता नव्हता . नाटकाच्या दिवशी मेकअप रूममध्ये कलावंत आले . प्रा . राम दोनाडकर (विजय), मा. दत्ता आगलावे (राजा ), जयसिंगचा रोल ज्यांना दिला होता ते मा. मोरेश्वर खानोरकर हे ही उपस्थित झाले . तो रोल मलाही आॕफर केला असल्यामुळे मी मनोमन नाराज झालो . परंतु मा . गुलाम सुफींनी समजावल्यानंतर मोरेश्वर खानोरकर मला रोल द्यायला तयार झाले.

” अनिल तू हो पुढे. मी हा रोल अनेकदा केलेला आहे . आज तू कर . तू नवीन आहेस . तुला रोल मिळाला नाही तर तू नाराज होशील . तुझ्यावर त्याचा दूरगामी परिणाम होवू शकतो .” त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला खरा पण काही लोकांनी नाराजी व्यक्त केली . “कोणी काहीही म्हणो. तू तुझ्या पद्धतीने रोल कर . मी आहे तुझ्या पाठीशी .” म्हणत मोरेश्वर खानोरकरांच्या रूपाने साक्षात नटेश्वरानेच पाठबळ दिल्याचा भास झाला . जयसिंगचा रोल भाव खावून गेला . रसिकांच्या टाळ्यांनी मनोधैर्य वाढले .
नर्तकी नाटकातील आनंदाच्या भुमिकेचे मा. गुलाम सुफी आणि धर्मभाष्कर नाटकातील मुकर्रब खान या भुमिकेचे मा. माणिक शिंदे दिवाने झाले.

“उदापूरके लडकेने जो रोल निभाया ,वो नागपूर या मुंबईका कलाकार भी नही निभा सकता .” सुफींनी केलेली स्तुती म्हणजे कौतुकाने दिलेली थाप होती . प्रचंड उर्जेचे पाठबळ होते . व्ही. दिलिपकुमार यांच्या महालक्ष्मी रंगभूमीने देखील हृदयस्थ केले . “जवानी लपली पदराखाली” मधला झुंजार रसिकजनांच्या काळजात उतरला.खरं तर त्यांनी विनोदी ,चरित्र अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारल्या . पण त्यांना खलनायक साकारायला प्रचंड आवडायचा . उंच धडधाकट देहयष्टी , चेहऱ्यावरचा रूबाब , आवाजातील जरब यांमुळे दिग्दर्शकांनी त्यांची खलनायक म्हणून निवड सुद्धा केली . पुढे रसिक मायबापांची दाद सुद्धा दिली.

“अवतार कला निकेतन रंगभूमी ब्रम्हपुरी /वडसाच्या” नावाने स्वतःची प्रेस ओपन केली . मा . मोहन जोशी सारख्या हिंदी मराठी सिनेनाट्य सृष्टीतील दिग्गज कलावंताला कास्टिंग केलं . सोबत किर्ती आवळे डांस हंगामा आणि राजा चिटणीस सारखा सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत सोबत असतांना देखील अल्पावधीतच नाट्य सृष्टीतील हा अवतार संपवावा लागला . “जवानी लपली पदराखाली ” या व्ही.दिलिपकुमार यांच्या नाटकांचे अनेक प्रयोग झालेत. त्यातील प्रतापची भुमिका मा. मोहन जोशी तर झुंजार अनिलजी साकारायचे . ही भुमिका झाडीपट्टीत प्रचंड गाजली.

जवळपास तिस वर्षांपासून ते झाडीपट्टी रंगभूमीवर वावरतांना दिसतात . महाराष्ट्र रंगभूमी , भारत रंगभूमी , धनंजय स्मृती रंगभूमी , महालक्ष्मी रंगभूमी , एकता कला रंगभूमी ( जूनी आणि नवीन सुद्धा ), युवा रंगमंच , महाराष्ट्र ललित कला रंगभूमी , अम्मा भगवान रंगभूमी यासारख्या अनेक गृपमधून त्यांनी दोन हजारांपेक्षा जास्त नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या . ” धर्म भाष्कर” या नाटकाचे दिडशेच्या वर प्रयोगातून त्यांनी सहभाग नोंदवला.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक सुखदुःख ऊनसावली सारखी येतात आणि जातात सुद्धा . अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते . अनेक प्रसंगावर धैर्याने मात करावी लागते . अनिलजींच्या आयुष्यात देखील अनेक चढऊतार आलेत आणि गेलेत . पण एका प्रसंगाने त्यांना पार हादरून सोडलं . त्या प्रसंगाची आठवण सांगतांना ते काळजातून गलबलतात . ते म्हणतात ….

” तो दिवस आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात . 16 फेब्रुवारी 2012 . आमचे झाडीपट्टी रंगभूमीचे देवसरा कुरखेडा येथे नाटक होते . नेहमीप्रमाणे नाटकाला जाण्यासाठी गाडीत बसलो . निर्माता दुर्वास कापगते , शेषराव मोहुर्ले , वासूदेव नेवारे गुरूजी , प्रा. उन्मेश जवळे , मोहन धांडे , निखिल मत्ते , अविनाश गेडाम आणि स्वतः मी अनिल नाकतोडे . वडसा प्रेस जवळून गाडी निघाली . कुरखेडा रोडला लागली . वडसापासून चारदोन किमी. अंतर असलेल्या विसोरा फाट्याजवळ येताच समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकची जबर धडक बसल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला . गावक-यांनी आवाज ऐकून धावा घेतला .

“अबे , मेले सप्पा !”
“पार चारा चुराच झाला !”
” अबे हाही मेला . “

म्हणत कोणीतरी माझ्याजवळ आले . गाडीच्या पल्ल्यात अडकलेले माझे शरीर बाहेर काढले . मला त्यांचे बोलणे ऐकू येत होते . माझ्या हाताला आणि मानेला जबर दुखापत झालेली . चेहरा पार सुजलेला . “मी मरत नाही ! ” मी पुटपुटलो . खरे तर हा आत्मविश्वास होता . रक्ताच्या थारोड्यात पडलेले सर्व देह बघून डोळ्यावर अंधारी आली . पुढे काय घडतय याचा अंदाज देखील आला नाही . वडसाहून गडचिरोलीच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले आणि वेळेवर उपचार झाल्यामुळे वाचलो . दैव बलवत्तर म्हणून वाचलो . हा माझा पुनःर्जन्मच होता . बाकीचे सात सहकारी नाट्यकर्मी हरवल्याची दुःखरी सल मनाला कायम बोचत राहते .

एवढ्या भयानक जिवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर हात जवळजवळ लुळा पडला . थोडा स्मृती भ्रंस झाला होता . उपचारांती आज ब-याच अंशी प्रकृती साथ देत आहे . आॕपरेशन केल्यामुळे हात आणि मानेतील दुखापत बरी झाली . पण आजही थोडेफार दुखणे जाणवतेच .

साक्षात मृत्यूशी कडवी झुंज दिल्यानंतर पुन्हा चेहऱ्याला रंग लावून पुन्हा नव्या उमेदीने नटेश्वराची उपासना करण्यासाठी रसिकांच्या सेवेत उभे राहता आले , याचे फार मोठे समाधान आहे . उरलेलं आयुष्य देखील नटेश्वराच्या चरणी रसिक मायबापाच्या समर्पीत करता यावं . हीच नटेश्वराचे चरणी प्रार्थना ! “

समग्र झाडीवुड बद्दल त्यांना अभिमान आहे . त्याबद्दल ते स्वाभिमानाने सांगतात . ,,,
” झाडीपट्टी म्हणजे अस्सल हि-यांची खाण ! त्यात व्ही . दिलिपकुमार ,किशोर मेश्राम , प्रल्हाद मेश्राम , धनंजय ढवळे ,देवेंद्र लुटे , प्रदीप बिडकर , विलास पात्रीकर , परमानंद गहाणे , सिद्धार्थ गोवर्धन , ताराचंद उराडे ,यश निकोडे , के . प्रेमकुमार , अनिरूद्ध वनकर , चुडाराम बल्हारपूरे , प्रा . सदानंद बोरकर , विनोद राऊत , सुरेंद्र मिसार , प्रकाश प्रधान यासारखे सिद्धहस्त लेखक आहेत .

स्मृतीशेष माणिक खुणे , स्मृतीशेष नटसम्राट कमलाकर बोरकर , स्मृतीशेष उन्मेश जवळे , झाडीचा दादा कोंडके म्हणून नावाजलेले डॉ . खुणे , प्रा. राम दोनाडकर , विनोदावर हिरालाल पेंटर , अरविंद झाडे , अंबादास कामडी , गोपी रंदये , विनोदाने रसिकजनांच्या हृदयस्थ अधिराज्य गाजवणारी प्रा. शेखर डोंगरे आणि के. आत्माराम ही जोडी , खलसम्राट नरेश गडेकर ,राजा चिटणीस , मुकेश गेडाम , सुनिल कुकुडकर , देवेंद्र दोडके ,
स्वरबहार अमरकुमार मसराम , दिवाकर बारसागडे , युवराज गोंगले ,युवराज प्रधान , विक्की गायकवाड ,
लावणी साम्राज्ञी स्मृतीशेष पौर्णिमा काळे , किर्ती आवळे , ज्ञानेश्वरी कापगते , शबाना खान , वत्सला पोलकमवार , आसावरी तिडके ,आसावरी नायडू , गिता चंद्र , पद्मा जयस्वाल , वर्षा गुप्ते तबला पटू गुलाम सुफी , शेख जिब्राईल , नाल/ढोलक पटू राजू गेडाम , तिलक देवळीकर , यासारखे अनेक हिरे झाडीपट्टीने दिले . ही झाडीपट्टीच्या दृष्टीने खरं तर विशेष बाब आहे . ”

उदापूर ते वडसा हे हाकेच्या अंतरावर असल्यासारखी गावे . नाटक संपलं की सकाळी उदापूरला घरी येऊन आराम करायचे . पुन्हा चारपाच वाजता पुढल्या नाटकासाठी वडसा प्रेसला हजर व्हायचे . रात्री जागरण होत असल्यामुळे दहा किमी. असले तरी स्वतःच्या टू व्हिलरने अपडाऊन करणे धोकादायक ठरू शकते . म्हणून त्यांनी ट्रेनची पास काढली . एकदा वडसाहून ट्रेनने परततांना डुलकी लागल्यामुळे ते किरमटी मेंढ्या पर्यंत निघून गेले . लवकर जाग आल्यामुळे बरं झालं . नाहीतर त्यांना कदाचित चंद्रपूरला जाऊन परत यावं लागलं असतं . असे ते सांगतात .

काही प्रसंग आयुष्याची परीक्षाच घेतात . ” ठरल्याप्रमाणे 16 जानेवारी 2020ला गावात नाटकांचे आयोजन करण्यात आले होते . सर्व तयारीला लागले आणि अचानक दुःखाचा डोंगर कोसळला . उदापूरला राहत्या घरात घरात आईने अखेरचा श्वास घेतल्याची वार्ता कानी आली . दीर्घ आजारामुळे काळाने मातृछत्र कायमचे हिसकावून घेतले होते . नेत्रांतून दुःखाचा पावसाळा बरसत होता . नाटक करावे की नाही . ही घालमेल चाललेली असतांना ” शो मस्ट गो आॕन ” म्हणत चेहऱ्यावर रंग चढवून रसिकजनांच्या सेवेत नटेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो . ”

झाडीच्या रसिक मायबापांचे उपकार कलावंत विसरू शकत नाही . त्यांचे कृपेमुळेच कलावंतांना चांगले दिवस पहावयास मिळतात . त्या रसिकजनांची वाहवा आणि नवोदितांना सल्ला देतांना ते सांगतात . ” झाडीचा रसिक हा चोखंदळ आहे . ब-या वाईटाची पारख करणारा आहे . परखड आणि तोंडावर स्पष्ट बोलणारा आहे . आवडलं तर डोक्यावर घेऊन नाचतो . अन्यथा तिथेच शिव्याशाप देऊन विसर्जन करतो . त्यामुळे नवीन कलावंतांनी मेहनत करून सर्व तयारी निशी रसिकांच्या पुढ्यात ताकदीने पाय रोऊन उभे ठाकावे . असे माझे स्पष्ट मत आहे . ”
लेखकांनी सुद्धा झाडीच्या रसिकजनांच्या हृदयाचा ठाव घेणारे कथानक बांधून नाटकांची उभारणी करावी , विशेष लालित्य आणि साहित्यिक भाषेतील संवाद पेरणी करून रसिकांचा हिरमोड करू नये . झाडीची माणसं साधी आहे , सरळ जगणारी , बोली भाषा बोलणारी आहेत . त्यांच्या पचनी पडेल असेच संवाद लेखन करण्यात लेखकांनी लेखणी झिजवावी . कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होईल , त्यांना आपलंसं वाटेल . नाटकाच्या पात्रांतून आपण बोलत असल्याची समानानुभूती निर्माण होईल अशी प्रसंग पेरणी करणारी लेखणी असावी . उगाच डोक्यावरून जाणार नाही याची काळजी लेखकांनी घ्यावी .”
असे मत ते स्पष्टपणे व्यक्त करतात .

रंगभूमीवर खलनायक साकारत असले तरी प्रत्यक्षात मात्र अनिल नाकतोडे हे मृदूभाषी , सुस्वभावी , माणूसकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहे . नाट्य संसार सांभाळत ते स्वतःचा घरसंसारालाही जिवापाड जपतात . नाटकासोबत त्यांचे शेतीमातीवर उदंड प्रेम आहे . नाटकाची स्क्रिफ्ट घेऊन शेताच्या बांधावर त्यांचा चाललेला संवाद सराव बघतांना बांधीतील धानाच्या रूपाने उभे असलेले हजारो प्रेक्षक तल्लीन होऊन जातात . डोलतात .टाळ्यांचा वर्षाव करतात .
घर संसार , नातीगोती जपणा-या झाडीच्या या ” झुंजार” (खल ) नायकास पुढील नाट्य प्रवासासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी उदंड शुभेच्छा !!!

✒️लेखक:-रोशनकुमार शामजी पिलेवान
पिंपळगाव भोसले ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर
मो. 7798509816

▪️संकलन:-रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986