ज्ञान-विज्ञानाचा दिवा : चला, घरोघरी पेटवा !

29

प्रकाशाचे पर्व असलेला सण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायम घर करून आहे. दिवाळी किंवा दीपावली हा एक भारतीय प्रमुख सण आहे. हा दीपोत्सव देशात सर्वत्र साजरा होताना दिसतो. या सणादरम्यान सलग पाच-सहा दिवस सकाळी व संध्याकाळीही सडे शिंपून दरवाजा, अंगण व घराबाहेरचा परिसर रांगोळ्यांनी सजवले जाते. खरे तर या सणाला भक्तिमय वातावरणाचे अधिष्ठान प्राप्त आहे. परंतु आज सर्वत्र बेदरकार वृत्तीचे दर्शन घडू लागले आहे. इलेक्ट्रिक दिव्यांचा झगमगाट, नाना रंगांच्या दीपमाळा, प्रखर तेजाचे बल्ब, फटाकळ्यांचा तडतडाट, जमीन हादरविणाऱ्या व कानठळ्या बनविणाऱ्या आवाजाचे एटम-बाँब आदींनी कसे मानव व प्राणीमात्रांचे जगणे हराम केले आहे.

पूर्वी घरात व घराबाहेर तेलाच्या लहान पणत्या लावल्या जात. उंच जागी मिनमिनते आकाशकंदील लावले. आता त्यांची जागा प्रखर, डोळ्यांना दिपवणाऱ्या व विपरित परिणाम करणाऱ्या इलेक्ट्रिक बल्बने घेतली आहे, ही चिंतनीय बाब! पावसाळा संपून नवीन पिके हाती येण्यास सुरुवात होताच शरद ऋतूच्या ऐन मध्यावर, आश्विन व कार्तिक मासांच्या जोडात या सणाचे आगमन होते. आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे पाच ते सहा दिवस या सणाची मिजास असते. हा सण साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येत असतो. दिवाळी निमित्त भारतात बहुतांश ठिकाणी सुट्टी असते. सुट्टीत ज्ञानाचे विस्मरण होता कामा नये –

“ज्ञान उजाला मिला तुझे तो राह देखकर चलना हैं |
बाधाओं से बच कर तूने बन्दे नित्य सम्भलना हैं |
ज्ञान की इस ज्योति का तूने लाभ उठाते जाना हैं |
कहे ‘हरदेव’ झूठ से बच कर सत्य सदा अपनाना हैं |”
[ पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.५४ ]

शाळकरी मुलांना नियमित शाळा व दिवाळीपूर्वी होणार्‍या प्रथम सत्रांत परीक्षांमुळे दिवाळी सुट्टीचे विशेष आकर्षण व आतुरता असते. मात्र यावर्षी जीवघेण्या वैश्विक कोरोना महामारीने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शाळा-महाविद्यालये कुलूपबंद अवस्थेत आहेत. आता हळुहळू एक वर्ष पूर्ण होऊ पहात आहे. त्यामुळे यंदा सुट्ट्यांचे आकर्षण व आतुरता थंडावली आहे. फटाके उडविणे, हुल्लडबाजी व स्वैर भटकंती यांवर बंधनं पडली आहेत. शिक्षण म्हणजे ज्ञान व विज्ञानरुपातील विवेक जागृती होय. यंदा तेच ज्ञान-विज्ञानदीप उजळून खरी प्रकाशमय दिवाळी साजरी करावी लागणार, हे निश्चित! संत व थोर महापुरुषांच्या वचनांची सत्यता प्रत्ययास येऊ लागली आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हा सण किमान तीन हजार वर्षांपासून सुरू आहे.

या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृव प्रदेशात होते, त्याकाळात झाला असा समज आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की प्रभू रामचंद्र माता सीतासह चौदा वर्षांचा प्रदीर्घ वनवास पूर्ण करून अयोध्येस परतले. तेव्हा प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. परंतु त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्याहून खुपच भिन्न होते. त्याकाळी हा फक्त यक्षांचाच उत्सव मानला जायचा. आजच्या परिस्थितीत मना-मनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अंधविश्वास व अंधार दूर सारून जीवन प्रकाशमय करणारा दीप मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात. संतवचन प्रेरित करतंय –

“अनुभवे सांगतो तुम्हाप्रति । करू म्हणाल ते साधेल निश्चिती ।
करा करा आत्मोन्नती । तुकड्या म्हणे ।।१०५।।”
[ पवित्र ग्रामगीता : आदर्श जीवन पंचक : अध्याय ३६ वा : जीवन-कला.]

दिवाळीचा पहिला दिवस गोवत्सद्वादशी यालाच वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी गाई व वासरांची पूजा करतात. मुक्या प्राण्यांवर दया व प्रेम करावे. सजीवसृष्टीचे रक्षण करावे, ही जाणीव यातून मिळते. दुसर्‍या दिवसास धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती म्हणतात. या दिवशी देवाचा वैद्य-धन्वंतरीची पूजा करून लोकांना प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पाल्याचा कूट साखर घालून वाटतात. त्यात औषधी गुणधर्म असल्याने ते आरोग्यास हितकर ठरते. यात वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणूनही साजरा होत असतो. तिसरा दिवस नरक चतुर्दशी अर्थात अभ्यंगस्नानाचा आहे. या दिवशी चांगले चोळून-मळून आंघोळ करावी. पापवासना, वाईट प्रवृत्ती व अहंकाराचे समूळ उच्चाटन करावे. तेव्हाच अहंकाराचा पडदा दूर सरून आत्मज्योत प्रकाशित होते, असा संकेत मिळतो.

घरातील स्वच्छतागृहे घासून-पुसून स्वच्छ करावे व तेथे पणती लावावी, अशी स्वच्छतेची महती सांगणारी प्रथा आहे. यात ज्ञानासह विज्ञान दोहोंचाही मिलाप झालेला दिसतो. त्यानंतरच्या दिवशी ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. शेतकरी व कष्टकरी लोक केरसूणीची व धनवान लोक सोने-नाणे याची पूजा करताना आढळतात. यातून पावित्र्य व आर्थिक सचोटीची मूल्ये मनात रुजतात. येथेही ज्ञान व विज्ञानाचा सुरेख संगम व मेळ घालून मिळतो. तत्पश्चात बलिप्रतिपदा वा पाडवा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे!’ अर्थात शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी आस धरून रांगोळीतून बळीराजा रेखाटून त्याची पूजा केली जाते. गाईगुरांना सजवून पूजनांती मिरवणूक काढली जाते. सायंकाळी घरोघरी पाटाभोवती रांगोळी काढून शेतकरी पत्नी ही पतीला औक्षण करते व तो तीला ओवाळणी घालतो.

शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, याची कल्पना यातून मिळून येते. याच दिवशी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून पूजन केले जाते. अर्थातच सृष्टीतून सर्वांना अन्न-वस्त्रादी मुलभूत गरजा प्राप्त होत असतात, त्यामुळे कृतज्ञताव्यक्त केली पाहिजे. हे वैज्ञानिक विचार आत्मसात होत असतात. शेवटचा दिवस भाऊबीज अथवा यमद्वितीया म्हणून पाळला जातो. भावां-बहिणींमध्ये प्रेमसंवर्धन व अतूट नाते जपणुकीचा हा दिवस आहे. चंद्रला साक्षी मानून बहिण भावाला ओवाळते व भाऊ ऐपतीप्रमाणे ओवाळणी घालून तीचा यथोचित सत्कार करतो. प्रत्येक स्त्री-पुरुषाने एकमेकांना बहिण-भाऊ मानण्याचे तत्वज्ञान हा सण सहजच शिकवून जातो. ही शिकवण कायम अंगवळणी पडली पाहिजे –

“साधावा कार्याचा उत्साह । तोचि उत्सव निःसंदेह ।
तुकड्या म्हणे गावी प्रवाह । वाहू द्या शांती सुखाचा ।।११२।।”
[ पवित्र ग्रामगीता : संस्कार शोधन पंचक : अध्याय २३ वा – सणोत्सव.]

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या महत्वाकांक्षेनेच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा अर्थ असा कदापिही काढून घेऊ नये की यंदा शिकण्यालाही बंधने घातली आहेत. शक्य होत असल्यास शिक्षकांद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन वा ऑफलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत हिरीरीने भाग घ्यावे. तेही शक्य नसेल तर कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तिकडून धडे घ्यावे. वर्षभरच दिवाळी असा गैरसमज करून आपणच आपल्या शिक्षणाचे दिवाळे काढणे हे आपल्याला शोभेल का? आज विद्यार्थी मित्रांना यावर अगत्यानेच विचारमंथन करण्याची अत्यंत गरज आहे. दिवाळीचा खरा अर्थ संत सांगतात –

“छट जाये अज्ञान अंधेरा तो फिर रोज़ दिवाली हैं |
ज्ञान उजाला डाले डेरा तो फिर रोज़ दिवाली हैं |
झूठ पर मन की विजय हो तो फिर रोज़ दिवाली हैं |
कहे ‘हरदेव’ सत्य की जय हो तो फिर रोज़ दिवाली हैं |”
[ पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.२४२.]

असा हा ज्ञान-विज्ञानदीप तेजाळणारा दीपोत्सव लोक वाईट कृतीने व मनोवृत्तीने कलंकित करतात. कोरानाची प्रलयकारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन फटाके उडविणे व व्यसनाधिन होणे त्यागावे. वायू, अन्न, जल, ध्वनी आदी प्रदुषणांना थांबविले पाहिजे. ही सद्बुद्धी अंगिकरणे फायद्याचे ठरेल. चला तर मग, आपल्या मनमंदिरात ज्ञान-विज्ञानदीप उजळून स्वयंप्रकाशित होउया !

✒️लेखक:- श्रीकृष्णदास निरंकारी.
मु.प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
एकता चौक रामनगर, गडचिरोली,
ता.जि.गडचिरोली
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
email – krishnadas.nirankari@gmail.com