कर्मयोगी डाॕ. शिवनाथजी कुंभारे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजजीवनावर उमटवला – बंडोपंत बोढेकर

30

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.12नोव्हेंबर):-भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डाॕ.शिवनाथजी कुंभारे यांनी आजवर लोककल्याणाचे अनेक कामे केलीत. व्यसनमुक्ती, गडचिरोली जिल्हा निर्मिती , ग्रामगीता विचार प्रचारकार्य यासारख्या असंख्य कामात त्यांनी आजवर मोलाचे योगदान दिले. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज आणि गीताचार्य श्रीतुकारामदादा यांचा सहवास त्यांना लाभला. या महामानवांच्या त्यागी जीवनापासून डाॕ. शिवनाथजी यांना कार्य प्रेरणा मिळाली . त्या पावन प्रेरणेतून त्यांनी परिवर्तनवादी कार्यास सदैव जोडून घेतले.

एकंदरीत कर्मयोगी डाॕ. शिवनाथजी यांची जीवन साधना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. जिल्ह्यातील अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या सर्व शाखेच्या वतीने सामुदायिक प्रार्थना मंदिर मुख्य शाखेत काल छोटेखानी स्वरूपात डाॕ. शिवनाथजी कुंभारे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. बोढेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

याप्रसंगी सत्कारमुर्ती डाॕ . शिवनाथजी कुंभारे , अरविंद पाटील वासेकर , रामनगर शाखेचे सुरेश मांडवगडे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग घोटेकर , गोकुलनगर शाखेचे सुखदेव वेठे, दलितमित्र नानाजी वाढई , प्रचारक आत्माराम आंबोरकर ,ॲड. किशोर आखाडे आदींची उपस्थिती होती . प्रास्तविक सुखदेव वेठे यांनी केले. अरविंद पाटील वासेकर , सुरेश मांडवगडे , नानाजी वाढई, आत्माराम आंबोरकर यांची याप्रसंगी समयोचित भाषणे झालीत. तर आॕनलाईन पध्दतीने सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज , ज्येष्ठ समाजसेवक रविजी भुसारी, झाडीबोली चे ॲड. लखनसिंह कटरे, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी शुभेच्छा संदेश पाठविल्यात . यानंतर मंडळाच्या वतीने डाॕ . कुंभारे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. थोर समाजसुधारक आणि ग्रामगीतेच्या परिवर्तनवादी विचारांने मी आजवर वाटचाल करीत आलो आहे, असे नम्र प्रतिपादन डाॕ. कुंभारे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

सामाजिक अंतर पाळत शासनाच्या निर्देशाचे पालन करून प्रथमतः सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर अतिथींच्या हस्ते श्रीगुरूदेवांचे अधिष्ठान आणि महाराजांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार निकुरे यांनी केले. कार्यक्रमास प्रचारक मधुकर भोयर, मारोती उईके, सुनिल उराडे, शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. गीता पाटील, श्रीमती मनिषा कायरकर,नितेश गेडाम, धाईत आदी उपस्थित होते . जयघोषानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.