जि. प. उर्दू शाळेत मौलाना अबुल कलाम आझाद जयंती

29

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.14नोव्हेंबर):-पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा चिमूर येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन नगमा रफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जैबुन्निसा सलीम शेख, प्रमुख पाहुणे शमीम अन्सारी, मुस्तकीम पठाण, शहेनाज पठाण आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कमरुनिसा मो. अली सय्यद यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना म्हणाल्या की, मौलाना आझाद यांचे मूळ नाव मोहिनुद्दीन अहमद पण अबुल कलाम ही पदवी आणि आझाद (स्वतंत्र) हे टोपणनाव त्यांना लोकांनी दिले. त्यांची जन्मभूमी महमद पैगंबराचे गाव मक्का असून कर्मभूमी आपला देश आहे. त्यांचे वडील धर्मगुरू होते. वडिलाबरोबर १८९० मध्ये ते कलकत्याला आले. फार्सी, अरबी, उर्दू याबरोबर ते तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र व गणित शिकले. इंग्रजीचाही त्यांनी अभ्यास केला.

लोकजागृतीसाठी १९१२ ते १९१५ मध्ये “अल-हिलाल” व “अल बलाघ” वृत्तपत्र काढले. हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी व त्यांनी देशाच्या स्वातंत्र लढयात भाग घ्यावा यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. इंग्रज सरकारने आंदोलनात भाग घेतल्याने तुरुंगात पाठविले. त्यांच्या पत्नीची प्रकृती अत्यवस्थ असताना त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी इंग्रजांनी एक अट घातली होती. त्यांनी इंग्रज सरकारची माफी मागावी नंतर आम्ही त्यांची सुटका करू. परंतु त्यांनी इंग्रजापुढे शरणागती पत्कारली नाही व माफीही मागितली नाही.

ते तुरुंगात असताना त्यांची पत्नी मरण पावली. परंतु या अंतिम दर्शनासाठी सुद्धा इंग्रजांनी परवानगी दिली नाही. त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रथम आपल्या पत्नीच्या दर्शनासाठी कब्रस्तानमध्ये जावून समाधीवर प्रार्थना केली होती. १९३९ पासुन १९४६ पर्यंत ते राष्ट्रीय कांग्रेसचे अध्यक्ष होते. ते आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते. मौलाना आझाद प्रभावी वक्ते व उत्तम लेखकही होते. त्यांनी उर्दूत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम हे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल १९९२ ला भारतरत्न हा भारतीय सर्वोच्च सन्मान पुरस्कार देऊन केन्द्रशासनाने गौरव केला.

यावेळी शाळेत आँनलाईन चित्रकला स्पर्धा घेऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना परितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नगमा शेख यांनी केले. उपस्थितांचे आभार शहेनाज अन्सारी यांनी मानले.