गरिबांचा नाथ बना, माणसातील देव जाणा – प्रा.शिवाजीराव जगताप

42

✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.15नोव्हेंबर):-कोरोना या विषाणूमुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जग थांबले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वकाही ठप्प आहे .अनेक उद्योगधंदे बंद पडलेत. त्यामळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अतिशय भयानक परिस्थिती आणि त्यातच दिवाळीचा सण कसा गोडवा निर्माण होणार, हातावरचे पोट असलेल्या गरीब आणि गरजूंना दिवाळीचा सण साजरा कसा होणार या विचाराने ग्रासलेल्या राजे संस्कार प्रतिष्ठान टीमने गरिबांना दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला.

ठाण्यामधील प्राध्यापक संभाजी शेळके यांच्या राजे संस्कार प्रतिष्ठान संस्थेचे हितचिंतक प्राध्यापक आनंद शिंदे व मृदुला शिंदे या दाम्पत्याच्या सहकार्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील बोरीची वाडी या ठिकाणी रहात असलेल्या बांधवांना सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन दिवाळीचा फराळ वाटून दिवाळीची सुरवात केली व चार चेहऱ्यांवर आनंद निर्माण केला .एवढेच नव्हे तर येणाऱ्या थंडीला सामोरे जाण्यासाठी यावेळी उबदार कपड्यांचे वाटपही करण्यात आले.

सामाजिक अंतराचे पालन करून छोटेखानी केलेल्या भाषणात प्रा. शिवाजीराव जगताप म्हणाले, या कोरोना काळात मंदिरे बंद असली तरी माणसातील हृदयाची दारे खुली आहेत. गरिबांचा नाथ बना, माणसातील देव जाणा ! हिच ईश्वर सेवा आहे.

यावेळी प्राध्यापक शिवाजीराव जगताप, प्राध्यापक विजय पगारे आणि सौ. पगारे , प्राध्यापक गजानन राणे, संजय इधे, महेंद्र माने, आश्रय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोराडे , देवांश व तनय आदी मान्यवर उपस्थित होते.सामाजिक जाणिवेतून केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.