शेतीपंपाच्या वीज जोडणी करिता शेतकऱ्यांचे २३ नोव्हेंबर पासून अमरण उपोषण

26

🔸सहा वर्षापासून कोटेशन भरून शेतीपंपाला वीज जोडणी मिळेना

🔹 शेतकऱ्यांचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.22नोव्हेंबर):-येथील शेतकऱ्यांचे शेतीपंपा करिता वीज वितरण कंपनीने २०१४ मध्ये कोटेशन भरून घेतले.पण सहा वर्षापासून अद्यापही शेती पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. वीज जोडणी मिळण्याकरिता शेतकरी वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यातच वीज जोडणी न देता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा वीज बिल आकारणी केली आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील शेतकरी २३ नोव्हेंबर पासून वीज वितरण कंपनी कुंडलवाडी च्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.

शहरातील अशोक गायकवाड, रामलू कोटलावार, राजेश नागुलवार, धनराज रत्नागिरे व भुमाबाई करेवाड या पाच शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी धर्माबाद येथे थ्रीफेज कनेक्शन साठी २०१४ मध्ये अर्ज केला होता. उपअभियंता यांनी दिलेल्या कोटेशन नुसार कोटेशन भरून सर्व कागदपत्रे ही जमा केली. पण सहावर्षानंतरही त्यांना शेतीपंपा करिता वीजजोडणी मात्र मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच उपरोक्त पाचही शेतकऱ्यांना वीज जोडणी न देता अव्वाच्या सव्वा बिले वीज वितरण कंपनीने आकारले आहेत. तसेच शेतीपंप जोडणीकरीता केलेल्या यादीत मोठा घोळ झाला आहे. त्यामुळे आमच्यावर सहा वर्षापासून अन्याय होत आहे.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे.आणि शेती पंपासाठी वीज जोडणी लवकरात लवकर करून द्यावे अन्यथा २३ नोव्हेंबर पासून वीज वितरण कंपनी कार्यालय कुंडलवाडी येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन उपरोक्त पाच शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे दिले आहे.

याबाबत वीज वितरण कंपनी धर्माबाद चे उपविभागीय अभियंता सुमितकुमार पांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, निवेदन दिलेल्या पाच शेतकऱ्यांचे तसेच उपविभागात अंतर्गत येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे महावितरण आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत कोटेशन भरून घेतले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शेती पंपाच्या वीज जोडणी करिता मीटर,विद्युत पोल व ट्रान्सफार्मर साठी प्रस्ताव पाठवून वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. हा प्रश्न फक्त कुंडलवाडी पुरता नसून राज्यभरात कुठेही या कार्यक्रमाअंतर्गत शेती पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. तसेच शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले आहेत. त्यामुळे त्यांना अनमीटरड म्हणून वीज बिले दिली आहेत. असे उपअभियंता सुमीतकुमार पांडे यांनी सांगितले आहे.