धनगर आरक्षण लढ्यातील शाहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही

30

🔸आश्वासन पूर्ततेसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-धनगर समाजास एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी च्या लढाईत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपले बलिदान दिले, जीवन अर्पण केले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही अशी प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली.

ते परभणी लोकसभा मतदारसंघातील गोमेवाकडी ता. सेलू येथील आरक्षण लढ्यातील शहीद योद्धा योगेश कारके याच्या कुटुंबास शासनाने दिलेले मदतीचे लेखी आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना नंतर बोलत होते.

यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, शहीद योगेश कारके चे वडील राधाकिशन कारके यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सखाराम बोबडे पडेगावकर म्हणाले की धनगर समाजास एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर लढा सुरू आहे. या लढाईत समाज प्रेमापोटी आजपर्यंत भरपूर लोकांनी आपले बलिदान दिले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील परमेश्वर धोंगडे, मंजीत कोळेकर व परभणी येथील योगेश कारके यांचा समावेश आहे. या आरक्षण योध्या सह ज्यांनी ज्यांनी या लढाईत आपले बलिदान दिले त्या शहीद योध्याच्या कुटूंबियांना शासनाकडून मदत मिळालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे.

सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील शहीद योगेश कारके ने आत्महत्या केली त्या दिवशी परभणी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देत दहा लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते .त्यावेळी महाराष्ट्रातून मोठे मोठे पुढारी आमदार ,खासदार यांनी मोठमोठी आश्वासने दिली ,पण आजपर्यंत एक रुपयाची मदतही या कुटुंबास झाली नाही.

शहीद आरक्षण लढ्यातील योध्याच्या कुटुंबास शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करावे यासाठी आगामी काळात धनगर साम्राज्य सेना वेगवेगळी आंदोलने करणार आहे .शाहिद कुटुंबियांस दिलेले मदतीचे आश्वासन पूर्ण करावं या मागणीसाठी लवकरच परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकल यांनी यावेळी दिली. या निवेदनाच्या प्रती राज्यसभा खासदार फौजिया खान ,विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आल्या आहेत.