गेवराईजवळ भीषण अपघातात चार ठार

34

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.26नोव्हेंबर):- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बाह्यवळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्ता ओलांडून टँकरवर आदळली.अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला.भीषण अपघाताची ही घटना आज गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारमधील जखमींना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे व सुभाष भिंगे अशा कारमधील चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर राम भिंगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. लातूर येथील हे सर्वजण कामानिमित्त गुरुवारी कारमधून क्र. (एम एच 46 बी जी 9700) औरंगाबादला जात होते.यातील काही जण वंचित बहुजन आघाडीचे लातूर येथील पदाधिकारी आहेत. दरम्यान गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागील बाह्यवळण रस्त्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला अन भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या इंडियन ऑईलच्या टँकरवर क्रं. (जी जे 16 ए यु 2475) जाऊन आदळली.

या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या धडकेत गंभीर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, कार मध्ये मृतदेह अडकून पडले. शिवाय कारचा पुढील भाग दबून गेला.या अपघातानंतर महामार्गावरील वरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.