महात्मा फुले दाम्पत्य : शिक्षकदिनाचे खरे हक्कदार !

36

आज दि. २८ नोव्हेंबर म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा जोतीरावजी फुलेंचा पावन स्मृतीदिन! त्या निमित्ताने हा लेख प्रपंच. महात्मा-महापुरुष तेच ठरतात की जे महान कर्तृत्व करून अजरामर होतात. ते जगाला जगण्याचा सन्मार्ग दाखवितात. ते संपूर्ण विश्वावर, प्राणीमात्रांवर प्रेम करतात. जग सुखी व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, भले व्हावे म्हणून ते स्वतः चंदनाप्रमाणे झिजत असतात. दिव्याप्रमाणे स्वतः जळून प्रकाश देतात. शिक्षणसम्राट म. जोतीरावजी फुले हेही एक असेच ‘सर्वांना शिक्षण-हक्क’ बहाल करणारे झंझावाती वादळ होते. महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारत देशात प्रथमात प्रथम सर्व स्तरातील मुलांमुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून आजीवन ‘शिक्षण क्रांती’ केली. त्यामुळेच ते इतर थोर पुरुषांच्या तुलनेत अग्रणी ठरतात, म्हणून महात्मा फुले हेच ‘शिक्षकदिनाचे खरे हक्कदार !’ समजून का गौरविण्यात येऊ नये? पण, असे होत नाही ना! हेच मोठे दुर्दैव, आम्हा भारतीयांचे!!

सातारा जिल्ह्यातील कंटगुण हे एक छोटेसे गाव. तेथे गोविंदरावजी गोऱ्हे व चिमणाबाई यांचा सुखाचा संसार चालू होता. दोघेही अशिक्षित पण फार विचारी व संसारदक्ष होते. शेतशिवारात व मळ्याखळ्यात राब-राब राबत आणि संसाराचा गाडा रेटत असत. अशातच त्यांना दुसरे पुत्ररत्न जन्मास आले. तेच आपली सर्वांची शिक्षण-भूक जाणणारे महात्मा फुले हे होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये पुणे या ‘शिक्षणाचे माहेर-घर’ म्हणून नावलौकिक असलेल्या शहरात झाला. गोविंदराव गोऱ्हे हे पुण्यातील पेशव्यांना फुले विकत असत. म्हणून त्यांना पुढे गोऱ्हे ऐवजी फुले आडनाव प्राप्त झाले. पुण्यालाच वास्तव्य असल्यामुळे आपली मुले खूप शिकावित असे त्यांना वाटत होते. पण… अरे दैवा ! कसा नियतीने घाला घातला. जोतीबा अवघे ९ महिन्यांचे असतांना आई-चिमणाबाई निर्मिकाघरी निघून गेली. आईच्या प्रेमाला म. जोतीरावजी आता पारखे झाले.

शिक्षणप्रेमी महात्मा फुले बालपणापासूनच बुध्दिमान होते. ते तसे चौकस, धीट आणि निर्भीड होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबी बाणा, चातुर्य व कौशल्य पाहून कुणीही थक्क होत. असेच मुस्लिम-बांधव ‘गफ्फार बेग मुन्शी’ नावाच्या उर्दू शिक्षकाने गांभिर्याने घेत शिकविण्यासाठी कंबर कसली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा रुढ होती. परंतु जोतीरावांचे लग्न लागलीच करण्यापेक्षा त्यांना पुढे शिकू द्यावे, असा विचार त्यांच्या वडिलांनी-गोविंदरावांनी केला. पुढे जातीभेदाच्या भिंती समाजकंटकांनी उभ्या केल्या आणि त्यांना आपले शिक्षण मध्येच खंडित करावे लागले. त्यांनी आता वडिलांच्या फुले विक्रीच्या व्यवसायात लक्ष घातले. आता ते चौदा वर्षाचे झाले होते. म्हणून त्यांचे लग्न सातारा जिल्ह्यातील खंडेराव नेवसे-पाटील यांच्या सुकन्या-सावित्रीबाईशी लावून दिले. तीच ही आपली सावित्रीमाई फुले, बालविद्येची क्रांतीज्योती, आद्यशिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून विश्वविख्यात झाली.एकदा शिक्षणमहर्षी महात्मा फुले हे पुण्यातील आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्न-मिरवणुकीत सहभागी झाले. ही गोष्ट उच्चवर्णीयांना रुचली नाही. म्हणून त्यांनी जोतीबांना पिटाळून लावले. हीच अपमानजनक घटना पुढे जोतीबांना एक प्रखर क्रांतीचे तुफान म्हणून ऊठण्यास कारणीभूत ठरली.

सर्वसामान्यांच्या ज्ञानपुर्तीसाठी ते आग ओकणाऱ्या सुर्यासमान तळपू लागले. माणसाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविणाऱ्या जातीभेदाला जोवर समूळ उलथून पाडता येत नाही तोवर आपल्या देशाची पाहिजे तशी उन्नती होऊ शकत नाही. हे त्यांनी लागलीच ओळखले होते. म्हणून त्यांनी प्रथम समाजात शिक्षणाविषयी जागृती करण्याचा प्रण केला. मानवता धर्माप्रमाणे आपले वर्तन का असू नये? असे त्याकाळच्या नकली धर्ममार्तंडांना खडसावून विचारू लागले होते –

अखंडादि काव्यरचना : विभाग-३ : बळीराजा –
“वामन का घाली बळी रसातळी ।। प्रश्न जोती माळी करी भटा ।।५।।”

मुलांप्रमाणे मुलींनाही एवढेच नाही तर सर्वच जाती-धर्माच्या आयाबहिणींना ज्ञानार्जनाची वा प्राथमिक शिक्षणाची संधी मिळावी, असे जोतीरावांना ध्यानी, मनी तथा स्वप्नीही दिसू लागले. त्यांनी प्रथम आपल्या निरक्षर असलेल्या सहधर्मचारिणी-सावित्रीमाईंना शिकवून निष्णात केले आणि आद्यशिक्षिका बनविले. इ. स. १८४८ मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडे पाटलांच्या वाड्यात सुरू केली. पण सनातनी समाजकंटकांनी कडाडून विरोधी कारवाया केल्या. त्यांना धीर-गंभीर सावित्रीमाई अजिबात घाबरल्या नाही. तद्नंतर क्रांतीसुर्य जोतीरावजी शूद्र समजल्या जाणाऱ्या तेली, न्हावी, कुणबी, माळी, सोनार, लोहार, कुंभार इत्यादी तसेच अतिशूद्र वा अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार, मांग, चांभार, मादगी, मातंग आदी बहुजनांच्या वस्तीत जाऊन शिक्षणाची आवड पेरु लागले.
त्यांनी लगेच पतित, दलित व अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी पुण्यातील भोकरवाडी येथे एक व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एकेक करून अनेक शाळा सुरू केल्या.

पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे वैतागलेल्या दलित स्त्रिया-मुलांना आपला स्वतःचा पाण्याचा हौद मोकळा करून दिला. अशा जातीभेदाच्या टणक भिंतींना हादरवून तडा पाडण्यात ते गुंग झाले होते. अशातच विरोधकांनी त्यांच्या वडिलांकडे-गोविंदरावांकडे तिखट, मिठ, मसाला लावून तक्रार केली. वडिलांनी मग पुत्र जोतीरावजी व स्नुषा सावित्रीमाई यांना घराबाहेर घालविले. तरीही ते थोडेसुध्दा डगमगले नाहीत. त्यांनी इ. स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक संस्था स्थापन करून एक प्रसूतीगृह सुरू केले. त्यासोबतच अनाथालय उघडून अनाथ बालकांचे संगोपन कार्य सुरू केले. इ. स. १८६४ ला त्यांनी एका बालविधवेचा पुनर्विवाह लावून दिला. तोही सत्यशोधक समाजोक्त पूजा-विधीप्रमाणे पुण्यातील प्रथम प्रयोग ठरला. शिक्षणसम्राट महात्मा फुले रचित मंगलाष्टकांपैकी अंतिम ५ वे मंगल पद असे आहे –

“आभार बहु मानिजे आपुलिया, मातापित्यांचे सदा ।।
मित्रांचे तुमच्या तसेच असती, जे इष्ट त्यांचे वदा ।।
वृध्दा पंगु सहाय द्या मुलिमुलां, विद्या तया शिकवा ।।
हर्षे वृष्टी करा फुलांची अवघे, टाळी अता वाजवा ।।
शुभ मंगल सावधान !!५!!”

पुण्याला जुना गंजपेठेत तुकारामजी नाईक यांच्या दुमजली घरात दिवे लागणीला महात्मा फुलेजींचे सहकारी जमून सामाजिक कार्यांची मोर्चेबांधणी करीत असत. त्यांत रामचंद्रजी उरवणे, विठोबाजी गुठाळ, कुशाबराव माळी आदी असत. पुण्याच्या नाना पेठेत एकत्र जमलेल्या धोंडीरामजी कुंभार, ग्यानोबाजी झगडे, रामचंद्रजी, कृष्णाजी भालेकर, विनायक बाबाजी, तुकारामजी, हणमंतजी, पिंजनजी यांना संत कबीर मठाचे बृजभाषेतील ग्रंथ ज्ञानगिरीजी बुवा हे वाचून त्याचा अर्थ समजावून सांगत. त्या उपरांत त्यांनी दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुलेजींच्या अनाथ बालाश्रमाबद्दल सर्वदूर सुगंधी वार्ता दरवळू लागली. अशातच एक काशीबाई नामक ब्राह्मण विधवा आपल्या मुलाला आश्रमात टाकण्यास आली. महात्मा फुले दाम्पत्य निपुत्रिक असल्याने त्या शांताराम नामक तीच्या मुलाला दत्तक म्हणून अंगिकारले.

हा मुलगा आजारपणामुळे मृत्यू पावला. म्हणून तीच्याच दुसऱ्या मुलाला, यशवंतराजींना दत्तक घेतले. त्यांचे ससाणे या कार्यकर्त्यांच्या राधाबाई नामक मुलीशी लग्न लावून दिले. पुढे तीचे नाव चंद्रभागा ठेवण्यात आले. गिरणी कामगारांच्या समस्यांही सोडविण्यात जोतीरावांचा मोलाचा वाटा होता. म्हणून त्या संघटनांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करून दि. १९ मे १८८८ रोजी त्यांना ‘महात्मा’ ही बहुमानाची पदवी अर्पण केली.त्यांची समाज जागृतीपर बहुजनांच्या अधू-नेत्रांत झणझणीत अंजन घालणारी सुप्रसिध्द ग्रंथसंपदा अशी – १) नाटक : तृतीय रत्न, प्रश्नोत्तर लेख, सत्सार २ अंकी, २) पवाडे : छत्रपती शिवाजी, ब्राह्मण पंतोजी, ३) अभंग ९ भागाचे : ब्राह्मणाचे कसब, ४) गुलामगिरी : १६ भागांतील संवाद, ५) शेतकऱ्याचा असूड : ५ प्रकरणे, ६) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, ७) अखंडादि काव्यरचना : ६ विभागात वेळोवेळी केलेले लेखन, इत्यादी यशवंतराजी फुलेंनी जतन करून ठेवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसुर्य महात्मा फुलेंना गुरूस्थानी मानले. तर बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना ‘भारताचे बुकर टी. वॉशिंग्टन’ अशी उपाधी बहाल केली होती. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्या विचारांचे प्रचारक-प्रसारक ठरले. “माणसाला शिक्षणाशिवाय दुसरं तरणोपाय नाही!” हे त्यांनी आपल्या अनमोल काव्यशैलीतून मांडले –

विद्येविना मति गेली। मतीविना नीति गेली।
नीतीविना गति गेली। गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।

शिक्षणसम्राट राष्ट्रपितामह महात्मा जोतीरावजी फुले हे आपल्या लेकरांना ज्ञान-महासागरात मस्त मौजेने डुंबण्यास सोडून अचानक दि. २८ नोव्हेंबर १८९० रोजी निर्मिकात विलीन झाले. त्यांच्या अशा या अविस्मरणीय पावन स्मृतींना आम्हा लेकरांचे कोटी कोटी दंडवत प्रणिपात!
!! जय जोती, जय क्रांती !!

– सत्यशोधक –

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार आनंदा-गोविंदा निकोडे,
मु. पिसेवडधा पो. देलनवाडी,
त. आरमोरी जि. गडचिरोली.
७४१४९८३३३९ / ७७७५०४१०८६
इ-मेल : nikodekrishnakumar@gmail.com