जिल्हा प्रशासनामुळे १५४ दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांनी घरुनच बजावला टपाली मतदानाचा हक्क

30

🔸नागपूर विभाग पदवीधर निवडणूक

🔹उद्या उर्वरीत मतदारांच्या घरी पथके पोहोचणार

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.२८नोव्हेंबर):- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील दिव्यांग तसेच ८० वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना आज शनिवारी घरपोच टपाली मतपत्रिका मिळाल्यामुळे १५४ मतदारांनी आपल्या घरुनच टपाली मतदान केले. घरबसल्या मतदान करता आल्यामुळे मतदारांच्या चेह-यावर आनंद झळकत होता. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी विशेष निवडणूक पथक नियुक्त करण्यात आले होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी नागपूर रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात आज ही माहिती दिली.

२१८ मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया निःपक्ष व पारदर्शी व्हावी, यासाठी नागपूर शहराकरिता १४ व ग्रामीण भागासाठी ३ अशी एकूण १७ मतदान पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये नायब तहसीलदार, लिपिक, कॉन्स्टेबल व व्हिडिओग्राफर यांचा समावेश होता.

या पथकाने आज शनिवारी सकाळीच २१८ पैकी १५४ मतदारांच्या घरी जात त्यांची ओळख पटवून प्राप्त टपाली मतपत्रिका सोबत असलेले प्रतिज्ञापत्र साक्षांकित केले. मतदारांनी टपाली मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर मतपत्रिकेचा लिफाफा घेऊन पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात ती जमा केली. तर उद्या उर्वरीत मतदारांच्या घरी जावून ही पथके टपाली मतदान करून घेणार आहेत. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, सुरक्षेसाठी या पथकासोबत पोलीस कॉन्स्टेबलही सोबत होते. ही मतदानाची सर्व प्रक्रिया कार्यालयीन वेळेमध्ये मतदारांच्या पत्त्यावर भेट देऊन पूर्ण केली.

यासंदर्भात सर्व मतदारांना मतदानाच्या संदर्भातील पूर्वकल्पना दूरध्वनीवरून देण्यात आली होती. तसेच उमेदवारांना ई-मेलमार्फत देखील कळविण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान उमेदवार किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी हजर होते.

आज टपाली मतदानासाठी मतपत्रिका घेऊन गेलेल्या पथकाला जे दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदार घरी आढळून आले नाही त्यांच्यासाठी ही पथके उद्या रविवारी २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शीपणे जिल्हा प्रशासन पार पाडणार असल्याचे देखील आज जारी करण्यात आलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

🔸निवडणूक यंत्रणा सज्ज

येत्या १ डिसेंबर रोजी होणा-या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी होणा-या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

🔹१०० टक्के मतदान करा – जिल्हाधिकारी
नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यात मंगळवार (१ डिसेंबर) रोजी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ राहणार आहे. त्यामुळे १०० टक्के मतदान होण्यासाठी नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गुरुवार (३ डिसेंबर) रोजी सकाळी ८ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.