सतर्क भारत – समृध्द भारत

45

🔹भ्रमंती…

जीवन कुठे आहे ? जगण्यात हरवले आहे.
शहानपण कुठे आहे ? ज्ञानात हरवले आहे.
ज्ञान तरी कुठे आहे ? ते माहितीत हरवले आहे.

आज सारे विश्व कोरोना विषाणूच्या महामारीने भयग्रस्त झाले आहे.कोविड-१९ या रोगाने वैद्यकीय क्षेत्राला मोठे आव्हान दिले आहे.लॉकडाऊनच्या नियमाने अनेक राष्ट्राचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडला आहे.जैविक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.मानवाने बुध्दिचातुर्याच्या बळावर अनेक क्षेत्र पादाक्रांत केले असले तरी कोरोना विषाणूच्या सुक्ष्मजीवावर योग्य उपाययोजना तो करु शकला नाही.जगातील अनेक शास्त्रज्ञ प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.पण अजूनही लस निर्माण झाली नाही.त्यासाठी नव्या मूल्यजाणिवांच्या नवोन्मेषणाची चिकित्सा करून लवकरात लवकर लस निघावी हा आशावाद नक्कीच वाढला आहे.

नव्या क्रांतीची नवीन ऊर्जा
नवे तेज नवीन स्पर्धा ।
नव्या ज्ञानाची नवीन कास
नवे पंख नवीन ध्यास ।

भारत हा एक अग्रगण्य लोकशाही प्रधान देश असून जगातील सर्वात मोठ्या विविधतेने नटलेले संविधानात्मक राष्ट्र आहे.या देशात धर्म,पंथ,जाती ,भाषा,पोषाख ,रितीरीवाज ,सण अशा अनेक भिन्नतेने संपन्न असा देश .या देशातील नागरिक एका सुत्रात बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे.धर्मनिरपेक्ष तत्वाच्या पायावर उभा असलेला हा देश जगाला नव्या लोकशाहीचा क्रांतीसूर्य वाटतो आहे.हा देश बुध्द् व सम्राट अशोक काळात वैभवाच्या अच्युत शिखरावर विराजमान होता.स्वातंत्र्य ,समता,बंधुभाव व न्याय यावर आधारीत समाजव्यवस्था होती.प्रत्येक मानवाला स्वतःचा विकास करण्याचे स्वातंत्र्य होते.

बुध्द धम्माच्या मानवतावादी प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांताने जगाला वैज्ञानिक दृष्टीकोन दिला.समाजात नवे मूल्यमंथन घडवून आणले.नालंदा,तक्षशिला,विक्रमशिला या विद्यापीठात जगातील विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत होते.त्या विद्यापीठातील धर्मशास्त्र,न्यायशास्त्र,तर्कशास्त्र,खगोलशास्त्र व वैद्यकीयशास्त्र अतिशय दर्जेदार होते.ज्ञानाच्या बळावर भारत सतर्क व समृध्द होता.जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य भारताकडे होते.पण भध्ययुगाच्या अंधकारमय कालखंडात विषमतवादी व्यवस्थेने भारताच्या उज्ज्वल व्यवस्थेला सुरूंग लावून अमानवीय कौर्यभरी व्यवस्था निर्माण केली.परदेशी राज्यांना आपल्याच देशावर आक्रमण करायला मदत केली.

त्यामुळे भारताची सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आर्थिक , धार्मिक व्यवस्था पंगू झाली.जर सम्राट अशोककालीन समाजव्यवस्था मध्ययुगात टिकून राहली असती तर भारत जगातील सर्वोत्तम सुसंपन्न देश राहला असता.या देशाला पुन्हानव्या वैभव शिखरावर विराजमान व्हायचे असेल तर आपण एक भव्य स्वप्न मनी धरावे.डॉ .ए .पी .जे.अब्दूल कलाम म्हणतात की,

“उदासीनतेची काळजी झटका
नव्या आशेचा नवा दिवा लावा.
आणि त्या प्रसन्न पवित्र उजेडात नवे स्वप्न पाहा.
-सामर्थशाली भारताचे स्वप्न
आपण शंभर कोटी लोक एकाच निग्रहाने
एकाच दिशेने जाऊ:
तर आपल्याला अशक्य काही नाही .
निराशेने खचू नका ,वैफल्याने मोडून पडु नका .
तुमच्या स्वप्नांचे रोपटे वाढावे
म्हणून त्याच्या मुळाशी
घाम गाळायला विसरू नका.
कष्टांनी मागे हटू नका.”

आज भारताला अतिशय कठीण समस्येला समोर जावे लागत आहे.लॉकडाऊनच्या निर्णयाने देश आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.देशातील बँकाना राजकारणाने ग्रासले असल्याने भांडवलदारांच्या फायद्यासाठी सामान्य माणसाच्या पैश्यावर दरोडा घातला जात आहे.लॉकडाऊनने भारतीय कामगार व श्रमीक वर्गाचे अगणित हाल केले आहेत.जर आपण प्रथम योग्य उपाययोजना केली असती तर ज्या समस्या निर्माण झाल्या त्या झाल्या नसत्या .भारताची आर्थिक व्यवस्था इतकी कोलमडली नसती.आज भारताला नव्याने फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यावी लागेल.सरकारने स्वमर्जीप्रमाणे राज्यकारभार न करता समस्त देशातील लोकांच्या हिता करीता राज्यकारभार चालवावा.

देशात अनेक घटना घडत असतांना सरकारे योग्य पावले उचलावे तरच देश एकसंघ राहील.विदेशी नेत्यांच्या चक्रव्युहात न फसता भारताच्या संविधानीक व्यवस्थेने कारभार करावा.माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्रांतीचा उपयोग जेवढा फायदेशीर आहे तेवढाच तो धोकादायक आहे.सायबर गुन्हेगाराची मोठी फौज निर्माण झाली असून त्यावर योग्य उपाययोजना करावी. आपण सतर्क राहून आपले सार्वभौमत्व जपावे.भारत-चीन,भारत-पाकिस्तान,भारत-नेपाळ यातील होत असलेल्या बदलाला कुटनीतीचा आधाराने सोडवावे.

देशाला धार्मिकतेच्या उन्मादात ठेवून प्रगती करता येत नाही .त्यासाठी धर्मनिरपेक्ष तत्वाचं नवंसृजनत्वाचा आधार घ्यावा.देशातील समस्त नागरिकांना स्वतःचे जीवनमान उंचवण्याची समान संधी द्यावी.बँक क्षेत्रातील होणारे खासगीकरण थांबावे.खाजगी बँकाचे राष्ट्रीयकरण करावे.खाजगी बँकाकडून जनतेची होणारी लूट थांबावी.सरकारने बँकावर कोणतेही दबावतंत्र न ठेवता रिर्जव्ह बँकच्या कायद्यान्वये कामकाज चालावे.तेव्हाच जनतेचा पैसा सुरक्षित राहिला.

भारताला आज सतर्कतेबरोबर समृध्दतेकडे न्यायचे आहे. देशातील मागासलेपण समाप्त करून गरीब लोकांना योग्य आर्थिक पाठबळ देणे सरकारची प्राथमिकता असावी.देशात वाढलेल्या बेराेजगारीवर योग्य उपाययोजना करून लवकरात लवकर त्यांना रोजगारभिमुख करावे.”आत्मनिर्भर भारत” फक्त पोकळ घोषणा करून होणार नाही तर विधायक नियोजन करून तरूणांचा योग्य संधी उपलब्ध करून द्यावी.देशातील प्रत्येक नागरिकांना धर्माच्या व जातीच्या नावाने होणाऱ्या अन्यायापासून भयमुक्त करावे.

आपआपसातील सारे भेदभाव गाळून “मी प्रथम भारतीय अंतिमतः ही भारतीय “हा विश्वास वृदिंगत करावा.एकात्म भारताच्या हितासाठी साऱ्या बांधवाने संविधानात्मक संस्कृतीचा प्रचार व प्रसार करावा.अंधश्रध्देच्या महारोगावर मात करून विज्ञानाची कास धरावी.नवे मूल्यमंथन करून भारतीय समाजाला देशातर्गंत गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढावे.देशातीलशोषित,पिडित,कामगार,शेतकरी,आदिवासी,स्त्री वर्ग यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून लोकशाहीचा क्रांतीसूर्य मनी पेरावा.स्वःताच्या विकास सोबत देशाचा विकास केला तर भारत समृध्द होऊ शकतो.त्यासाठी साऱ्या नागरिकांनी “सतर्क भारत समृध्द भारत”हा नारा बुलंद करावा.

” सम्यक ज्वालेच्या महाऊर्जेने
आपण स्वयं प्रज्वलित व्हावे.
शांतीरथावर आरूढ होऊन
हिमालयाची छाती व्हावे.
नव्या भारताच्या अभ्युदयेसाठी
आपण सारे एक व्हावे.
सतर्क भारत ,समृध्द भारतासाठी
समानतेचे पथिक व्हावे. “

✒️संदीप गायकवाड(रामकृष्ण नगर,दिघोरी नागपूर)मो:-९६३७३५७४००