शेतकऱ्यांची घरे जळत असताना ‘निरो’ चे फिडेल वाजवणे संतापजनक – गोविंद यादव

    42

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.3डिसेंबर):-दील्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी शेतकरी एकवटले आहेत. कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडले जात आहेत. शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. मात्र शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांची घरे जळत असताना वाराणसीत आपले पंतप्रधान संगीत कारंज्यांचा आनंद घेत आहेत, हे रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या निरो सारखेत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे.

    शेतकऱ्यांसाठी जाचक असलेली तीन्ही विधेयके रद्द करावीत, अशी मागणी आज गंगाखेड तालुका कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे तहसीलदारांमार्फत करण्यात आली. यावेळी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. केंद्र सरकारने पारीत केलेली तीन्ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याची शेतकऱ्यांची ठाम भावना झालेली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधूनच ही विधेयके अंमलात आणावीत. तोवर ही विधेयके रद्द करावीत, अशी मागणी यावेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

    दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे असेच दुर्लक्ष झाले तर ते गावपातळीपर्यंत पोहोचून परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याचा ईशारा या वेळी देण्यात आला. या निवेदनावर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, युवा नेते सुशांत चौधरी, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, शेख गफारभाई, योगेश फड, प्रभाकर सातपुते, संतोष टोले, बालाजी फड, किरण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.